|

कोरोनाच्या डेल्टा + नंतर आता ‘लॅम्ब्डा व्हेरियंट’चा धोका; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरते ना ओसरतेच तोवर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकं वर काढलं ज्याला डेल्टा + व्हेरियंट म्हणून ओळखले जात आहे. कोरोनाचा हा डेल्टा + व्हेरियंट आपल्यासाठी अतिशय घातक असू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. शिवाय डेल्टा + व्हेरियंटचे काही रुग्ण राज्यात आढळले आहेत. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. तर प्रशासन सतर्क झाले आहे. अश्या चिंताजन्य परिस्थितीत आता आणखी एका नव्या व्हेरियंटची भर पडली आहे. कोरोनाचा या नव्या व्हेरियंटचे नाव ‘लॅम्ब्डा वेरियंट’ (Lambda Variant) आहे. या बाबतचा गंभीर इशारा आरोग्य संघटनांकडून देण्यात आला आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHI) ने दिनांक २३ फेब्रुवारी ते ७ जून दरम्यान लॅम्ब्डा व्हेरियंटच्या ६ प्रकरणाची सूचना दिली होती. यावर अद्याप संशोधन सुरु आहे. तर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या ‘लॅम्ब्डा व्हेरियंट’ला ‘वेरियंट ऑफ इंटरेस्ट’ अश्या पद्धतीने वर्गीकृत केलेले आहे. गेल्या १५ जून २०२१ला WHOला तब्बल २९ देशांमध्ये ‘लॅम्ब्डा व्हेरियंट’ मिळाला आहे. अर्थात आतापर्यंत २९ देशांमध्ये या व्हेरियंटचा प्रसार झालेला आहे.

याच्या संसर्गाची सुरुवात दक्षिण अमेरिकेपासून झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर या व्हेरियंटचा संसर्ग आता दक्षिण ब्राझील ते ब्रिटेन इथंपर्यंत पसरला आहे, अशी माहिती आहे. न्यूज मेडिकल लाइफ सायन्स या मासिकात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कोरोनाचे हे रूप अमेरिकेमध्ये अतिशय वेगाने संक्रमित होत आहे. वैज्ञानिकांच्या मते, कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमधील स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक म्यूटेशन आढळले आहेत. ज्यामुळे याची ट्रान्स मिसिबिलिटी वाढल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

* जाणून घ्या कोरोनाच्या लॅम्ब्डा व्हेरियंटची लक्षणे कोणती?
ब्रिटेनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) ने ‘लॅम्बडा व्हेरियंटच्या लक्षणांची एक यादी तयारी केली आहे. यात खालील लक्षणांचा समावेश आहे.
– सर्वसाधारण ताप ते तीव्र
– साधा खोकला/ कोरडा खोकला
– चव न लागणे
– गंध न येणे

* महत्वाचे:- या व्हेरियंटवर कोरोना व्हॅक्सीनचा डोस प्रभावी आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.