| |

वयाच्या चाळीशीनंतर ‘या’ सवयी करतात आरोग्याचा घात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल अनेक लोक अनेक आजारांपासून त्रस्त असल्याचे आपण पाहतो. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, पोटाचे विकार, हृदय रोग, किडनीचा त्रास आणि अजून बरेच मोठमोठे आजार यांचा समावेश आहे. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? कि हे आजार होण्यामागील कारण काय? तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि यामागील सर्वात मुख्य कारण म्हणजे तुमची नियमित जीवनशैली आणि आहार पद्धती. या दोन्ही गोष्टींचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. त्यात वाढते वय असेल तर आणखी काळजी घेणे गरजेचे असते.

अनेक लोक वाढत्या वयानुसार प्रौढ नव्हे तर लहान होऊ लागतात. त्यांना खाण्या पिण्याच्या गोष्टींपासून ते प्रत्येक लहान सहान गोष्टी करा असे सतत सांगावे लागते. पण ते काही ऐकत नाहीत. परिणामी आजारपण. या कॅटेगरीत समावेश होतो तो चाळीशी उलटलेल्या लोकांचा. आपण अश्या वयात असतो जेव्हा आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते आणि नेमके याच वयात आपण ना डाएटचा विचार करतो ना व्यायाम आणि ना इतर चांगल्या सवयींचा अवलंब करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वयाच्या चाळिशीनंतर आपल्या कोणत्या सवयी आपल्या आरोग्याचे नुकसान करते हे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) तेलकट आणि मसालेदार खाणे – आपल्या जिभेचे चोचले प्रमाणापेक्षा जास्त पुरवणे हे कोणत्याही वयात आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायीच आहे. त्यात वयाच्या चाळिशीनंतर आपली पचनसंस्था कमकुवत झालेली असते. अशावेळी तेलकट, मसालेदार आणि चमचमीत पदार्थ खाऊन तिच्यावर अत्याचार करण्याला काहीही अर्थ नाहीये. त्यामुळे सर्वात आधी आपल्या खायच्या सवयी पोषक आणि सकस आहाराकडे वळवा.

२) चुकीच्या पद्धतीत उठणे बसणे – वयाच्या चाळिशीनंतर आपल्या हाडांमधील पेशी कमकुवत झालेल्या असतात. त्यामुळे अचानक उठणे अचानक बसने या सवयी आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. यामुळे हाडांचा त्रास आणि अर्थातच पेशींचा त्रास निर्माण होतो. परिणामी मणक्याचा त्रास आपल्या आरोग्यविषयक समस्येंमध्ये वाढ करतो.

३) मद्यपान आणि धूम्रपान – मित्रांनो मद्यपान आणि धूम्रपान या सवयी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घटक असतात. त्यामुळे अशा सवयींवर वेळीच पाणी सोडा. मद्यपानामुळे किडनीसंबंधित आजार होऊ शकतात तर धुम्रपान केल्यामुळे श्वसनसंस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे किडनी विकार आणि हृदय विकाराचा धोका वाढतो.

४) वेळोवेळी रक्तदाबाचे निरीक्षण न करणे – जर तुम्ही वेळोवेळी तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण केले नाही तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण जर रक्तदाबाची समस्या वेळीच कळली नाही तर संबंधित रुग्णांना किडनी आणि हृदयाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे रक्तदाबाचे नियमित निरीक्षण जरूर करा आणि असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे उपचार घ्या.

५) व्यायाम न करणे – कमी वयात सवय नसेल तर वयाच्या चाळीशीनंतर व्यायाम काय करणार? असे कितीही वाटले तरीही हि सवय लावून घ्याच. कारण या वयात तुमच्यासाठी रोजचा व्यायाम आवश्यक आहे. दैनंदिन रुटीनमध्ये ध्यान आणि वर्कआउट्सचा समावेश कराच. यामुळे लठ्ठपणा आणि हृदयसंबंधित आजार टाळणे सोप्पे जाईल. याशिवाय मेंदूचा व्यायाम देखील आवश्यक आहे. कारण याकडे दुर्लक्ष केल्यास अल्झायमर वा विस्मरणचा त्रास होऊ शकतो.