| |

आयुर्वेदिक वाळा शरीराला देई नैसर्गिक थंडावा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। उन्हाळ्याचे दिवस असो वा नसो जर शरीराचे तापमान उच्च आणि अति तीव्र असेल साहजिकच आपल्याला गर्मीची जाणीव होते. मग आपण आपल्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून एसीत राहणं, सॉफ्ट ड्रिंक्स पिणं, फ्रिजमधील पाण्याचे सेवन अश्या गोष्टी करतो. मात्र हे पर्याय खर्चिक आणि कालांतराने शरीराला अपायकारक ठरतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला एक असा आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही शरीरातील उष्णता संतुलित करू शकाल.

– उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती ‘वाळा’ अत्यंत परिणामकारक मानली जाते. हि वनस्पती अगदी सुकलेल्या गवताप्रमाणे दिसते. या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर बहुतेकदा केवळ उन्हाळ्यात केला जातो. परंतु हि वनस्पती उन्हाळ्या व्यतिरिक्त होणाऱ्या उष्णतेच्या त्रासांवर देखील प्रभावी आहे. वाळा ही एकमेव अशी वनस्पती आहे. जी थंड स्वरूपाची असली तरीही मंदावलेल्या पचनशक्तीला चालना देण्यासाठी मदत करते. चला तर जाणून घेऊयात वाळ्याचे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक फायदे खालीलप्रमाणे:-

१) वाळ्याचं पाणी – शरीरात उष्णता जाणवली कि सगळ्यात आधी आपण फ्रिज उघडून त्यातील थंड पाणी पितो. यामुळे तात्पुरते शरीरास थंड वाटते. पण हेच पाणी पुढे शरीरासाठी त्रासदायक ठरतं. म्हणून फ्रीजऐवजी माठात पाणी भरून ते प्या आणि या पाण्याला नैसर्गिकरित्या थंड करण्यासाठी त्यामध्ये वाळ्याची जुडी घालून ठेवा. मात्र पाण्यात वाळा घालून ठेवण्यापूर्वी त्याला बांधलेली साधी दोरी कापून केवळ वाळा पाण्यात मिसळा. कारण साधा दोरा फार काळ पाण्यात राहिल्यास त्यावर बॅक्टेरिया वाढतो. पण वाळा पाण्यात सडत नाही.
० सुरक्षेचा उपाय म्हणून दर १५ दिवसांनी वाळा पाण्यातून काढून उन्हात वाळवून पुन्हा वापरता येईल. अशाप्रकारे एक वाळ्याची जुडी महिना किंवा दीड महिना वापरणे सुरक्षित राहील.

२) वाळ्याचं सरबत – गरमीमुळे सतत घाम येत असेल तर शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी सतत लागणारी तहान शमवण्यासाठी वाळ्याचं सरबत फायदेशीर ठरतं. यामुळे शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच वाळ्याचं सरबत वा वाळ्याचे चूर्ण पाण्यात मिसळून ते सकाळी नाश्त्यानंतर प्यायल्यास उन्हाळ्याच्या दिवसात ते एनर्जी ड्रिंकप्रमाणे पिता येते. यामुळे मंदावलेली पचनशक्ती सुधारता येते.

३) वाळ्याचा लेप – अतिउष्णतेमुळे शरीरात पित्त वाढण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी शरीरावर चंदनाची उटी किंवा वाळ्याचा लेप लावावा. यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या थंडावा राहतो.

४) वाळ्याच्या टोप्या – साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र सूर्यकिरणांमूळे उष्माघाताचा त्रास होतो. अशावेळी घरातून बाहेर पडताना वाळ्याच्या टोप्या घालून बाहेर पडणं अधिक सुरक्षित ठरते. यामुळे उन्हाची तीव्रता शरीराला बाधत नाही.

५) वाळ्याचे पडदे / पंखे – वाळ्याचे पडदे आणि पंखे हे उन्हाळ्यात नैसर्गिक स्वरूपातील एअर कंडिशनप्रमाणे काम करतात. प्रामुख्याने विदर्भात उन्हाळ्याच्या दिवसात वाळ्याचे पडदे किंवा पंखे वापरले जातात. त्यावर पाणी मारल्यानंतर पड्द्यांना छेदून येणारी हवा ही अतिशय थंडगार असते.