| |

(आ) डेंग्यूच्या तापावर करावयाचे घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण (अ) या भागात डेंग्यूविषयी प्राथमिक माहिती जाणून घेतली. जसे कि, डेंग्यू म्हणजे काय?, डेंग्यूचा प्रसार कसा होतो? डेंग्यू विषाणूचे प्रकार आणि लक्षणे. यानंतर आपण (आ) या भागात डेंग्यू झाल्यास कोणते घरगुती उपचार करता येतील हे जाणून घेणार आहोत.

सर्वसाधारणपणे डेंगू झालेल्या रुग्णाला तीव्र ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळणे आणि उलट्या होणे, शरीरातील त्राण निघून जाणे आणि शरीरातील प्लेटलेट्सची संख्या प्रचंड कमी होणे या समस्यांना सामोरे जावे लागते. हा त्रास गंभीर स्वरूपाचा होऊ नये यासाठी आपण घरगुति उपचारांपासून सुरुवात करू शकतो . यासाठी घरातील काही गोष्टींचा वापर करता येईल. मात्र अनेकदा लोकांना या उपचारांविषयी माहित नसल्यामुळे डेंग्यूची भीषणता वाढू लागते. म्हणून डेंग्यू वेळीच थोपवायचा असेल तर खालील उपायांचा जरूर वापर करा.

१) तुळशीची पाने – डेंग्यू तापाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यास तुळशीची पाने यावर एक उत्तम आणि लाभदायक घरगुती उपाय आहे. यासाठी तुळशीचे ८ ते १० पाने स्वच्छ धुवून गरम पाण्यात हाताने तोडून टाका आणि व्यवस्थित उकळवून घ्या. आता हे पाणी थोडे कोमट झाल्यानंतर रुग्णाला प्यायला द्या. असे दिवसातून ४ ते ५ वेळा हे पाणी रुग्णाला प्यायला द्या. यामुळे तुळशीतील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म डेंग्यूच्या विषाणूचा प्रतिकार करतील आणि रुग्णाला आराम मिळेल.

२) नारळपाणी – डेंगूच्या तापावर आराम मिळवायचा असेल तर घरगुती उपायांपैकी आणखी एक जबरदस्त उपाय म्हणजे नारळ पाणी. हे पाणी एकतर शहाळ्याचे असावे किंवा जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या नारळाचे असावे. या पाण्यात एकंदरच नैसर्गिक घटकांचा समावेश असतो. शिवाय यात भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाईट्स सारखे पोषक घटक समाविष्ट असतात. जे शरीर मजबूत करण्यास मदत करतात. म्हणून डेंग्यू झालेल्या रुग्णास दिवसातून किमान २ नारळाचे पाणी द्यावे.

३) मेथीच्या पानांचा चहा – मेथीमध्ये अनेक विविध पोषक घटक असतात. याशिवाय मेथीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्मांसह शरीरातील विषद्रव्ये शरीराबाहेर टाकण्याची क्षमता असते. म्हणून डेंग्यू झालेल्या रुग्णास मेथीची पाने घालून बनवलेला चहा प्यायला द्यावा. असे केल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात आणि डेंग्यूवर आराम मिळतो. यासाठी मेथीची सुकवलेली पाने हाताने चुरून त्याची एक चमचा पावडर गरम पाण्यात उकळवा. यानंतर पाणी एका कपात घेऊन त्यात चवीसाठी थोडेसे मध घाला आणि रुग्णास प्यायला द्या.

४) पपईची पाने – पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. डेन्ग्र्युच्या रुग्णाला पपईच्या पाल्याचा काढा दिल्यास त्याची शारीरिक क्षमता सुधारते. शिवाय शरीराचे पचनतंत्र सुरळीत होते. तसेच पपईचा ज्युस प्यायल्याने प्लेटलेट्स जलद गतीने वाढण्यास मदत होते.

५) गाजर आणि बीटाचा रस – बीटात भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सीडेंट्स समाविष्ट असतात. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. तर गाजरातील पोषक घटक बीटातील पोषणाला आणखी स्ट्रॉंग बनवतात. म्हणून दोन ते तीन चमचे बीटाचा रस ग्लासभर गाजराच्या रसात मिसळून डेंग्यूच्या रुग्णाला प्यायला द्या. यामुळे ब्लड प्लेटलेट्स जलद गतीने वाढण्यास मदत होते आणि त्यांचे आरोग्यदेखील सुधारते.

६) किवी – किवी हे फळ व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असते. यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. शिवाय किवी खाल्ल्यामुळे रक्तातील प्लेटलेट्स जलद गतीने वाढण्यासाठी सहाय्य होते. या प्लेटलेट्स आपल्या शरीराला संसर्गापासून रक्षण देण्याचे कार्य करीत असतात. म्हणून डेंग्यू झालेल्या रुग्णाला एकतर किवीचे फळ असेच खायला द्या किंवा किवीचा ज्यूस प्यायला देणेही लाभदायक ठरते.

७) भोपळ्याचा रस – भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती चांगली बळावते. म्हणून डेंग्यूच्या रुग्णाला भोपळ्याचा किस, भोपळ्याचा रस देणे लाभदायक ठरते. यासाठी भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्युसमध्ये दोन चमचे मध घालून दिवसातून दोनदा रुग्णास द्या. यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढण्यासही मदत होते.

८) काळीमिरी – काळीमिरी हि तीव्र असली तरीही यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म समाविष्ट असतात. म्हणून तुळशीची पाने आणि ४ ते ५ काळीमिरी कुटून पाण्यात उकळवा. यानंतर हे पाणी कोमट करून रुग्णास प्यायला द्या. हे पाणी प्यायल्यामुळे रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती वाढणाया मदत होईल. शिवाय रुग्णाला आराम मिळेल.