|

(आ) नागीण रोग संसर्गजन्य आहे का?; जाणून घ्या घरगुती उपाय आणि घ्यावयाची काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण (अ) भागात जाणून घेतले कि अंगावर नागीण उठणे म्हणजे काय? हा आजार कसा होतो? याची लक्षणे काय? यानंतर आपण आज (आ) भागात जाणून घेणार आहोत कि नागीण रोग संसर्गजन्य आहे का? आणि त्यावर लवकरात लवकरात कोणते उपाय करणे गरजेचे आहे. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, नागीण आजाराबाबत असलेल्या गैरसमजांवर विश्वास ठेऊ नका. जसे कि, अनेक लोक सांगतात नागिणीचे दोन टोके मिळाल्यास किंवा नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका होतो. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ह्या सर्व गैरसमजुती आहेत. कारण नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला येते त्यामुळे दोन टोके जुळण्याचा किंवा विळखा घेण्याचा काहीही संबंधच येत नाही.

 

० नागीण संसर्गजन्य आजार आहे का..?
– नागीण हा आजार वॅरिसेला झोस्टर (varicella-zoster) नामक व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या येतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला नागीण झाल्यास त्याचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला झाला तर त्याला कांजिण्या येऊ शकतात. परिणामी कांजिण्या येऊन गेल्यानंतर हा व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात नर्व्ह टिश्यूजमध्ये लपून राहतो. यानंतर कालांतराने व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी झाल्यास संबंधित व्यक्तीला पुढे नागीण आजार होतो.

– वॅरिसेला झोस्टर (varicella-zoster) हा व्हायरस प्रामुख्याने त्वचेवर आलेल्या पुरळांच्या स्त्रावातून पसरतो. जर तुम्हाला लहानपणी कधीही कांजिण्या आल्या नसतील आणि तुमचा संपर्क नागीण वा कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या त्वचेवरील पुरळांच्या स्त्रावाशी आला तर हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. यामुळे कांजिण्या येऊन पुढील काही वर्षात रोग प्रतिकारशक्ती शक्ती कमी झाल्यावर नागीण आजार होतो.

– याशिवाय जर तुम्हाला लहानपणी कांजिण्या येऊन गेल्या असतील तर तुमच्या शरीरात या व्हायरसच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. यामुळे पुन्हा नव्याने या व्हायरसचा संसर्ग होत नाही. अशा व्यक्तींमध्ये व्हायरस आधीपासूनच शरीरात छुप्या स्वरूपात लपलेले असतात आणि कालांतराने त्या व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर नागीण आजाराचा त्रास त्याला होतो.

० नागीण आजारावरील उपचार माहिती – नागीण झाल्यावर लगेच उपचार सुरू करणे आवश्यक आहे कारण यामुळे नागिणीचा त्रास लवकर कमी होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होतो. यासाठी डॉक्टर अँटीव्हायरल आणि वेदनाशामक औषधे देतील. तसे पाहता नागीण हा जीवघेणा आजार नाही. साधारण २-६ आठवड्यात नागीण आजार बरा होतो. मात्र दुर्लक्ष केल्यास तो जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

० अंगावर नागीण उठल्यास करावयाचे घरगुती उपाय :-

१) नागीण आजाराची पुरळ आलेला भाग हा थंड पाण्याने धुवा किंवा थंड पाण्याने पुसून घ्या. यामुळे वेदना कमी होतील. शिवाय बर्फाचा थंड शेक घेतल्यासदेखील फायदा होईल.

२) नागीण जास्त पसरत असल्याचे निदर्शनास आल्यास हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी गरम पाण्यात थोडे मीठ टाकून त्या पाण्याने स्नान करा.

३) नागिणीने प्रभावित भागावर पेट्रोलियम जेली लावल्याने आराम मिळेल.

४) बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि हि पेस्ट नागिणीची पुरळ आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे नागिणीच्या वेदना कमी होतात.

५) नागीण उठल्यास त्या ठिकाणी capsaicin हा घटक समाविष्ट असणारी क्रीम वा लोशन लावा. यामुळे सूज व वेदना कमी होते.

 

० नागीण आजार झाल्यास अशी काळजी घ्या :-

१) हलका आहार

२) पुरेशी विश्रांती

३) नागीण पुरळ खाजवू नका.

४) अंघोळीनंतर ती जागा मऊसूत टॉवेलच्या साहाय्याने न घासता टॅप करून पुसून घ्या.

५) नागीण झालेल्या रुग्णाचे कपडे, साबण इ. वैयक्तिक वापराच्या वस्तू इतर कुणीही वापरू नये.

६) गरोदर स्त्री, लहान बालके आणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी नागीण झालेल्या रुग्णांचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा.

७) नागीण पूर्णपणे निघून जाऊन रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत लैंगिक संबंध ठेऊ नका.

८) नागीण पसरत असल्याचे निदर्शनास आल्यास कोणतेही घरगुती उपाय करत बसू नका. डॉक्टरांकडून लगेच उपचार करून घ्या.