|

आपल्या मुलांसाठी कुबड्या नको मार्गदर्शक व्हा; जाणून घ्या मुलांच्या विकासासाठी सहाय्यक टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खरंतर मुलांचे करियर निवडण्यासाठी पालकांनी गरज नसते. हा पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि योग्य तो मार्ग दाखविण्यासाठी मात्र पालकांनी नक्कीच गरज असते. सहसा मुलांच्या करिअरबाबत विचार करणाऱ्या पालकांचे २ गट असतात. काही पालक मुलांच्या लहान वयापासून त्यांच्या करिअरबद्दल जागरूक असतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळे क्लास आणि कौन्सिलर्स आधीपासूनच लावलेले असतात. इतकेच काय तर या आईबाबांनी मुलांच्या करिअरची सगळी सोय करून ठेवलेली असते. तर काही पालक अगदी याउलट म्हणजे मुलांना जे काही करायचे असेल ते त्यांना करू द्या, असे त्यांचे म्हणणे असते. पण हे करताना मुलं स्वातंत्र्याचा स्वैराचार करतात. यामुळे मुलांना करिअर निवडण्याची मुभा द्या मात्र ते मिळवण्यासाठी कोणत्या दिशेला जावे हेदेखील सांगा आणि मार्गस्थ करा. आता हे कसे करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या टिप्स जाणून घ्या आणि आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांना मदत करा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) विविध क्षेत्रांची ओळख
– लहान मुलांना प्रत्येक गोष्टीचे प्रचंड कुतूहल असते. याच कुतूहलाचा वापर करून त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख करून द्या. म्हणजे, मुलांचे कळते वय असल्यास त्यांना अमुक एक रक्कम देऊन त्यातून काही खरेदी करायला सांगा आणि खरेदीचा जमा-खर्च पद्धतीने हिशोब लिहून घ्या. कधी महिन्याचा खर्च त्यांच्याकडून मुद्दाम एक्सेलमध्ये लिहून घ्या, कधी बँकेच्या स्लीप्स भरून घ्या. घरकामात, स्वयंपाकात मदत करणे शिकवा, वेगवेगळ्या रीसिपी व्हीडीओ दाखवा. ही आणि अशी कितीतरी कामे त्यांच्याकडून करून घेऊन त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची मुद्दाम ओळख करून द्या. शिवाय लहानपणापासून त्यांना वेगवेगळ्या करिअरबद्दल विशेष माहिती द्या आणि त्यांच्या आवडीविषयी गप्पा मारा.

२) वेगवेगळ्या करिअरची माहिती आधी स्वतः मिळवा मग मुलांच्या भाषेत मुलांना सांगा
– आधुनिक जगात करिअरच्या संधी फार आहेत. यासाठी आधी आपण प्रगत होणे आवश्यक आहे. आपल्या पिढीला माहीत नसलेली अनेक नवनवीन क्षेत्र आता आहेत. यामुळे जुन्या करिअरच्या पर्यायांमध्ये न अडकता वेगवेगळे काय पर्याय आहेत ते शोध आणि मुलांना समजावून सांगा. यामुळे जर मुलांनी एखाद्या नवीन कोर्स करायची इच्छा व्यक्त केली तर त्याबद्दल योग्य मार्गदर्शन तुम्हाला करता येईल.

३) कोणत्याही गोष्टीसाठी ‘स्पूनफीडिंग’ नकोच
– जसजशी मुले मोठी होतील, त्यांना त्यांच्या आवडीनिवडी समजतील. यामुळे तुम्ही एकदा त्यांना वाट दाखवली की त्या वाटेवरून त्यांना स्वतंत्रपणे चालू द्या. त्यांच्या अडीअडणीला त्यांना मदत करा. चुकत असेल तर बरोबर सांगा हि पालक म्हणून जबाबदारी सांभाळताना मुलांना अपंग करून त्यांच्या कुबड्या होऊ नका. शिवाय मुले चुकूच नयेत, त्यांना काही अडचणी येउच नयेत असा विचार करून सतत त्यांना खाली ओढू नका. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रवृत्त न करणे या गोष्टी जर तुम्ही काळजीपोटी, अनवधानाने करत असाल तर त्या कटाक्षाने टाळा. आपली मूलं सक्षम आहेत यावर विश्वास ठेवा आणि त्यांना मार्गस्थ होऊ द्या.

४) शिक्षण आणि नोकरीविषयी चर्चा
– नेहमी आपल्या मुलांसोबत त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि नोकरीबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. त्यात कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. मग यातून कसे बाहेर पडाल आणि काय कराल हे समजण्यासाठी सहाय्य करा. यासाठी वैयक्तिक प्रसंग शेअर करा. ते यश संपादन करण्यासाठी तुम्ही काय केले, कसे काम केले, किती कष्ट घेतले हे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या.पण तीच क्रिया लादू नका. लहानपणी मुलांना सुट्टी असल्यास तुमच्या ऑफिसमध्ये न्या. तिथे काय काम चालते हे बघण्याची त्यांना प्रत्यक्ष संधी द्या. शाळेतल्या इंडस्ट्रीयल व्हिजिट पेक्षा आपल्या आई बाबांचे ऑफिस आणि तिथले काम त्यांना जास्त लक्षात राहते, हे कधीही विसरू नका.

५) मुलांमधील इतरांपेक्षा वेगळे असणारे गुण ओळखा
– खरंतर मूलं लहान असतानाच त्यांचा कल दिसू लागतो. पण तो पाहायची क्षमता जागी करा. कारण यातूनच मुलांनी कोणते करिअर निवडावे हे समजते. उदाहरणार्थ, आपले मुल गणितात चांगले असेल तर लगेच त्याला इंजिनीअर होण्याचा सल्ला दिला जातो. असे झाले तर मुले नकळत फक्त त्याच दिशेने विचार करतात. तर असे न करता जर तुमच्या मुलाला एखाद्या विषयात गती असेल तर त्या विषयात काय काय करिअर करता येतात याची माहिती घ्या आणि मुलांना द्या. त्या क्षेत्रातील करिअरसाठी काय आणि कसे शिक्षण काय घ्यावे हे मुलांना सांगा.