सावधान! कोरोना ची लस घेणार आहात? लसीकरणापूर्वी आणि नंतर दारू प्यायल्यास होणार ‘हे’ परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन : फेब्रुवारी २०२० नंतर सुरु झालेला कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. सरकारी पातळीवर विविध उपाय योजना सुरु आहेत.  त्यापैकी एक म्हणजे लसीकरण! लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर सोशल मीडियावर हल्ली एक संदेश जरा जास्तच वेगाने सगळीकडे फिरत आहे. . त्यातीलच एक म्हणजे लसीकरणाच्या आधी दोन महिने दारू पिऊ नका आणि लसीकरणानंतरही दोन महिने दारू पिऊ नये. यानंतर हा माहिती असणारा संदेश अनेक ठिकाणावरून विविध व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये दिवसभर फिरत होता. त्यावेळी संबंध मद्यप्रेमींची तारांबळ उडाल्यासारखी अवस्था झाली होती. बरं हा विषय मद्यप्रेमी पुरता मर्यादित न राहता न घेणारे चवीने या विषयाची चर्चा करताना आढळत आहे. अनेक मद्यप्रेमीनी ग्रुप मध्ये ही माहिती खरी की खोटी याची शहानिशा केली. ह्या माहितीची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता वैद्यकीय तज्ञांकडून असे लक्षात आले की लस घेण्याआधी काही दिवस आणि लस घेतल्यानंतर काही काळ दारूचे अति सेवन करू नये. त्यामुळे लस घेतल्यानंतर जी रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होणे अपेक्षित असते त्यामध्ये बाधा येऊ शकते. याचा अर्थ विविध अंगाने काढला जाऊ शकतो तो म्हणजे जास्त घेऊ नका, आजिबात घेऊ नका किंवा कमी घ्या.

२०२० हे वर्ष सरलं आणि कोरोनावरील (Coronavirus) चर्चेची जागा आता कोरोना लशीवरील (Corona Vaccine) चर्चेने घेतली आहे. भारतासह अनेक देशांत कोरोनाच्या काही लशींना मंजुरी मिळाली असून, लसीकरण कार्यक्रमही सुरू झाले आहेत किंवा होत आहेत. ०१ मे २०२१ पासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची प्रक्रिया सुरु होत आहे. त्याची नावनोंदणी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर, लशीची परिणामकारकता कमी न होण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोरोनाप्रतिबंधक लस घेण्याच्या आधी  आणि लस घेतल्यानंतर काही दिवस मद्यपान केल्यास लशीचा (Covid Vaccine) आवश्यक तो परिणाम साध्य होणार नाही आणि कोरोनाला प्रतिकार करण्याची शक्ती शरीरात तयार होणार नाही, असं शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात सिद्ध झालं आहे. ‘डेलीमेल’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

मानवाच्या आतड्यात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. ते रोगकारक जिवाणू आणि विषाणूंना प्रतिकार करत असतात. आतड्यातील या आवश्यक सूक्ष्मजीवांच्या रचनेत अल्कोहोलमुळे बदल होतो. त्यामुळे रक्तातल्या पांढऱ्या पेशी आणि लिम्फोसाइट्सना हानी पोहोचते. पांढऱ्या पेशी रोगप्रतिकारशक्ती देतात, तर लिम्फोसाइट्सद्वारे विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार होतात. ‘घेतलेल्या लसीला शरीराने योग्य प्रतिसाद द्यायला हवा असेल, तर तुमच्या शरीराची प्रतिकार यंत्रणा उत्तम पद्धतीने कार्यरत असायला हवी. लस घेण्याच्या आदल्या रात्री किंवा लस घेतल्यानंतरच्या लगेचच्या दिवसात तुम्ही मद्यपान केलं असेल, तर लसीची उपयोगिता कमी होईल.

प्रौढांमध्ये रक्तातल्या पांढऱ्या पेशींत लिम्फोसाइट्सचं प्रमाण 20 ते 40 टक्के असतं. प्लीहा, टॉन्सिल्स, लिम्फ नोड्स असे काही अवयव किंवा ऊतींमध्ये लिम्फोसाइट्स प्रमुख्याने केंद्रित झालेल्या असतात. शरीराच्या प्रतिकारयंत्रणेचा प्रतिसाद तिथून सुरू होतो. प्रतिकारयंत्रणेमध्ये लिम्फोसाइट्स हा मूलभूत घटक असतो. कारण शरीराबाहेरून आत आलेले घातक विषाणू, जिवाणू आदींना नेमका कसा प्रतिसाद द्यायचा, त्यांचा प्रतिकार कसा करायचा, याचा निर्णय लिम्फोसाइट्स पेशी घेतात. चीनमधल्या वुहान इथून कोरोनाचा संसर्ग साऱ्या जगभर झाला. तिथल्या शास्त्रज्ञांचाही अनुभव हेच सांगतो.

त्यामुळे अल्कोहोलयुक्त द्रव्य अर्थात मद्य, वाइन आदींमुळे लिम्फोसाइट्स या महत्त्वाच्या पेशींचं प्रमाणच कमी होणार असेल, तर लस घेऊनही आवश्यक ती प्रतिकारशक्ती शरीरात तयार होणारच नाही. त्यामुळे लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. म्हणूनच लसीकरणाच्या काळात मद्यपान करू नये, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. नेमका किती काळ याबाबत शास्त्रज्ञांनी नेमकं सांगितलं नसलं, तरी लसीकरणाच्या काही दिवस आधी आणि काही दिवस नंतर मद्यपान न केलेलंच बरं!