|

वयाची तिशी नंतर ‘या’ मेडिकल टेस्ट नक्की करा; कारण तुमच्या जीवापेक्षा मूल्यवान जगात दुसरे काहीच नाही

हॅलो आरोग्य ऑनलाईन : वयाच्या तिशीत पोहोचल्यानंतर प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं वाढतं. व्यावसायिक स्पर्धेमुळे काम वाढतं. कुटुंबाकडेही लक्ष द्यायचं असतं. या सर्व व्यापात लोक स्वत:च्या शरीराकडे फारसं लक्ष देत नाहीत. तज्ज्ञ सांगतात, तिशीपासूनच लोकांनी शरीराची योग्य काळजी घेतली पाहिजे. आपण सर्रास म्हणतो, “Prevention is better than cure.” पण खरचं आपण हे पाळतो का? शरीराकडे लक्ष देतो का? 

रक्तदाब तपासणी

डॉक्टरकडे गेल्यानंतर सर्वांत आधी रक्तदाब तपासलं जातं. रिडिंग 120-80 असेल तर ते सामान्य मानलं जातं. जास्त रक्तदाब हृदयविकाराचा धोका असल्याचा एक संकेत असतो. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाब तपासणी केली पाहिजे. तज्ज्ञ सांगतात, प्रत्येकाच्या घरी डिजिटल रक्तदाब तपासणी मशिन असलंच पाहिजे. तुम्ही घरच्या-घरी तपासणी करू शकता.

रक्त तपासणी

तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल. डॉक्टर सांगतात, “CBC करून घ्या आणि दाखवा. CBC म्हणजे ‘Complete Blood Count’. ही अत्यंत सोपी टेस्ट आहे. यात रक्तातील पेशींच्या संख्येबाबत पूर्ण माहिती मिळते.” ही टेस्ट केल्याने अनिमिया, इतर संसर्ग, काही प्रकारचे कॅन्सर ओळखता येऊ शकतात. भारतात महिलांमध्ये ऍनिमियाचे प्रमाण खूप मोठं आहे. यात रक्तातील लालपेशींमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पेशींपर्यंत योग्य ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ही टेस्ट वर्षातून एकदा तरी करावी असा तज्ज्ञ सल्ला देतात.

रक्तातील साखरेची तपासणी

याला आपण शुगर टेस्ट म्हणतो. मधूमेह आहे का नाही हे ओळखण्यासाठी ही टेस्ट काहीही न खाता-पिता 12 तासांनंतर केली जाते. रक्तातील साखरेचं प्रमाण 99 पेक्षा कमी असेल तर सामान्य मानलं जातं.  शरीरात साखरेचं प्रमाण 100 ते 125 मधे असेल तर याला ‘प्री-डायबेटीक’ म्हणतात. साखरेचं प्रमाण 126 पेक्षा जास्त असेल, तर मधूमेह झाला असल्याचं निदान केलं जातं. ज्यांच्या रक्तात साखर जास्त आहे. त्यांची HBA1C टेस्ट केली जाते. ज्याने तीन महिन्यांची सरासरी सारखेची पातळी कळते.

लिपिड प्रोफाईल

सामान्यांसाठी रुटीन आरोग्य तपासणीत ही महत्त्वाची टेस्ट आहे. तुमचं हृदय कसं काम करतंय. याची माहिती लिपीट प्रोफाईल केल्यानंतर मिळते. यात सिरम ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्ट्रोलची तपासणी होते. HDL कोलेस्ट्रोल शरीरासाठी चांगलं असतं. त्यामुळे याची मात्रा 60 पेक्षा जास्त असायला हवी. LDL कोलेस्ट्रोल, ज्याला बॅड कोलेस्ट्रोल म्हणतात. त्याची मात्रा 130 पेक्षा कमी असायला हवी. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार, “ज्याचे रिपोर्ट सामान्य आहेत. त्यांनी दोन वर्षातून एकदा ही टेस्ट केली पाहिजे. पण, लठ्ठ, मधुमेही आणि हृदयरोग असलेल्यांनी ही चाचणी दरवर्षी केली पाहिजे.”

ECG टेस्ट

काहींच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित असतात. त्यासाठी डॉक्टर ईसीजी टेस्ट करण्याचा सल्ला देतात.  हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे का नाही हे ECG टेस्ट केल्याने कळतं.

लिव्हर फंक्शन टेस्ट (Liver Function Test)

यकृताचं काम योग्यप्रकारे सुरू आहे का नाही. यकृताची क्षमता कमी झाली आहे का. याची माहिती लिव्हर फंक्शन टेस्ट केल्यानंतर मिळते. हेपेटायटिस-बी, हेपेटायटिस-सी, फॅटी लिव्हरसारख्या आजारांचं वेळीच निदान करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे.

BMI तपासणी

लठ्ठपणा ज्याला वैद्यकीय भाषेत Obesity म्हणतात. हा चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. भारतात लठ्ठ लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लठ्ठपणामुळे हृदयरोग, मधूमेह, कॅन्सर आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. प्रत्येक व्यक्तीचं वजन किती असावं हे त्याच्या उंचीवर अवलंबून आहे. BMI (Body Mass Index) तपासणीने शरीरात फॅट किती आहे याची माहिती मिळते. बीएमआय जास्त असला तर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं डॉक्टर सांगतात.

लघवीची तपासणी (Urine Test)

हल्ली लोक पाणी कमी पितात. प्रवासात सार्वजनिक स्वच्छतागृह वापरतात. अशा कारणांमुळे यूरीन इन्फेक्शन होतं. लघवीच्या तपासणीत यूरिन इन्फेक्शनचं निदान होतं. यूरीन टेस्टमध्ये लघवीत प्रोटीन, साखर आणि रक्त आहे का हे समजतं. सिगारेटचं व्यसन असलेल्यांना मूत्राशयाच्या कॅन्सरचा धोका असतो. लघवीत रक्त जाणं, मूत्राशयाच्या कॅन्सरचं लक्षण आहे. त्यासाठी ही टेस्ट करण्यात येते.

किडणी तपासणी (Kidney Function Test)

शरीरातील वेस्ट बाहेर टाकण्याचं काम किडनी करते. पण काही कारणांमुळे किडनी निकामी होते. या टेस्टमध्ये सीरम क्रिएटीनिन तपासलं जातं. सीरम क्रिएटीनिन जास्त असेल तर किडनी योग्य काम करत नाही याचे संकेत मिळतात.

थायरॉईड टेस्ट

वयाच्या तिशी-चाळीशीत अनेकांना थायरॉईडचा आजार डिटेक्ट होतो. यामुळे वजन अचानक वाढतं किंवा कमी होऊ शकतं. रक्त तपासणी करून शरीरात थायरॉईड योग्य प्रमाणात आहे का नाही हे तपासून पहाता येतं. ही टेस्ट वर्षातून एकदा करावी, असं डॉक्टर सांगतात.

व्हिटॅमिन-D टेस्ट करणं का महत्त्वाचं?

कोव्हिड काळात वर्क फ्रॉम होममुळे बाहेर उन्हात फिरणं कमी झालं. ऑफिसमध्ये कायम एसीतच असतो. त्यामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन-D मिळत नाही. वय वाढत असल्याने हाडं कमकुवत होण्यास सुरुवात होते. अनेकांचे वयाच्या 30-40 वर्षात सांधे दुखू लागतात. हाडं ठिसूळ झाल्याने ‘ऑस्ट्रीओपोरोसिस’सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन-D आणि कॅल्शिअम महत्त्वाचं आहे.

प्रत्येक महिलेने करावी पॅप स्मिअर टेस्ट (Pap Smear Test)

ही टेस्ट गर्भाशयाशी निगडीत आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढतंय. स्तनांच्या कॅन्सरनंतर भारतात महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर सर्वांत जास्त आढळून येतो.  गर्भाशयात कॅन्सर होण्यापूर्वी काही बदल झालेत का, याचं निदान होतं. 21 वर्षावरील सेक्शुअली ऍक्टिव्ह असलेल्या महिलेने ही टेस्ट करावी. तिशी आणि चाळीशी दरम्यान वर्षात तीन टेस्ट नॉर्मल असतील, तर ही टेस्ट 5 वर्षांनी करावी.

स्तनांची घरच्या घरी तपासणी (Self-Breast Examination)

ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी डॉक्टर महिलांना घरच्या घरी स्तनांची तपासणी करण्यास सांगतात. याला Self-Breast Examination म्हणतात. खारघरच्या मदरहूड रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिमा ठमके सांगतात, “महिलांनी स्तनांची घरच्या घरी तपासणी केली पाहिजे. स्तनात गाठ लागते का? निप्पलमधून स्राव होतोय? त्वचेचा रंग बदललाय का, याची तपासणी करावी.

पाळीच्या वेळी येणाऱ्या समस्यांची तपासणी

पाळीच्या वेळेस रक्तस्राव जास्त झाल्यास. खूप जास्त दुखत असल्यास महिलांनी तपासणी करून घ्यावी. गरज पडल्यास सोनोग्राफी करून निदान करता येतं.

पॅप स्मियर टेस्ट (Pap test)

महिलांनी ही चाचणी करणे गरजेचे आहे. या चाचणीद्वारे तुमच्या शरीरातील पेशींमध्ये होणारे बदल समजतात. याद्वारे तुम्हाला किती वर्षातून ही चाचणी कधी करता येईल, याचा अंदाज केला जातो. पॅप स्मियर टेस्टद्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाचे वेळेत निदान होते. तसेच गर्भाशयाबाबतचे विविध आजाराचे निदानही वेळेत होते.

वरील प्रकारच्या टेस्ट वेळेत आणि वेळच्या वेळी करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक घटक रोगांपासून या चाचण्यांमुळे बचाव होऊ  शकतो. कारण तुमच्या जीवापेक्षा मूल्यवान असे जगात दुसरे काहीच नाही.