| | |

हिवाळ्यात बाजरीची भाकरी जरूर खा; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात आपण डाळ, भात आणि भाजीसोबत प्रामुख्याने चपातीचा समावेश करतो. या चपातीसाठी आपण गव्हाच्या पीठाचा वापर करतो. पण अनेक घरांमद्ये लोक चपातीप्रमाणे भाकरीही आवडीने खातात. खरंतर प्रत्येकाने चपातीसोबत भाकरीचाही आहारात समावेश करावा. मग हि भाकरी ज्वारी, बाजरी, नाचणी वा मिश्र धान्यांची असली तरीही आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत त्यामुळे या दिवसात बाजारीची भाकरी खाणे अतिशय फायदेशीर मानले जाते. यामागे एक विशिष्ट कारण आहे. आज आपण या लेखामधून हिवाळ्यात बाजरीची भाकरी का खातात हे जाणून घेणार आहोत. याचसोबत त्याचे फायदे काय हेही जाणून घेऊया.

० हिवाळ्यात बाजरीची भाकरी खावी… कारण ?
– हिवाळा सुरू झाला म्हणजे हवामानात अचानक तीव्र बदल होऊ लागतो. अशावेळी आरोग्यासाठी आवश्यक असणारी पोषण तत्त्वे मिळवण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे आवश्यक असते. यामध्ये दैनंदिन आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश महत्वाचा मानला जातो. याचे कारण म्हणजे,
बाजरीच्या पिठामुळे पचनक्रिया मजबूत होते. याशिवाय आपला अनेक आजारांपासून बचावही होतो.
बाजरीच्या पीठात फायबर आणि अमीनो अॅसिड मोठ्या प्रमाणात समाविष्ट असते. यामुळे जर तुम्हालाही हिवाळ्याच्या दिवसात आपले आरोग्य उत्तम आणि निरोगी हवे असेल तर तर आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. जाणून घ्या फायदे खालीलप्रमाणे:-

१) आरोग्याचे संरक्षण – बाजरी खाल्ल्याने बीपी, ट्रायग्लिसराइड्स किंवा हृदय विकाराचा झटका यांसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. परिणामी बाजरीचे रोज सेवन केले असता आरोग्याला नियमित संरक्षण मिळतं. हेल्थ एक्सपर्ट सांगतात, बाजरीच्या पिठात इतर पीठांच्या तुलनेत ओमेगा ३ फॅटी अॅसिड जास्त असतं. यामुळे शरीराचे पूर्णपणे संरक्षण करण्यास बाजरी सक्षम आहे.

२) पोटाची काळजी – बाजरीचे पीठ ग्लूटेन फ्री असते. शिवाय यात फायबरचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते. यातील फायबर आपल्याला बराच वेळ भूक लागून देत नाही. यामुळे जर रोजच्या आहारात बाजरीची भाकरी खाल्ली तर सहजपणे वजन कमी करता येते.

३) निरोगी हृदय – बाजरीमध्ये मॅग्नेशिअम पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. बाजरीमुळे ब्लड वेसल्स पसरण्यास मदत मिळते. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी बाजरीच्या भाकरीचे सेवन केले तर यातील फायबर कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करते. परिणामी हृदयाच्या आरोग्याचे संरक्षण होते.

४) मधुमेहावर नियंत्रण – बाजरीच्या पीठात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेहींनी बाजरीच्या भाकरीचे सेवन नियमित आहारात केले तर त्यांचा आजार नियंत्रणात राखण्यास मदत होते. शिवाय बाजरीच्या भाकरीतून त्यांना भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम आणि पूरक ऊर्जादेखील मिळते.

५) डिटॉक्सिंग एजंटयुक्त – बाजरीच्या पीठात फायटिक अॅसिड, टॅनिन आणि फिनोलसारखे अॅंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे जर दैनंदिन डाएटमध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश केला तर अकाली म्हातारपण येत नाही. शिवाय रोग प्रतिकार शक्तीही मजबूत राहते.