|

.. कारण, स्तनपान हा आई आणि बाळाचा अधिकार आहे; वाचा सविस्तर

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ‘मातृत्व’ हि एक दृढ भावना आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याला एक अलग कलाटणी देणारी दैवी देणगी असते. मातृत्वाचे सुख या जगातील कोणत्याही सुखापेक्षा अधिक आहे. यादरम्यान स्त्रीच्या आयुष्यात आणि शरीरात घडणारे बदल केवळ एक स्त्रीच समजू शकते. कारण हा प्रत्येक बदल त्या स्त्रीसाठी शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या अत्यंत महत्वपूर्ण असतो. बाळाच्या पहिल्या चाहुलीपासून ते स्तनपानापर्यंत एका स्त्रीला एक बाई आणि एक आई म्हणून अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. यातील सांगायची बाब अशी कि, कोणतेही बाळ जन्माला आल्यावर त्याला मध किंवा साखर पाणी लगेच न देता आईला येणारा चिक द्यावा. कारण यातूनच त्याची पहिली भूक थांबते. इतकेच नव्हे तर यातूनच बाळाची रोग प्रतिकारशक्ति सक्षम होऊ लागते.

बाळ जन्माला आल्यावर स्तनपान करणे हि बाईपण आणि आईपण या दोहोंची परीक्षा असते. मुख्य म्हणजे, बाळ जन्माला येण्याआधीच आईने यासाठीची संपूर्ण मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. एका स्त्रीच्या शरीरात स्तनपानासाठी अत्यंत महत्वाचा असणारा अवयव म्हणजे स्तनाग्र. स्त्रीच्या शरीरातील स्तनाग्र हा अवयव अत्यंत दुर्लक्षित असतो. यामुळे अनेक स्त्रियांना स्तनपान करतेवेळी अडथळे येतात. याचसाठी प्रसुतीपूर्व काळात अर्थात बाळाच्या जन्मआधीचे ९ महिने स्तनपान करण्याची मानसिक तयारी करून स्तनाग्रे रोज आंघोळ करताना दोन बोटांच्या चिमटीत पकडून हळूच बाहेर खेचणे आवश्यक आहे. यातून चपटी, पसरट किंवा आत खेचली गेलेली स्तनाग्रे स्तनपानासाठी अडथळा निर्माण करीत नाहीत.

प्रसूतीनंतर आईला पहिल्यांदा दूध येत नसेल तर आईने घाबरून जाऊ नये. कारण ‘ही जबाबदारी स्त्रीरोग तज्ञांची आहे. कोणतेही बाळ जन्माला आल्यावर ताबडतोब बाळाची नाळ न कापता त्याला आईच्या पोटावर ठेवावे. त्याचा स्पर्श हा आईच्या अनावृत्त स्तनास होणे आवश्यक आहे. यामुळे नवजात बालकाच्या आईला दूध स्त्रवत होते. मुख्य म्हणजे, प्रसूतीनंतर लगेचच भरभर खूप दूध येईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. कारण सर्वांतआधी चिक येतो आणि त्यानंतर दूध येते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी घाई करणे किंवा पॅनिक होणे योग्य नाही. याकरिता नवजात बालकाच्या आईकडे संयम असणे गरजेचे आहे.

यानंतर महत्वाची बाब म्हणजे बाळाची भूक. नुकतेच जन्माला आलेल्या बाळाची भूक ही जास्तीत जास्त १० एमएल इतकी असते. त्यामुळे त्यांना दर दीड ते दोन तासांनी दूध पाजणे गरजेचे असते.

बाळाला दूध पाजताना फोनवर बोलणे, गप्पा मारणे, जोरजोरात हसणे किंवा ओक्साबोक्शी रडणे यातील कोणतीही क्रिया होणार नाही याची काळजी घ्यावी. यावेळी आपले संपूर्ण लक्ष बाळावर द्यावे.

बाळाला दूध पाजल्यानंतर ढेकर काढण्यासाठी त्याचे पोट आपल्या खांद्यावर येईल अश्या अवस्थेत बाळाला अलगद धरावे. यामुळे बाळ उलटी काढत नाही.

आपल्या बाळाची भूक किती? त्याला किती दूध पाजावे? किती किती वेळाने पाजावे? या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला नवमातांना थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे फार विचार करून मानसिक ताण घेऊ नये. याचा परिणाम दुधावर आणि परिणामी बाळांवर होतो.

सर्वसाधारणपाने आपल्या बाळाचे वजन आणि त्याची शक्ती याचा विचार करूनच त्याला दूध पाजावे. पण आपल्या बाळाने अमुक इतकेच दूध प्यावे असा अट्टाहास धरू नये.

बाळाला एकावेळी दूध पाजताना किमान २० ते २५ मिनिटे दूध द्यावे. यादरम्यान जर आपले बाळ दूध पिताना झोपले तर त्यास गालावर टिचकी मारावी किंवा आपल्या पायाची मांडी हलवावी ज्यामुळे बाळ जागे होऊन पुन्हा दूध प्यायला सुरू करेल.

या दरम्यान नवमातांनी ‘आपल्याला आपल्या बाळासाठी स्तनपान करायचे आहे’ ही मानसिक तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय अंगी संयम असणेही तितकेच आवश्यक आहे. यामुळे स्तनपान करतेवेळी अडथळे कमी येतात.

एक स्त्री आपल्या बाळाचे आरोग्य जपण्यासाठी आपले शरीर आणि आयुष्य दोन्ही पणाला लावते. कारण मातृत्वाची भावना केवळ आईच जाणते.