| |

कोरोनासाठी ‘व्हेंटिलेटर’ मशीन ठरली कर्दनकाळ, आपणांस माहीत आहेत का ‘या’ चे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  व्हेंटिलेटरवर ठेवले आहे एवढी बातमी जरी आपल्याला समजली तरी आपण ज्याला व्हेंटिलेटरवर ठेवलंय त्याची शेवटची तयारी करायला सुरवात करतो, एवढी दहशत व्हेंटिलेटर या शब्दाने निर्माण केली आहे. पण आपण म्हणतो तेवढे हे मशीन डेंजर नाही बर का!!! त्याचे अतिशय महत्वाची कार्ये आणि फायदे आहेत. आज आपण पाहणार आहोत की नक्की व्हेंटिलेटर म्हणजे काय ते. जेव्हा फुफ्फुसांना काही संसर्ग होतो त्यामुळे पेशंटला श्वास घेता येत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावलं जातं. म्हणजेच त्या व्यक्तीचं श्वास घेण्याचं काम व्हेंटिलेटर सोपं करतं.  आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये जर कोठे सर्वात मोठा बदल घडून आला असेल तर तो या प्रगत, सुरक्षित, परिणामकारक, जीवनरक्षक तंत्रज्ञानामध्ये घडून आला आहे, ज्याचे नाव आहे ‘व्हेंटिलेटर’.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर 80 टक्के पेशंट हॉस्पिटल ट्रीटमेंटशिवाय बरे होतात. पण सहा जणांपैकी एका पेशंटला मात्र श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या रुग्णाला श्वास घेणे शक्य नसते, तेव्हा डॉक्टर्स अशा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवतात, ज्यामुळे श्वास घेण्यास मदत होते. काही वेळा ऑपरेशन थिएटर्समध्ये शस्त्रक्रियेच्या सोयीसाठी व्हेंटिलेटरचा वापर होतो. रुग्णाला अ‍ॅनास्थेशिया देऊन एक छोटी नळी (एंडोट्रॅकियल टय़ूब) तोंडामध्ये टाकली जाते, जिचे दुसरे टोक मशीनला जोडलेले असते व त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास मदत होते. या मशीनलाच ‘व्हेंटिलेटर’ असे म्हणतात या संपूर्ण प्रक्रियेला यांत्रिक श्वासोच्छ्वास किंवा ‘मेकॅनिकल व्हेंटिलेशन’ असे नाव आहे.

नव्या धर्तीची व्हेंटिलेटर्स खूप प्रगत आहेत. त्यात बसविलेली सॉफ्टवेअर्स व मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञान यांच्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया खूपच सुरक्षित आणि परिणामकारक बनली आहे. ही यंत्रे रुग्णाच्या श्वासोच्छ्वासाच्या लयीशी परिणामकारकरीत्या जुळवून घेतात. त्यामुळे श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया अधिक सुलभतेने होण्यास मदत होते. या व्यवस्थेमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट  (आयसीयू) मधील परिचारक व क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट किंवा इंटेसिव्हिस्ट म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर्स व्हेंटिलेटरवरील रुग्णाची देखभाल करतात.

सर्वसाधारणपणे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला भूल देण्यात आलेली असते किंवा गुंगी आणणारी, वेदना बोथट करणारी औषधे देण्यात आलेली असतात, जेणेकरून त्यांना चांगला आराम मिळावा व वेदना होऊ नयेत. व्हेंटिलेटरवरील रुग्ण झोपाळल्यासारखे दिसतात त्यामागे हेच कारण आहे. असे असले तरीही येथे एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि ती म्हणजे व्हेंटिलेटर ही केवळ मानवी श्वसनयंत्रणेला आधार देणारी यंत्रणा आहे. त्याव्यतिरिक्त हृदय आणि इतर इंद्रियांचे कार्य नैसर्गिकरीत्या सुरू असते. व्हेंटिलेटरमुळे प्राणवायूचा चांगला पुरवठा होत असल्याने इतर इंद्रियांचे कार्यही चांगले चालण्यास मदत होते.

अशावेळी रुग्णाच्या स्वरयंत्रामधून एंडोट्रॅकियल टय़ूब घातलेली असल्याने त्याला/तिला बोलता येत नाही. या कारणास्तव तुमचा रुग्ण तुमच्याशी बोलू शकत नसला तरीही त्यांना दिसत असते, ऐकू येत असते व तुम्ही बोललेले समजतही असते. आजारातून बरे होण्याच्या मार्गावर असलेले रुग्ण आपले म्हणणे कागदावर लिहून दाखवून संवाद साधू शकतात. हातवारे, हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी सॉफ्टवेअर किंवा ‘व्होकलायझर’सारखी आयपॅड आधारित अ‍ॅप्लिकेशन्स यांचाही वापर ते करू शकतात.

रुग्णाची तब्येत सुधारू लागल्यावर त्याचे व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व हळूहळू कमी केले जाते. या प्रक्रियेला व्हेंटिलेटरपासून विलगन – ‘विनिंग फ्रॉम द व्हेंटिलेटर’ असे म्हटले जाते. फार गंभीर स्थितीमध्ये नसलेल्या रुग्णांना ‘नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन’चा आधार दिला जातो. अशा प्रकारच्या व्हेंटिलेशनमध्ये रुग्णांच्या तोंडात एंडोट्रॅकियल टय़ूब न टाकता मास्कच्या माध्यमातून व्हेंटिलेटरशी जोडले जाते. या पद्धतीमध्ये रुग्ण नेहमीसारखे बोलू शकतात, खाऊ शकतात व खोकू शकतात.

 

आपण श्वास आत घेतो त्यावेळी फुप्फुसाचे स्नायू फुगतात. त्यातून आत घेतलेल्या हवेमुळे छातीच्या पोकळीत निगेटिव्ह प्रेशर तयार होते. याला व्हेटिलेशन असे म्हणतात. सामान्य व्हेंटिलेटरमुळे फुप्फुसात हवा फक्त ढकलली जाते. त्यासाठी श्वसनमार्गात ट्यूब टाकून रुग्ण श्वासोच्छ्ास करतो. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णाला अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) तयार होतो. त्यातून फुप्फुसे कमकुवत होतात. सामान्य व्हेटिलेटर निरोगी फुप्फुसाना यांत्रिक बळ देतात. एआरडीएसमध्ये अकार्यक्षम फुफ्फुसांचे कार्य करणाऱ्या व्हेंटिलेटरची गरज असते. त्यामुळे सामान्य हेटिलेटरला मर्यादा पडते. कारण, या रुग्णाला फक्त ऑक्सिजन द्यायचा नसतो, तर फुप्फुसाचे कार्य करणाऱ्या व्हेंटिलेटरची गरज असते.

प्रगत व्हेंटिलेटरची वैशिष्ट्ये (व्हेंटिलेटरमध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर)

  1. फुप्फुसाचे कार्य दर्शविणारे मॉनिटर
  2. रुग्णाच्या बदलत्या गरजाप्रमाणे मशिनमध्ये होणारे बदल
  3. फुप्फुसाना व्हेंटिलेटरमुळे इजा होऊ नये याची दक्षता घेणारी अलार्म यंत्रणा
  4. रुग्णाच्या फुप्फुसाचे कार्य नियंत्रित करण्याची सुविधा
  5. व्हेंटिलेटरमधील व्हॉल्व्हच्या माध्यमातून श्वासोच्छ्ासास मदत होते

अत्यवस्थ रुग्णाला व्हेंटिलेट करण्यासाठी सर्वात अवघड असतो. कोरोनामुळे होणारी गुंतागुंत ही या प्रकारातील आहेत. त्यामुळे साधे व्हेटिलेटर कोरोनाबाधिताला उपयुक्त ठरणार नाही.कारण, यात रुग्णाच्या फुफ्फुसाला संसर्ग झालेला असतो.