| |

पूजेसाठी वापरला जाणारा कापूर आरोग्यासाठीही लाभदायक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येकाच्या घरात देवाची पूजाअर्चना करण्यासाठी कॅम्फर अर्थात कापराचा वापर केला जातो. कापराचा गंध अत्यंत तीव्र असतो. कापूर एक सेंद्रिय घटक आहे. शिवाय तो त्याच्या वैद्यकीय वैशिष्ट्यांमुळे आरोग्याशी संबंधित व्याधींसाठीही वापरता येतो. कारण कापरामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, एनाल्जेसिक, अँटीसेप्टिक आणि अँटी-कंन्जेटिव्ह गुणधर्म आहेत, ज्यामुळे कापराचे नैसर्गिक औषधांमध्ये एक स्थान झाले आहे.

मुख्य म्हणजे, कापराचे सेवन न करता त्याचा आरोग्यासाठी वापर केला जातो. वारंवार खोकला येणे, कफ जमा होणे ते चामखीळ आणि कीटक चावल्याने उद्भवणाऱ्या त्वचेच्या इतर समस्या कापूर दूर करतो. कापूर आवश्यक तेलाच्या रूपात किंवा घन मेणाच्या गोळ्याच्या स्वरूपात बाजारात मिळतो. चला तर जाणून घेऊयात कापराचे आरोग्याशी संबंधित फायदे-

१) खोकला येणे – छातीत जळजळ होणे आणि खोकला यासारखे आजार वारंवार होत असतील तर त्यावर कापूर गुणकारी आहे. यासाठी एक चमचा बदाम तेलामध्ये साधारण ४ ते ५ कापूर मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित घोळून नंतर छातीवर हळूवारपणे मालिश करा. शिवाय कापूरच्या या तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून आपण त्याची वाफ देखील घेऊ शकता. याने नक्कीच आराम मिळेल.

२) स्नायूंच्या वेदना – कापराचे दाहकविरोधी गुणधर्म स्नायूंच्या वेदनांचे उपचार करण्यास अत्यंत प्रभावी आहेत. या व्यतिरिक्त वेदनादायक स्नायूंना मालिश करण्यासाठी कापूर तेलाचा वापर केल्याने त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. तसेच सांध्यातील वेदनादेखील दूर होतात. यासाठी तिळाच्या तेलात कापूर मिसळून सांध्याची मालिश करणे लाभदायक असते.

३) मुरुम – कापराचे दाहक विरोधी गुणधर्म मुरुम, सूज, लालसरपणा आणि त्वचेचा जळजळपणा कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. शिवाय टी ट्री ऑईल आणि कापूर तेल एकत्र मिसळा आणि कापसाच्या मदतीने बाधित भागावर लावा. अगदी काहीच दिवसात याचा फरक दिसेल.

४) केसांमध्ये उवा/लिका – कापूर अँटिफंगल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे कापूर आणि नारळाचं तेल एकत्र करून केसांना लावल्याने केसातील उवा आणि लिकांचे प्रमाण हळहळू कमी होते आणि कालांतराने या समस्यांपासून मुक्ती मिळते.

५) त्वचेवरील खाज – त्वचेला सतत खाज सुटत असेल तर साहजिकच आपण खाजवणार आणि यामुळे त्वचा लाल किंवा उग्र होऊ शकते. परिणामी त्वचेवर फोड देखील येऊ शकतात. असे होऊ नये, म्हणून खाज सुटल्यास आणि जळजळ होत असल्यास कापराचं तेल वापरा. यामुळे त्वचेला थंडावा जाणवतो आणि आराम मिळतो.