खरंच नागीण आजार जीवावर बेतू शकतो का? ‘अशी’ घ्या काळजी आणि उपचार
हॅलो आरोग्य ऑनलाईन : “नागीण” या आजाराचे नाव ऐकल्यावरच अंगाचा थरकाप उठतो. अंधश्रद्धेमुळे या आजाराविषयी समज कमी तर गैरसमज जास्त आहेत . नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका असतो परंतु तो जीव जाण्या इतपत नक्कीच नसतो. खरं तर योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करता येतो. त्यासाठी योग्य वेळेस औषधोपचार करायला हवे. नागिणीचा आजार कशा मुळे होतो, त्याची लक्षणे, आणि त्यासाठीचे काय औषधोपचार आहे आणि काय काळजी घ्यावयाची असते हे जाणून घेऊ…..
नागीण नावाच्या आजाराचे आयुर्वेदिक नाव विसर्प असे आहे. सापाप्रमाणे गती असलेला आजार म्हणजे विसर्प. आयुर्वेदानुसार पित्त वाढल्याने हा रोग होतो, खरेतर हा एक त्वचा रोग आहे.आधुनिक शास्त्रानुसार याचे नाव ‘हर्पिझ झोस्तर’ असे आहे. हा एक संसर्ग आहे. हा आजार मज्जातंतूच्या मार्गानुसार पसरत जा तो. आजार जसजसा वाढत जातो तसतशी नर्व रूट व्यस्त होत जाते, नर्वचा मार्ग पूर्ण झाला किंवा विळखा जर पूर्ण झाला तर आजार जास्तच बळावतो व माणूस दगावण्याचा धोका असतो म्हणून ही गैरसमजूत बोकाळली आहे.
हा आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते. या रोगात खूप खाज व दाह जाणवतो. खाजेने अगदी त्रस्त व्हायला होते, ही खाज कमी होत नाही. नवीन शास्त्रानुसार यावर ‘असायक्लोवीर’ नावाचे औषध सांगितलेले आहे. याने आजार लगेच बारा होतो पण त्यानंतर बराच काळ दाह व खाज जाणवत राहते. याच कारणाने आयुर्वेदिक तज्ञांचे मतही विचारात घेतले जायला हवे.
जोपर्यंत शरीर पित्तापासून व दुषित रक्तापासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत आजार बरा झाला असे म्हणता येणार नाही. आयुर्वेदात यावर रक्तमोक्षण, जालौवाकारक्षण असे काही उपाय सुचवले गेले आहेत. याने पित्त शुद्ध होऊन दाह कमी होतो. लेप व पंचकर्म केल्यानेही या आजारापासून सुटका मिळू शकते. तांदळाच्या पिठात दुर्वांचा लेप करून लावल्यास नागीण बरी होते. कोणतेही लेप वापरताना वैद्यकीय सल्ला घेतलेला चांगला.
उपचार
या आजारावर असायक्लोवीर नावाचे गुणकारी औषध आहे. वेळेत इलाज सुरु केल्यास नागिण वेळीच बरी होऊ शकते. हे औषध महाग आहे. ज्याला आजार झाला आहे त्याला दिलासा द्यावा. जास्त दुखत असल्यास अस्पिरीन द्यावी. आजार लवकर बरा होतो. त्यानंतरही जर दुखत राहिले तर तज्ञांना दाखवावे. काही आजाराची नावे ही त्याच्या स्वरूपानुसार, गतीप्रमाणे ठेवलेली असतात पण म्हणून त्याचा संबंध एखाद्या प्राण्याशी असतोच असे नाही. नागीण झाली म्हणजे तुम्ही एखाद्या नागाला मारले होते किंवा नागाची पूजा करायला हवी या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. इतर उपचार- वेदना कमी करण्यासाठी थंड (बर्फाच्या) पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. ओटमील मिश्रण जखमेवर पसरावे अथवा कॅलामाईन किंवा स्टार्च लावल्याने खाज व दाह कमी होतो. विश्रांती घ्यावी, सुती कपडे वापरावेत.
नागिण होण्यामागील कारणे:
उन्हाळा सुरू झाल्यास वाढत्या तापमानामुळे साथीचे आजार पसरतात. या ऋतूत विषाणू जास्त पसरतात आणि सक्रिय असतात. लहान मुलांमध्ये कांजण्या होतात. लहानपणी होणाऱ्या कांजण्यांमुळे त्या आजाराचे विषाणू रुग्णात मज्जारज्जू मध्ये वास्तव्य करतात. शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी झाल्याने हे सुप्त विषाणू जागृत होऊन नागिणीचा आजार पसरवतात. मधुमेह, प्रतिरोधक शक्ती कमी करणारे औषधे, एड्स, केमोथेरपी मध्ये वापरल्या जाणार्या औषधांमुळे शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती कमी होते आणि नागिणीचा आजार उद्भवतो.
सामान्यपणे पुढीलपणे लक्षणे जाणवतात:
- नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागात दुखायला लागते.
- त्वचा हुळहुळी होऊन त्वचेची प्रचंड आग होते. आणि चमका हि येतात.
- 2 -3 दिवसानंतर लाल पुरळ येतात. नंतर ते फोड बनतात, आणि त्या फोडांमध्ये पाणी होते.
- ज्या नसेवर ते फोड होतात त्या नसेची त्वचा लालसर होते.
या आजारात घ्यावयाची काळजी :-
- जास्त दगदग टाळावी.
- हलका आहार घ्यावा.
- अंघोळी नंतर जागा टिपून घ्यावी.
- स्वतःचे कपडे, साबण, अंथरूण, पांघरुणं, वेगळे ठेवावे.
- स्वच्छता बाळगावी.
नागिणीने विळखा मारला, किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळले की जीवास धोका असतो असे गैरसमज आहे. पण ह्यात काहीही तथ्य नाही. नागीण ही शरीराच्या एका बाजूस येते, काही वेळेस एकाच नसेवर हा आजार होतो. इतर वेळेस दोन-तीन किंवा अधिक नसांना ह्या आजाराची लागवणं लागू शकते. वेळेवर उपचार केल्यास रुग्ण पूर्ण पणे बरा होतो. या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित 48 तासातच वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्ण 5 -7 दिवसांत पूर्णपणे बरा होतो. नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ल्याने औषधोपचार करावे. गोळ्यांचा पूर्ण डोस घ्यायलाच हवा.