| |

ढोबळी मिरची कशीही खाल्लात तरी आरोग्यासाठी फायदेशीरच असते; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सर्वसाधारणपणे कोणत्याही बाजारात ढोबळी मिरची अगदी सहज उपलब्ध असते. हा फक्त रंगांमध्ये तेवढा फरक पडतो. लाल, हिरवी, पिवळी, पांढरी, जांभळी, गुलाबी आणि एक वेगळी जात म्हणजे जलपीनो ढोबळी मिरची. हि जलपिनो ढोबळी मिरची दिसायला फारच आकर्षक असते. पण या सगळ्यातही विशेष आणि खास गोष्ट अशी की ढोबळी मिरची कोणत्याही रंगाची किंवा जातीची असली तरीही आरोग्यासाठी फायदेशीरच असते. आपल्या घरात सर्व साधारणपणे ढोबळी मिरचीची मसाला आणि तिखट मिरचीचा वापर करून भाजी बनते. याशिवाय भरलेली ढोबळीसुद्धा चवीने खाल्ली जाते. तसेच व्हेज कुर्मा आणि पुलाव बनविण्यासाठी सुद्धा ढोबळी मिरचीचा वापर होतो. तसेच चायनीज नूडल्स असो किंवा मग पिझ्झा, बर्गर यातसुद्धा कलरफुल ढोबळी मिरची वापरली जाते. म्हणजे एकंदर काय असं नाहीतर तसं ढोबळी मिरची आपल्याकडून खाल्लीच जाते. पण जे लोक मुद्दाम शोधून शोधून मिरचीचा भाग वेगळा करतात. हा लेख त्या लोकांसाठी आहे. कारण पुढील माहिती वाचल्यानंतर कदाचित तुम्ही मिरचीचा भाग शोधून शोधून खाल.

– ढोबळी मिरचीचे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्याला अनेको फायदे मिळतात. पोटातील अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊयात ढोबळी मिरची खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ – ढोबळी मिरची कच्ची किंवा शिजवलेली दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॉमिन सीचे प्रमाण अधिक असते. याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्या रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होण्यासाठी होतो. शिवाय यामुळे फ्लू आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून आपले रक्षण होते.

२) अॅंटी इंफ्लेमेटरी गुणधर्मयुक्त – ढोबळी मिरचीमध्ये अॅँटी इंफ्लेमेटरी गुण समाविष्ट असतात. ज्यामुळे आपल्याला हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेहा या आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

३) पोटांच्या अल्सरवर आराम – ढोबळी मिरची खाल्ल्याने आपल्या पोटाचे हानीकारक बॅक्टेरीयांपासून संरक्षण होते. परिणामी पोटाचे अल्सर रोखण्यासाठी हि प्रक्रिया उपयुक्त ठरते. इतकेच नव्हे तर ढोबळी मिरचीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे अपचनाचा त्रास साहजिकच कमी होतो.

४) स्मरणशक्तीत सुधार – ढोबळी मिरची खाल्याने चाळीस वर्षावरील व्यक्तींच्या कोंग्निटिव्ह फंक्शन अर्थात आकलन क्षमता सुधारण्यास मदत होते. परिणामी कितीही वय होउदे तुमची स्मरणशक्ती एकदम तल्लख राहील.

५) बंद नाकाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर – ढोबळी मिरचीचे सेवन केल्याने नाकातील वायुमार्ग साफ होतो. त्यामुळे ज्या लोकांना बंद नाकामुळे त्रास सहन करावा लागतो त्यांच्यासाठी ढोबळी मिरची खाणे नक्कीच फायदेशीर ठरते.

६) वजन कमी करण्यासाठी मदतशीर – ढोबळी मिरचीमुळे शरीराचा मेटाबोलिझम रेट सुधारतो. परिणामी वाढते वजन कमी करण्यास मदत होते.