| |

उचकी लागतेय का? ‘ही’ आहेत उचकी लागण्याची कारणे, उपाय आणि त्याबद्दलच्या मजेशीर गोष्टी  

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की, उचकी लागली म्हणजे नक्कीच कोणीतरी तुमची आठवण काढत आहे. पण उचकी लागणं ही साधारण गोष्ट आहे. सामान्यतः उचकी लागल्यावर काही वेळाने आपोआप थांबते. बरेचदा पाणी प्यायल्याने किंवा दीर्घ श्वास घेतल्यानेही उचकी थांबते. पण कधी कधी बराच वेळ उचकी थांबत नाही. उचकी येण्यामागची नेमकी कारणं आणि त्यावरील काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. ह्याला उचकी किंवा हिचकी म्हणतात आणि इंग्रजीत ह्याला Hiccup (हिक्कप) म्हणतात कारण जेव्हा उचकी लागते तेव्हा “हिक” असा आवाज येतो. मग आता हिचकी का लागते हे पाहण्याअगोदर ह्याबद्दल चार मजेदार गोष्टी पाहूया.

  • चार्ल्स ओसबोर्न नामक व्यक्तीच्या नावावर गिनीज बुकचा विश्वविक्रम आहे – सगळ्यांत जास्त वेळेसाठी उचकी राहण्याच्या. त्याला पहिली उचकी १९२२ मध्ये सुरु झाली आणि ती नियमितपणे १९९० पर्यंत चालूच राहिली. तब्बल ६८ वर्ष!!!! तो एका दिवसाला २४००० वेळा उचकी द्यायचा म्हणजे ६८ वर्षात एकूण 595,680,000 वेळा.!!
  • फ्लोरिडात राहणाऱ्या १५ वर्षाच्या मुलीला एका मिनिटांत ५० वेळा उचकी आलेली आहे. हा सुद्धा विश्वविक्रमच आहे.
  • गर्भात असलेल्या लहान बाळांनासुद्धा उचकी लागते.
  • कासव, पक्षी, सरडे ह्यांना सोडून बाकी सगळ्या प्राण्यांना उचकी लागते.

उचकी म्हणजे नेमकं काय?

डायाफ्राम नावाच्या मांसपेशी हृदय आणि फुफ्फुस्साला पोटापासून वेगळं करतात. श्वासोश्वाच्याबाबतीतही यांची मुख्य भूमिका असते. जेव्हा या मांसपेशींमध्ये काही कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन होतं तेव्हा आपल्या फुफ्फुस्सांमध्ये हवा जाण्यासाठी जागा तयार होते. जेव्हा या मांसपेशींचं आकुंचन वारंवार होऊ लागतं. तेव्हा आपल्याला उचकी लागते. उचकी लागल्यावर जो आवाज येतो तो ग्लोटिस (वोकल कॉर्ड्स म्हणजेच कंठातील मोकळ्या जागेतून) च्या लवकर-लवकर बंद होण्याने येतो.

उचकी का लागते?

वरील परिस्थिती नेमकी कशी निर्माण होते आणि उचकी येण्यामागे ठराविक असं कारण नाही. पण काही सामान्य कारणे पुढीलप्रमाणे.

  • मद्यपान किंवा एअरेटेड कोल्ड ‌ड्रिंक्स प्यायल्याने. स्मोकिंग केल्याने.
  • तणाव, घाबरणं, अतिउत्साह यामुळेही बरेचदा उचकी लागते.
  • हवेच्या तापमानात अचानक बदल झाल्यानेही उचकी लागू शकते.
  • गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने, खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने आणि घाईघाईत खाल्ल्याने.

 

उचकी थांबण्यासाठी काही उपाय

खरंतर उचकी काहीवेळाने आपोआप थांबते. पण बऱ्याच वेळानेही उचकी न थांबल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

  • थंड पाणी प्या किंवा बर्फाचा खडा तोंडात ठेवून हळूहळू चोखा.
  • दालचीनीचा एक तुकडा तोंडात टाकून तो चघळा.
  • दीर्घ श्वास घ्या आणि जेवढं शक्य असेल तेव्हा रोखून धरा. असं दोन तीनदा केल्यासही उचकी थांबते.
  • लसूण, कांदा किंवा गाजराचा वास घ्या.
  • काळी मिरी वाटून बारीक चूर्ण करा. दोन ग्रॅम चूर्ण मधात मिसळून खा.
  • जीभेखाली साखरेचा खडा किंवा चॉकलेट धरा आणि ते चघळा.
  • जमीनीवर आडवं व्हा आणि गुडघे तुमच्या छातीजवळ घ्या. असं केल्याने डायाफ्राममधील गडबड लगेच दुरूस्त होते.
  • 20 ग्रॅम लिंबाच्या रसात 6 ग्रॅम मध आणि थोडंसं काळ मीठ मिक्स करा आणि हे चाटण चाटा.

घरगुती उपायांनीही उचकी न थांबल्यास काय करावं?

खरंतर उचकी तुम्हाला 48 तासांपर्यंत वारंवारही येऊ शकते. पण हा त्रास जास्त होऊ लागल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण वारंवार लागणारी उचकीही बरेचदा दमा, निमोनियासारख्या श्वासांनिगडीत रोगांचीही संकेत असते.