| | |

सावधान!!! दमा ठरतोय जीवघेणा; ‘अशी’ घ्या आपल्या फुफ्फुसाची काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन : कोव्हीड १९ या विषाणूची लागण झाल्यावर सर्वात मोठा त्रास हा फुफ्फुसाचा असतो. रुग्णाला श्वास घेण्यात येणारी अडचण हीच मोठी त्रासदायक गोष्ट आहे. हे झाले कोरोनाचे पण अलीकडल्या काळात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दम्याला अस्थमादेखील संबोधतात. दमा हा फुफ्फुसातील श्वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषतः श्वास सोडण्यास त्रास जाणवतो. दम लागण्याची अनेक कारणे आहेत. शरीरात रक्ताची उणीव, हृदयविकार, निकामी मूत्रपिंड अथवा शरीरावर अतिरिक्त चरबी (लठ्ठपणा) आदी कारणांमुळेही दम लागू शकतो. मात्र, त्याला दम्याचा आजार म्हणत नाहीत. फुफ्फुसाच्या आत असलेल्या श्वसनवाहिन्यांवर सूज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो. त्यात स्राव वाढून वाहिन्या आकुंचन पावतात. अशा वेळी श्वास सोडताना त्रास होतो. एकूणच हा फुफ्फुसाचा आजार आहे.

दम्याची लक्षणे

श्वसनवाहिन्यांवर आलेल्या सुजेमुळे व आतल्या स्रावामुळे फुफ्फुसाच्या क्रियेत अडथळा येतो. त्यामुळे दम लागत असतो. अशा वेळी जे कार्य आपण पूर्वी करीत होतो, तेच आता करताना अधिक त्रास जाणवतो. पूर्वी घरात एक मजला चढून जाताना दम लागत नसे; मात्र नंतर तोच एक मजला चढून गेले तरी दम लागतो. हा दम्याचा त्रास असू शकतो. याशिवाय घरकाम करताना उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या धुळीमध्ये अनेक ऍलर्जीकरक घटक असतात. त्यातील प्रमुख म्हणजे ‘हाउस डस्ट माइट’. धुळीमुळे अनेक लोकांना ऍलर्जी होऊन दमा होतो. वारंवार सर्दी व खोकलादेखील होतो अशा वेळी केवळ खोकला आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, हा खोकला दम्यामुळेच असू शकतो. ढोबळमानाने पुढील लक्षणे दिसू लागतात.

 • व्यायाम करताना श्वास भरुन येणे.
 • जोरजोरात श्वास घेणे, थकवा येणे.
 • श्वास घेताना छातीतून आवाज येणे.
 • रात्री आणि सकाळी स्थिती गंभीर होणे.
 • थंड हवेत श्वास घेतल्यावर त्रास होणे.
 • कफ असलेला खोकला किंवा कोरडा खोकला.
 • छातीत भरुन आल्यासारखे होणे.
 • श्वास घेण्यास त्रास होणे

दम्याची कारणे

दम्याचा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. अनुवांशिकता हे दम्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. घरात कुणाला दम्याचा आजार असेल, तर अन्य सदस्यांना दमा होण्याची शक्यता असते. दमा होण्यासाठी ऍलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला अथवा ऍलर्जी असलेल्या गोष्टींचे सेवन केले, तर रक्तातील काही घटक वाढतात. त्यातील ‘इसोनिओफिल’ नामक घटक वाढतो. त्यामुळे श्वासवाहिन्यांवर सूज येते. वातावरणाचा आणि दम्याचा फार जवळचा संबंध आहे. हिवाळा अथवा थंड वातावरण, धूळ व प्रदूषणयुक्त वातावरणदेखील दम्याचा आजार होण्यास पोषक असतात. वातावरणातील प्रदूषणही दम्याचा आजार होण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय ब्रॉन्कायटिस, दीर्घकाळ असलेला कफ यामुळे दम लागू शकतो. धूम्रपान दम्याच्या आजारासाठी कारणीभूत ठरते. याशिवाय नियमित होणारे व्हायरल इन्फेक्शन (स्वाइन फ्ल्यू आणि आता कोव्हिड-१९) दम लागण्यास कारणीभूत ठरत आहे. सतत धुराशी निगडीत कार्य करणारे, पेंटिंग व्यवसायिक अथवा स्प्रे पेंटशी संबंधित काम करणारे, खाणीत काम करणारे, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला दमा होण्याची शक्यता असते. मात्र, या सगळ्यांच्या संपर्कात ते किती वेळेपर्यंत होते, त्याने फुफ्फुसावर किती परिणाम केला व प्रतिकारक शक्ती कशी आहे यावरून त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात.

दम्याचे निदान कसे होते?

डॉक्टर वैद्यकीय परीक्षण करून दम्याचे निदान करतात. या वेळी ते परिवारात कुणाला दमा आहे का आदींची विचारणा करतात. ‘पीक-फ्लो’ मीटर नामक यंत्राद्वारे तुमची हवा फुंकण्याची क्षमता तपासून फुफ्फ्साची क्षमता तपासली जाते. त्यामुळे दमा आहे की नाही याचे प्राथमिक निदान करता येते. फुफ्फुस कार्यान्वयन चाचणी (स्पायरोमीटरी) : दमा आहे की नाही, याचे ठोस निदान करण्यासाठी हि चाचणी करतात.  त्यास ‘स्पायरोमीटरी’ असे म्हणतात. याशिवाय रक्ताची तपासणी, एक्स-रे काढणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे, अन्य आजारांमुळे तर दम लागत नाही याची चाचणी करण्यासाठी अन्य तपासणी कराव्या लागतात. हदयविकार कारणीभूत असल्यास इको काढून दम्याचे निदान करता येते.

उपचाराची पद्धत:

 • दम्याची लक्षणे ओळखून वेळीच डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा.
 • जास्तीत जास्ती केसेसमध्ये इन्हेल्ड स्टेरॉइड आणि इतर अँटी इंफ्लामेटरी औषधे दिली जातात.
 • ब्रोंकॉडायलेटर्स श्वसननलिकेतील मांसपेशींना आराम देते.
 • इन्हेलरचाही उपचार म्हणून वापर केला जातो.
 • वेळीच जर या आजाराचे निदान झाले आणि योग्य उपचार केले तर दमा किंवा अस्थमा दूर करणे शक्य आहे

दम्याचा त्रास नियंत्रणात येऊ शकतो किंबहुना पूर्णता बराही होऊ शकतो. तुम्हाला जर दमा असल्याचं निष्पन्न झाल तर घाबरूण जाऊ नका. दमा म्हणजे आयुष्यभराचा सोबती अशीच काहीशी समज सर्व स्थरावर आहे. योग्य पथ्य व काळजी घेतल्यास दमा पुर्णता नियंत्रणात आणता येऊ शकतो. इन्हेलर पंप थेरपीद्वारे दम्यावर उपचार करता येतात. विशेष बाब म्हणजे आता काही प्रकारच्या बिकट दम्यावर ब्रोन्कीयल थर्मोप्लास्टी या अत्याधुनिक उपचारपद्धतीद्वारे इलाज होऊ शकतो. पूर्वी ही उपचारपद्धती फक्त परदेशातच उपलब्ध होती. आता मात्र आपल्याकडेही ही नवीन उपचारपद्धती काही ठिकाणी कार्यरत झाली असल्यानं अशा प्रकारच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

अस्थमा असलेल्या रुग्णांनी कशी काळजी घ्यावी?

 • घरातील हवा खेळती रहावी. हवा स्वच्छ ठेवणारे प्युरीफायर अथवा एसी वापरावा. तसंच ओलसर भिंतीमुळेही दम्याचा त्रास वाढू शकतो.
 • कुठेही बाहेर प्रवास करत असाल किंवा प्रदुषणसदृष्य विभागात गेल्यास नाकाला मास्क लावणं आवश्यक.
 • घरातील पडदे नेहमीच झटकून ठेवा. बेडशिट्स, रोजच्या वापरातील कपडे दिवसाआड गरम पाण्यानं धुवा. एकंदर, तुमचं राहतं घर नेहमी स्वच्छ व प्रसन्न असलं पाहिजे.
 • गडद (हार्ड) सुंगंध असलेले परफ्युम वापरु नका.
 • काही पदार्थ खाल्ल्यानं अॅलर्जी येऊ शकते. उदा. चायनीज फूड ज्यामध्ये अजिनोमोटो व व्हीनेगरचा वापर होतो. अशा पदार्थांची यादी बनवून असे पदार्थ खाणं शक्यतो टाळा.
 • घरातील पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे दमा वाढण्याची शक्यता असते.

आणखी घरगुती उपाय

 1. दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ सहज सुटतो.
 2. खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खाल्ल्याने दम्याचा अ‍ॅटॅक कमी होतो.
 3. मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून, गरम पाण्याने शेकल्यास कफ पातळ होऊन सुटतो.
 4. रात्रीच्या वेळी 3 चमचे एरंडीचे तेल पिल्यास कफ बाहेर पडतो. त्यानंतर रुग्णास आराम मिळतो.
 5. हृदयरोग नसणा-या रुग्णांनी एक ग्लास गरम पाण्यात 5 ग्रॅम मीठ टाकून ते पाणी 1-1 चमचा या प्रमाणात दिवसभर पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो.
 6. आद्रक आणि मध घ्यावा तसेच पपई खावी.

हे करू नये – धूम्रपान, कफ वाढवणारा आहार जसे – दूध, दही, साबुदाणा, केळी, थंड पेय इत्यादींचे सेवन करू नये. एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये. रात्री जागरण, थंड हवेत फिरणे टाळले पाहिजे. दम्याच्या रुग्णांचे पोट नेहमी साफ राहिले पाहिजे. बद्धकोष्ठता होणा-या वस्तूंचे सेवन टाळावे. मैदा किंवा त्यापासून बनलेले पदार्थ, बटाटे, शिळे अन्न, हॉटेलचे जेवण टाळले पाहिजे.

नियमित व्यायाम व योग्य आहार आणि पथ्य या त्रिसूत्रीचा वापर करून आपण दम्याला दूरचं ठेऊ शकता  याशिवाय इतर आयुर्वेद चिकित्सा उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेले बरे.