| | | | |

हिवाळ्यात लवंगाचा चहा म्हणजे आरोग्यवर्धक अमृत; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ऋतुचक्रानुसार हिवाळा सुरु झाला असून सर्वत्र थंडी पडू लागली आहे. अश्या थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला आतून उष्ण ठेवण्यासाठी चहाशिवाय उत्तम पर्याय आणखी काय असू शकतो. फक्त हा चहा साधा सुधा नको. थोडासा मसालेदार हवा. तर थंडीची मजा येईल आणि आरोग्यालाही सजा होणार नाही. यासाठी एकतर आलं अतिशय परिणामकारक आहे आणि दुसरं म्हणजे लवंग. हो हो लवंग. आपल्या भारतीय स्वयंपाकात मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लवंग. या लवंगेचा उपयोग फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून नाही तर आयुर्वेदातही होतो. यामुळे लवंगाचा चहा अगदी आरोग्यदायी मानला जातो. चला तर जाणून घेऊयात लवंगाच्या चहा कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय ते खालीलप्रमाणे:-

० लवंगाचा चहा बनविण्यासाठी लागणारे साहित्य – लवंग ४ ते ५, १ ते २ चमचे मध, १ ग्लास पाणी

कृती – सर्वप्रथम लवंगा किंचित भाजून त्यांची पावडर करून घ्या. आता एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळायला ठेवा. त्यामध्ये तयार केलेली लवंगाची पावडर घाला आणि कमीत कमी ५ मिनिटे हे पाणी उकळा. आता हा तयार झालेला चहा गाळून घ्या. त्यामध्ये आपल्या चवीनुसार मध मिसळा आणि गरमागरम चहा प्या.

० लवंगांच्या चहाचे फायदे :-

१) प्रतिकारशक्तीत वाढ – लवंगांमध्ये भरपूर प्रमाणात अँटि ऑक्सिडंट असतात. यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होते. तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ (टॉक्सिन्स) कमी होतात. परिणामी शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

२) ताण कमी होतो – लवंगांचा चहा पिण्यामुळे स्ट्रेसची पातळी कमी होण्यास मदत होते. कारण लवंगाचा चहा पिण्यामुळे शरीरातील उत्साह वाढवणारे हॉर्मोन्स वाढतात आणि परिणामी ताणतणाव कमी होऊन मन आनंदी होते.

३) सर्दीच्या त्रासावर आराम – लवंगांचा चहा पिण्यामुळे सर्दी, ताप, खोकला, कफ अशा सर्व आजारांपासून सुटका होते. तसेच लवंगांचा चहा पिण्यामुळे ताप लवकर उतरतो.

४) सायनसवर गुणकारी – लवंगांमध्ये युजेनॉल नामक एक घटक असतो. या घटकामुळे कफ कमी होतो. तसेच शरीरातील उष्णता देखील वाढते. त्यामुळे लवंगांच्या चहाचे नियमित सेवन केल्यास सायनस, श्वसनमार्गातील इन्फेक्शन, छातीत साठणारा कफ या समस्यांवर गुणकारी लाभ मिळतो.

५) पचन सुधार – जेवण करण्यापूर्वी (दुपारी वा रात्री) १ तास आधी लवंगांचा चहा प्या. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. शिवाय लाळ निर्माण होण्याची क्रिया वाढते. परिणामी अन्नपचन करण्याची क्षमता वाढुन खाल्लेले अन्न सहजपणाने पचते. पोटदुखी, ऍसिडिटी यावरदेखील लवंगांच्या चहाचे सेवन गुणकारी आहे.

६) संधिवात – लवंगांच्या चहाचे नियमित सेवन केल्यास संधीवातावर गुणकारी लाभ प्राप्त होतो. असा चहा पिण्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.

७) दातदुखीवर आरामदायक – लवंगांमध्ये इन्फेक्शन कमी करणारे तसेच सूज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे दातांना वा हिरड्यांना इन्फेक्शन होऊन हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी लवंगाचा चहा नियमित प्या. दात दुखी असेल तर लवंगांच्या गरम चहाचे सेवन करावे तसेच दुखणाऱ्या दातावर कापसात गुंडाळून एक लवंग ठेवावी. खूप फायदा होतो.

८) तोंडाची दुर्गंधी दूर होते – तोंडाला येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी लवंगाचा चहा फायदेशीर आहे.

९) वजन कमी होते – लवंगांचा चहाचे नियमित सेवन केल्यास शरीराची पचनशक्ती सुधारते आणि चयापचयाचा दर वाढतो. यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होते.

१०) त्वचा विकारावर परिमाकारक – लवंगांच्या चहामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे निरनिराळ्या त्वचा विकारांवर लवंगांचा चहा पिणे गुणकारी आहे. कारण लवंगाच्या चहामुळे फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.