|

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तिसर्‍या टप्प्यात किती प्रभावशाली?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तिसर्‍या टप्प्यात ७७.८% प्रभावी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलेला आहे. कंपनीने गेल्या आठवड्यातच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्थात DCGI कडे चाचणी डाटा सादर केला होता. यावर मंगळवारी विषयतज्ज्ञ समितीची विशेष बैठक झाली आणि तिसर्‍या टप्प्यातील लस चाचणीचा डाटा मंजूर झाला. यानंतर भारत बायोटेकच्या वतीने हा अहवाल केंद्र सरकारच्या समितीसमोर सादर केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी २५ हजार ८०० लोकांवर घेण्यात आली आणि यात असे दिसून आले की, ही लस कोरोनाविरूद्ध प्रभावी आहे.

एस ई सी’च्या मान्यतेनंतर हा डाटा जागतिक आरोग्य संघटनेसमोर (WHO) सादर केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा डाटा अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पीयर-रिव्यू केलेल्या जर्नलमध्ये पूर्णपणे प्रकाशित करण्यात आलेला नाही. हि कोव्हॅक्सिन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR च्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेकने बनवलेली आहे आणि याकरिता भारत बायोटेकने पॅनेशिया बायोटेक, हेस्टर बायो आणि ज्युबिलंट फॉरनॉव यांच्याशी करार केला आहे.

महिन्याच्या सुरुवातीला भारत बायोटेक असे म्हणाले होते की, औषध नियमकांना सादर केल्यानंतर साधारण तीन महिन्यांच्या मुदतीत हा डेटा प्रसिद्ध करणार. मिळालेल्या माहितीनुसार, या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटने (WHO) कडून येत्या जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ च्या दरम्यान आपत्कालीन परिस्थितीवर मत करण्यासाठी लस वापराची मंजूरी मिळण्याची तीव्र शक्यता आहे. संदर्भात बोलताना कंपनीने असे सांगितले आहे की, ६० देशांमध्ये कोव्हॅक्सिनसाठी मान्यता मिळवणे सुरू आहे. यामध्ये कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. याकरिता मंजुरीसाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) जिनेव्हामध्ये अर्ज देण्यात आला आहे.