| | |

दैनंदिन जीवनात काळ्या मिठाचे सेवन अत्यंत गुणकारी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न. अन्नाविना माणसाची बुद्धी, तत्व, सत्त्व आणि अस्तित्व सारे काही मातीमोल आहे. चमचमीत आणि रुचकर अन्नाने पोट आणि मन दोन्ही भरून पावत. पण हे अन्न चविष्ट होण्याकरिता आवश्यकता असते ती मिठाची आणि काळे मीठ अन्नाची चवही वाढवते आणि आरोग्याची काळजी देखील घेते. कारण त्यात असणारे खनिज आपली हाडे मजबूत करतात. शिवाय पोटाशी निगडित आजारांपासून देखील आराम मिळतो. इतकेच नव्हे, तर आणखी अनेक फायदे काळ्या मिठामुळे होतात. हे फायदे जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल.

काळ्या मिठाचे सेवन बद्धकोष्ठता आणि पोटफुगीपासून आराम देण्यास लाभदायक असते. जर आपल्याला अपचन, गॅस, ऍसिडिटी वा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर आपल्यासाठी काळ्या मिठाइतके योग्य असे दुसरे कोणतेच औषध नाही. तसेच अस्वस्थता वा मळमळ जाणवत असेल तर चिमूटभर काळ्या मिठाचे सेवन फलदायी ठरेल. शिवाय काळ्या मिठात असलेले लक्सेटीव्ह गुणधर्म पोटाशी संबंधित समस्येपासून आराम देते. एका संशोधन अहवालानुसार वेगवेगळ्या आयुर्वेदिक चूर्णांमध्येसुद्धा काळ्या मिठाचा वापर केला जातो. साधारण पांढऱ्या मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे सध्या मिठाचे सेवन वा अन्नातील जास्त वापरामुळे हाडे कमकुवत व गळण्याचा धोका संभवतो. यामुळे आपल्या आहारात काळे मीठ वापरावे.

नॅशनल सेंटर फॉर बायो टेक्नॉलॉजीच्या रिपोर्टनुसार, अधिक सोडियमच्या सेवनाने लठ्ठपणा वेगाने वाढतो. साध्या मिठाच्या तुलनेत काळ्या मीठात सोडियमचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे अन्नात काळ्या मिठाचा वापर करणे लाभदायक आहे. अनेकांना इलेक्ट्रोलाइट्सच्या अभावामुळे स्नायू अखडणे, कळ जाणे आणि वेदना होणे असे त्रास जाणवतात. इलेक्ट्रोलाइट्समध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतात. याची योग्य मात्रा काळ्या मीठात आढळते. यामुळे अंगदुखीच्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात.

जर आपल्याला बारमाही कफाचा त्रास असेल, तर काळ्या मिठाचा खडा तोंडात ठेऊन त्याचा रस चघळत राहा. असे केल्यानंतर किमान १.५ ते २ तास काहीच खाऊ पिऊ नये. यामुळे कफाच्या त्रासात आराम मिळेल. एका संशोधनानुसार, लहान मुलांना जास्त मीठ खायला देऊ नये. परंतु काळे मीठ आपण त्यांना देऊ शकतो. कारण काळ्या मिठात सोडियमचे प्रमाण कमी असल्याने लहान मुले ते सहज पचवू शकतात. याचा त्यांच्या पचनक्रियेवर कोणताही ताण निर्माण होत नाही व अन्न पचनाची क्रिया सुरळीत होते. या व्यतिरिक्त हृदयाचा कोणताही आजार होऊ नये म्हणून साध्या मिठाऐवजी काळे मीठ खाणे फायदेशीर आहे. तर हे होते काळ्या मिठाचे आरोग्यवर्धक फायदे.