मसूर डाळीचे सेवन कराल तर अनेक आरोग्याच्या समस्या होतील छूमंतर; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दैनंदिन जीवनातील दगदगीचे शेड्युल आपल्या शरीरास रोज थोडी थोडी हानी पोहचवत असते. यामुळे अनेकदा शारीरिक दुर्बलतेला बळी पडावे लागते आणि आजकाल या समस्येने ग्रासलेल्यांची संख्या मोठी होत चालली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मसूर डाळ फायद्याची ठरते. कारण, मसूर डाळ ही ऊर्जेचा चांगला आणि उत्तम स्रोत आहे. शिवाय यामध्ये सूक्ष्म पोषक घटक तसेच प्रीबायोटिक कार्बोहायड्रेट्स असतात आणि प्रीबायोटिक कार्बोहायड्रेट्स पचण्यास हलके असतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एक वाटी मसूर डाळीमध्ये २३० कॅलरी, १५ ग्रॅम फायबर आणि १७ ग्रॅम प्रथिने असतात. या व्यतिरिक्त लोह आणि प्रथिने यांनी समृद्ध असल्याने मसूर डाळ शाकाहारी व्यक्तींसाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊयात मसूर डाळीचे फायदे :-
१) शारीरिक दुर्बलता दूर करते
– मसूर डाळ ऊर्जेचा उत्तम स्त्रोत असल्यामुळे तिचे सेवन करणे शरीरास लाभदायक असते. दिवसभराच्या शारीरिक हालचालींसाठी शरीरास पूरक ऊर्जेची अत्यंत आवश्यकता असते. यामुळे शारीरिक कमकुवपणा किंवा थकवा जाणवत असल्यास मसूर डाळीचा आहारात समावेश करावा.
२) शरीरातील रक्ताचा अभाव
– शारीरिक दुर्बलता दूर करण्याबरोबरच मसूर डाळ रक्तही वाढवण्याचे काम करते. अशा स्थितीत ज्याच्या शरीरात कमकुवतपणा किंवा रक्ताचा अभाव असेल त्यांनी मसूर नियमितपणे खावे. यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते आणि रक्त वाढीस मदत मिळते.
३) पुरुषांमधील शुक्राणूंच्या गुणवत्तेत सुधार
– मसुरच्या डाळीमध्ये फॉलीक ऍसिड असते. हे पुरुष प्रजनन क्षमतेसाठी अतिशय सक्रियपणे कार्य करते. शिवाय काही पुरुषांमध्ये शुक्राणुंच्या गतिशीलतेची समस्या असेल तर त्यांनी मसूरचे पाणी पिण्याने निश्चित लाभ होतो.
४) कंबर – पाठदुखीमध्ये लाभ
– मसूरच्या डाळीचे नियमितपणे सेवन केल्याने कंबर आणि पाठदुखीपासून आराम मिळतो. यासाठी आधी १ वाटी मसुरची डाळ व्यवस्थितपणे बारीक करून घ्या. नंतर ते वाटण हलकेसे गरम करून दुखणाऱ्या कंबरेवर आणि पाठीवर हलक्या हाताने नीट लावून घ्या. हे असेच तासभर वाळवून नंतर पाण्याने स्वच्छ करा. असे केल्याने दुखण्याच्या समस्येतून त्वरित आराम मिळतो.
५) त्वचा रोगांपासून संरक्षण
– बदलते हवामान, चुकीची जीवनपद्धती आणि प्रदूषण यांचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. यामुळे जर तुमच्या त्वचेवर डाग येत असतील किंवा डोळ्यांत वा डोळ्याखाली सूज येण्याची समस्या असेल तर मसूर डाळीचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण ही डाळ त्वचेच्या विविध आजारांपासून संरक्षण करण्याची क्षमता ठेवते.