| | |

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका; माहित नसतील तर जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल अन्न, वस्त्र, निवारा, वायफाय यासह जंक फूड माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये घर करून बसले आहे. आधीची चुकीची जीवनशैली आरोग्याचा ऱ्हास करण्यात अग्रेसर आहे. त्यात जर तुम्हाला ब्रेड, पिझ्झा, बर्गर, पॅकबंद चिप्स आणि अगदी कोल्ड्रिंक पिण्याची सवय असेल तर मग तुम्ही स्वतःहून स्वतःच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहात. कारण हे सर्व पदार्थ सातत्याने खाणे कॅन्सरला आमंत्रण देण्याचे काम करतात. त्यामुळे जर तुम्ही जंक फूड खाण्याचे शौकीन असाल तर आताच सावध व्हा.

आरोग्य तज्ञ सांगतात कि, आपल्या दैनंदिन आहारातील अनेक पदार्थांमध्ये कार्सिनोजेनिक आणि म्युटेजेनसारख्या हानिकारक पदार्थांचा समावेश असतो. ज्यामुळे कर्करोगासारखा आजार होण्याची शक्यता बळावते. कारण पिझ्झा, बर्गर खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक आणि वेगाने वाढते. यामुळे शरीरात इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होते. यामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशी मोठ्या संख्येने विकसित होतात. म्हणूनच आज आपण या पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही अशा पदार्थांचे सेवन कमीत कमी कराल आणि आरोग्याची काळजी घेऊ शकाल.

1. पिझ्झा आणि बर्गर –
बर्गर, पिझ्झाच्या ब्रेडमध्ये हानिकारक केमिकल पोटॅशियम आढळते. ज्यामुळे ब्रेड पांढरा आणि मऊ, लुसलुशीत राहतो. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे किडनीचे विविध त्रास, थायरॉईड आणि कोलन कॅन्सरसारखे भयंकर आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पिझ्झा आणि बर्गर सारखे पदार्थ कधीतरी खा किंवा जर तुम्ही यांपैकी कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हे पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करा.

2. पॅकबंद चिप्स –
पॅक केलेल्या चिप्समध्ये फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. या पदार्थांची गुणवत्ता. चव तसेच रंग न बदलण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच चिप्समध्ये कृत्रिम रंग, टेस्ट आणि प्रिझर्व्हेटिव्हचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. हे घटक आपल्या पोटातील आतड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. त्यामुळे पॅकबंद चिप्सचे सतत सेवन केल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यात पोटाच्या कॅन्सरची शक्यता अधिक बळावते.

3. कोल्ड्रिंक –
कोल्ड्रिंकचे झाकण उघडल्यावर त्यातून येणारा फेस पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते. कारण या फेसात मेथिग्लायॉक्सलसारखी अन्न रसायने असतात. शिवाय हे पेय बनवताना त्यात फूड कलरचा मोठा वापर केला जातो. ज्यामुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढतात. त्यामुळे कोल्ड्रिंक पिणे आल्हाददायी असले तरी आरोग्यदायी नाही हे लक्षात ठेवा.

Pickle

4. लोणचं –
जेवणासोबत तोंडी लावायला विविध लोणची नियमित खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कारण मसालेदार लोणचे सामान्यतः नायट्रेट्स, मीठ आणि व्हिनेगरपासून बनवले जाते. तसेच लोणच्यामध्ये फूड कलर्सही टाकले जातात. तसेच पॅक केलेले लोणचे दीर्घकाळ टिकावे म्हणून यात प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेले असतात. परिणामी आरोग्यविषयक समस्या वाढतात आणि आजारांची सत्र सुरु होतात.

5. रिफाईंड ऑइल –
नियमित आहारासाठी जर तुम्ही रिफाइंड तेलाचा वापर करत असाल तर वेळीच हि सवय बदला अन्यथा भयानक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कारण रिफाइंड तेलामध्ये ट्रायग्लिसराइड, पॉलीअनसॅच्युरेटेड हि संयुगे असतात. जे आम्लाने शुद्ध केले जाते. ज्यामुळे शरीरातील आंतरक्रियांदमध्ये बाधा येते.