| | |

पदार्थाची चव वाढविणारी कोथिंबीर त्वचेसाठी लाभदायक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या जेवणाची चव वाढविण्यासाठी आणि पदार्थाचे रूप लक्षवेधी बनविण्यासाठी हिरवीगार कोथिंबीर अतिशय लाभदायी पर्याय आहे. त्यामुळे भारतीय आहारात तरी कोथिंबीरचा सर्रास वापर केला जातो. पण, कोथिंबीर जेवढी जेवणात महत्त्वाची तितकीच आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठीही महत्वाची ठरते. कारण तिचा आपले सौंदर्य खुलविण्यासाठी विशेष लाभ होतो. कोथिंबिरीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ब, व्हिटॅमिन क, फायबर, आयर्न आणि मॅगनीज यांसारखे बरेच पोषक घटक समाविष्ट असतात. त्यामुळे कोथिंबीर आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात कोथिंबीर आपल्या त्वचेची काळजी कश्या पद्धतीने घेते ते खालीलप्रमाणे:-

१) नैसर्गिक चमक – जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तेजस्वी आणि नैसर्गिक चमक हवी असेल तर तुम्ही कोथिंबिरीचा वापर नक्की करा. यासाठी कोथिंबीर वाटून घेऊन त्यात दुध, मध, लिंबू घालून मिक्सरच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून पेस्ट करून घ्या. आता हा घरगुती फेसपॅक आपल्या पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून ठेवा. हा फेसपॅक पूर्ण सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवून, कोरडा करा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेतील छिद्रांमध्ये जर काही धूळ वा धुळीचे कण अडकले असतील तर ते निघून जातील आणि चेहरा उजळण्यासाठी मदत होईल.

२) मुरुमाचे डाग कमी होतात – मुरुमांची समस्या जितकी बिकट तितकाच त्रास मुरुमांचे डाग जाण्यासाठी होतो. हे डाग घालवण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरी ते कमी होत नाही. अशावेळी लिंबाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात असणाऱ्या व्हिटामिन ‘सी’चा पुरेपूर फायदा करून घेता येतो. मात्र लिंबसोबत ओथिंबीर वापरली तर जास्त लाभ होतो. म्हणून त्वचेवरचे डाग फिकट होण्यासाठी कोथिंबीर आणि लिंबाचा रस एकत्र करुन तो फेसपॅकप्रमाणे चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. असे आठवडाभर केल्यास फरक दिसून येईल.

३) पिंपल्सच्या समस्येवर फायदेशीर – चेहऱ्यावर असणारे पिंपल्स हे आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. अशावेळी कोथिंबीर आणि लिंबू हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स लवकर कमी होतात. याशिवाय कोथिंबीरीच्या देठाचे पाणी चेहऱ्याला लावल्यानेही फायदा होतो.

४) चेहऱ्यावरील सुरकुत्या – वय वाढते तसे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते. अशावेळी चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी कोथिंबीरचा वापर करा. यासाठी कोथिंबीरची पाने वाटून ती कोरफडीच्या गरात मिसळा. आता हि पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

५) मृत त्वचा – कोथिंबीर त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. कोथिंबिरीतील पोषक तत्त्व त्वचेतील डेड स्कीन सेल्स काढून टाकतात आणि त्वचा सतेज होण्यास मदत करतात. यासाठी कोथिंबीर वाटून चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर हा फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.