| |

मक्याचे चविष्ट कणीस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या पावसाळी ऋतू सुरु आहे आणि पावसाळा सुरु झाला कि वेध लागतात ते मक्याच्या कणसाचे. कारण धो धो पावसात गरम – गरम मीठ, लिंबू चोळलेले मक्याचे कणीस खाण्याची एक अल्लग मजा असते. पण तुम्हाला माहित आहे का? हे चविष्ट कणीस आपल्या शरीरास अत्यंत फायदेशीर असते. होय.. कारण मक्याच्या कणसात नानाविध पौष्टिक आणि फॅटी अॅसिड उपलब्ध असतात. यामुळे मक्याचे कणीस फक्त पावसाळ्यातच नव्हे तर अन्य कोणत्याही ऋतूत खाणे अर्थात वर्षाचे १२ महिनेसुद्धा खाल्ले तरी फायद्याचेच असते.

  • चला तर जाणून घेऊयात मक्याच्या कणसाचे शरीरासाठी होणारे फायदे. खालीलप्रमाणे :-

१) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ – अनेक लोक सतत आजारी पडत असतात. याचे कारण म्हणजे रोग प्रतिकार शक्तीची कमतरता. त्यात पावसाचे दिवस आणखीच संसर्गांना बाळ देते. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या आहारात विशेष करून मक्याचे कणीस घ्यावे. कारण मक्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन बी ६, जस्त, मॅग्नेशियम असे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास सक्षम असणारे घटक समाविष्ट असतात.

२) व्हिटॅमिनने समृद्ध – मक्याचे कणीस पोषक तत्व, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियमने समृद्ध असते. शिवाय मक्याचे कणीस व्हिटॅमिन बी’चा अत्यंत चांगला स्रोत आहे. जो ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो. शिवाय हाडे आणि केसांनाही हे व्हिटॅमिन बी फायद्याचे असते. याव्यतिरिक्त मक्यातील व्हिटॅमिन ए हे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.

३) अँटी ऑक्सिडेंटने समृद्ध – मक्याचे कणीस अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे मका शरीराचा दाह कमी करतो. तसेच ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासही मदत करतो.

४) डोळ्याच्या समस्यांपासून सुटका – मक्यामध्ये कॅरोटीनोईड्स, ल्युटीन आणि झेंथाइन असते. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे दृष्टी तेज होते आणि डोळ्याच्या इतर समस्यांपासून आराम मिळतो.

५) वजन कमी करण्यास मदत – मक्याचे कणीस फायबरयुक्त घटकांनी समृद्ध असते. ज्यामुळे आपले पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मका अत्यंत लाभदायक आहे कारण बराच वेळ पोट भरलेले असल्यामुळे आपण कार्बयुक्त पदार्थ खाणे टाळाल. परिणामी वजन नियंत्रणात राहते.

६) गरोदरपणात फायदेशीर – गर्भवती स्त्रियांच्या आहारात मक्याचे कणीस असणे आई आणि मुलासाठी फायदेशीर आहे. कारण, मक्याच्या कणसात फॉलिक अॅसिड असते. तथापि, गर्भधारणे दरम्यान बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी गर्भवती महिलांनी आहारात मक्याच्या कणसाचा समावेश केल्यास लाभ मिळतो.