|

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन’चा कहर; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अगदी काहीच दिवसांपूर्वी लोकांनी कोरोनाचा कहर कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुटकेचा श्वास सोडला होता. यानंतर सरकारने तिसऱ्या संभाव्य लाटेमुळे निर्बंध शिथिल केले असले तरीही पूर्णतः सूट दिली नव्हती. परंतु आता कुठेतरी लोकांना सारे काही पूर्ववत होत आहे असे वाटू लागले असताना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने आपले डोके वर काढले आहे. ज्याप्रमाणे जग डेल्टा व्हायरस प्रकारातून सावरण्याचा प्रयत्न करत होते, ते पाहता सर्व काही ठीक होईल अशी प्रत्येकाला आशा वाटत होती. मात्र या आशेवर आता कोविड-19 च्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरियंटने अक्षरशः पाणी फिरवले आहे. यामुळे पुन्हा एकदा जनमानसात भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.

या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO- World Health Organisation) ओमिक्रॉन (Omicron) प्रकार (B.1.1.529) हा अत्यंत चिंताजनक प्रकार (VOC) असल्याचे घोषित केले आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांसमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. डेल्टा व्हेरिएंट, ज्याने जगात सर्वात जास्त कहर केला होता, तो देखील यापूर्वी VOC म्हणून घोषित करण्यात आला होता. यानंतर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉन व्हेरिएंटचे पहिले प्रकरण नोंदवले गेले आहे. त्यानंतर या व्हेरियंटच्या केसेसची झपाट्याने वाढ होत आहे असे निदर्शनास आले आहे.

WHO’च्या मते, कोरोनाचा ओमिक्रॉन हा व्हेरियंट जुन्या कोणत्याही व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत आहे. शिवाय हा व्हेरियंट त्यांच्यापेक्षा जास्त प्राणघातक ठरू शकतो. ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी आधीपासूनच वापरल्या जात असलेल्या PCR चाचणीची मदत घेतली जात आहे. दरम्यान, अनेक प्रयोगशाळांकडून असे सूचित केले जात आहे की या चाचणीमध्ये 3 लक्ष्यित जनुकांपैकी एकदेखील सापडत नाही आहे. ज्याला ‘एस जीन ड्रॉपआउट’ वा ‘एस जीन टार्गेट फेल्युअर’ असे म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय तुम्हाला संबंधित व्हेरियंटची लक्षणे माहित असणे आवश्यक आहे.

० ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणे – दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) नुसार, ओमिक्रॉन याची कोणतीही असामान्य वा नवीन लक्षणे दिसून आलेली नाहीत. अर्थात ओमिक्रॉनदेखील मागील व्हेरियंटप्रमाणेच लक्षणे दर्शवित आहे. यात खालील लक्षणांचा समावेश आहे.

१) ताप येणे.

२) खोकला येणे.

३) गंध/ वास न येणे.

४) जिभेची चव जाणे.

५) घसा खवखवणे/ दुखणे.

६) डोकेदुखी होणे.

७) श्वास घेताना त्रास होणे.

८) छातीत दुखणे.

० ‘ओमिक्रॉन’ या व्हेरियंटवर कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रभावी आहे का?
– कोविड19’च्या ओमिक्रॉन या नव्या आणि चिंताजनक व्हेरियंटवर कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रभावी आहे की नाही याबाबत अद्याप लस उत्पादकांना शंका आहे. यामुळे फायझर आणि बायोएनटेक यांनी नव्या व्हेरियंटवर लस प्रभावी आहे का यासाठी संशोधन सुरू केले आहे. संबंधित संशोधनाचा रिपोर्ट आल्यानंतर तो प्रसिद्ध केला जाईल.

रिपोर्ट्सनुसार, ओमिक्रॉनचा लस किंवा बूस्टर डोस घेतलेल्या अनेक लोकांना संसर्ग झाला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेशिवाय इतर देशांमध्येही ओमिक्रॉनची प्रकरणे मोठ्या वेगाने वाढत आहेत. यानंतर युकेमध्येही २ ओमिक्रोन व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. तसेच भारतात दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या २ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. मात्र हि ओमिक्रॉनचीच लागण आहे असे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे देशात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

० अत्यंत महत्वाच्या सूचना –

१) घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

२) कुणाशीही हस्तांदोलन (हात मिळवणे) किंवा आलिंगन (मिठी मारणे) करू नये.

३) स्वतःची निगा राखा.

४) वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका.

५) गर्दीत लहान मुले आणि वृद्धांनी फिरणे टाळा.

६) अनोळखी ठिकाणी आजूबाजूच्या व्यक्तींपासून अंतर राखा.

७) सतत नाकाला आणि तोंडाला हात लावू नका.

८) सार्वजनिक टॉयलेटच्या वापरानंतर सॅनिटायजरने हात स्वच्छ करा. शक्यतो कुठेही इकडे तिकडे स्पर्श करणे टाळा.

९) कोणताही संसर्गजन्य आजार झाल्याची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.

– कारण आपले स्वास्थ्य आणि आपले कुटुंब हि आपली जबाबदारी आहे.