|

कोव्हॅक्सिन लस ‘ओमिक्रॉन व्हायरस’वर प्रभावी; जाणून घ्या ICMR रिपोर्ट

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एकीकडे कोरोनाचे संकट सरते असे वाटत असताना आता कोरोनाच्या नव्या विषाणूने जगभरात कहर करायला सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रत्येकाच्या जगण्यावर गदा आली आहे असेच वाटत आहे. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ने हळूहळू आपला विस्तार वाढवायला सुरुवात केली असल्यामुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दक्षिण आफ्रिकेत या विषाणूचे पहिले २ रुग्ण सापडले आणि हळूहळू आसपासच्या देशांना धोका वाढू लागला. यानंतर आता कर्नाटकातही बाधित रुग्ण सापडल्यामुळे देशाची चिंता अत्यंत वाढली आहे. यामुळे जो तो हाच प्रश्न विचारात आहे कि कोरोनावर मात करण्यासाठी वापरली जाणारी एकतरी लस ओमिक्रॉनला रोखू शकेल का? यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अधिकाऱ्यांनी संबंधित रिपोर्ट सादर केला आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (ICMR) अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या रिपोर्टनुसार, भारत बायोटेकची कोविड प्रतिबंधात्मक लस कोव्हॅक्सिन ओमिक्रॉन विषाणूवर प्रभावीरीत्या कार्यरत आहे. हिंदू बिझनेस लाइन यांनीही आपल्या वृत्तात इतर उपलब्ध लसींच्या तुलनेत ओमिक्रॉनच्याविरूद्ध सुरु लढ्यात कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे असे लिहिले आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, कोव्हॅक्सिन हे अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा सारख्या इतर प्रकारांविरूद्ध प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आम्ही आशा करू शकतो की, हि लस नव्या व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी ठरेल. दरम्यान अधिक नमुने प्राप्त होईपर्यंत आणि चाचणी होईपर्यंत थोडा संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा आम्हाला नमुने मिळाल्यावर, आम्ही पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे या लसीच्या परिणामकारकतेची चाचणी करू असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या संपूर्ण देशभरात ओमिक्रॉन विषाणूबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे सर्वात आधी ओमिक्रॉन विषाणूने बाधित २ रुग्ण केवळ दक्षिण आफ्रिकेत आढळले होते. तर न्यूयॉर्कमध्ये ५ ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले. मात्र यानंतर आता कर्नाटक राज्यात २ रुग्ण आढळले आणि त्यांच्याशी संपर्क आलेलया ५ संबंधित व्यक्तीदेखील पॉझिटिव्ह आल्याचे समोर येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात २८ रुग्ण संशयित असल्याचे आढळून आले आहे. यात मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे जाहीर केले होते कि कोरोनाच्या आधीच्या कोणत्याही व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन हा विषाणू अतिशय घातक आणि झपाट्याने प्रसार होणारा आहे. यावर उपाययोजना म्हणजे प्रत्येकाने संबंधित नियमावलीचे पालन करणे आणि लसीकरण करून घेणे.