|

भारत बायोटेक कंपनीच्या दाव्यानुसार ‘Covaxin’ लस लहान मुलांसाठी सुरक्षित; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या जगभरात कोरोना विषाणूचा वाढता फैलाव पाहता प्रत्येक देशातील लसीकरण मोहिमेला चांगलाच वेग आला आहे. यानंतर आता देशभरात नव्या वर्षापासून लहान मुलांचं लसीकरण देखील सुरु झालं आहे. सध्या विषाणूपासून बचाव होण्याकरिता लहान मुलांना Covaxin ही कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. यावर भारत बायोटेक कंपनीने मोठा दावा केला आहे. भारत बायोटेक कंपनीकडून सांगण्यात येत आहे कि, Covaxin ही लस लहान मुलांसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे पालकांच्या जीवात जीव आला आहे.

भारत बायोटेकच्या रिपोर्टनुसार, त्यांची कोरोना लस BBV152 Covaxin च्या मूळ चाचणीत २ ते १८ वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी ती सुरक्षित असल्याची खात्री मिळाली आहे. या लसीचा अभ्यासा करताना संशोधकांचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निकष सांगतात कि, Covaxin लस मुलांसाठी सुरक्षित आहे. शिवाय कंपनीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनेक केंद्रांवर ओपन – लेबल चाचण्या घेतल्या होत्या. यानंतर त्यांनी रिपोर्ट जाहीर करताना सांगितले कि, निरोगी मुलांवर Covaxin सुरक्षित असून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे.

तसेच याबाबत सांगताना भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एला यांनी सांगितले कि, “लहान मुलांमध्ये Covaxin चाचण्यांचे परिणाम चांगले दिसून आले आहेत. त्यामुळे आम्‍हाला कळवण्‍यास आनंद होतोय की, Covaxin ही मुलांसाठी सुरक्षित आणि इम्युनोसप्रेसिव्ह असल्याचं सिद्ध झालं आहे. शिवाय आम्ही प्रौढ आणि मुलांसाठी सुरक्षित प्रभावी लस विकसित करण्याचे आमचे ध्येय आम्ही साध्य केले आहे.” भारत बायोटेकच्या रिपोर्टनुसार, या संशोधनादरम्यान मुलांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. उलट ३७४ मुलांमध्ये सौम्य वा गंभीर लक्षणं आढळली होती. यापैकी ७८.६% मुलांमध्ये लस घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून आली.