| |

वर्तमानपत्रावर खाद्यपदार्थ खाणे धोक्याचे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळणे! जाणून घ्या काय आहेत धोके

हॅलो आरोग्य ऑनलाईन । बाहेर काहीतरी चटपटीत खाणे हा जवळपास सर्वांच्या आवडीचा विषय. संध्याकाळी रस्त्याच्या कडेला किंवा चौपाटीवर वडापाव, समोसा, भजी, भेळ आदि पदार्थाचा आस्वाद घेणे म्हणजे आपल्यातील काही लोकांच्या साठी स्वर्गीय सुख असते तर काही लोकांच्या साठी गरज असते. महानगरात असे लाखों लोक आहेत की ते या प्रकारच्या अन्न पदार्थावर अवलंबून आहेत. जवळपास सगळे तळलेले पदार्थ हे रस्त्याकडेच्या गाड्यावर मिळतात. बघताक्षणीच किंवा वास आल्यावर आपल्याला ते खायची इच्छा अनावर होते. काही सन्माननीय अपवाद सोडले तर त्या खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी न बोललेलेच बरे! आणि हो, तुमचे हे आवडीचे पदार्थ तुम्हाला वर्तमानपत्राच्या तुकड्यावर दिले जातात. खाल्ल्यानंतर हा कागद तिथेच एखाद्या कचराकुंडीत टाकला जातो. आता हे पदार्थ खाणे जसे धोक्याचे आहे,  त्याहीपेक्षा वर्तमानपत्रावर खाणे जास्त धोकादायक आहे. बरेचजण पदार्थासह घरातीलही खाद्यपदार्थ पण वर्तमानपत्रावर खाताना दिसतात. मात्र असे करणे म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण देणे होय. वर्तमानपत्रात तेलकट पदार्थ ठेवल्याने त्यातील रसायने खाण्यात उतरतात. देशाच्या खाद्य सुरक्षा नियामक एफएसएसएआईने खाण्याचे पदार्थ कोणत्याही कागदात ठेवण्यासाठी प्रतिबंध केला आहे. त्यांनी सांगितले आहे, की असे केल्याने तुमच्या शरिरात कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

वर्तमानपत्राचे आपल्या आयुष्यातील महत्व वादातीत आहे. काहींना तर रोजचे वर्तमानपत्र सकाळी वाचल्याशिवाय दैनंदिन ‘विधी’ पण होत नाहीत! एवढी याची सवय होऊन गेलेली असते. ‘आजचा पेपर उद्या रद्दी होत असतो’.  या म्हणीप्रमाणे रोज आपल्या घरात रद्दी साठत जाते, आणि मग एखाद्या दिवशी ती रद्दी भंगारवाला घेऊन जातो. पण हीच रद्दी या खाद्यपदार्थाच्या स्टॉल वर कमी किंमतीमुळे आपसूकच येते. अश्या रीतीने वर्तमानपत्रात आपण विकत घेतलेल्या चॅट, पकोडा, भेळपुरी, डोसा, इडली आणि यासारख्या खाद्यपदार्थांची पॅकिंग व सर्व्ह करण्यासाठी जास्तीत जास्त खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर विक्री केली जाते.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानद प्राधिकरणाने  (एफएसएसएआई) याविषयी काही निष्कर्ष मांडले आहेत, खाण्याचे पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. कारण वर्तमानपत्र छापताना वेगवेगळी रसायनांचा त्यात वापर होतो, जी आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. प्रिंटिंग शाईमध्ये हानिकारक रंग, रंगद्रव्ये, बाइंडर्स, अॅडिटिव्ह्ज आणि प्रिझर्वेटिव्ह्ज देखील असू शकतात. रासायनिक दूषित पदार्थांव्यतिरिक्त, वापरलेल्या वर्तमानपत्रांमध्ये रोगजनक सूक्ष्मजीवांची उपस्थिती देखील मानवी आरोग्यास संभाव्य धोका दर्शवते

कसे होते नुकसान

कित्येकदा आपण पाहिले असेल की, तळकट पदार्थ वर्तमानपत्र वा मासिकावर ठेवल्यास शाईही आपल्या पदार्थांना लागत असते, पण ती सुख्या पदार्थांना जास्त लागत नसते. न्यूजपेपरवर शाई वितळण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर केला जातो. ही शाई आणि ग्रॅफाइटसारखे सॉल्वेंट्स सहजतेने पदार्थात पोहोचू शकते आणि आपल्या शरीरात प्रवेश करू शकते. यामुळे कॅन्सरसारख्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. आहारतज्ज्ञांच्या मते एकीकडे इतर घातक पदार्थ विष्ठेच्या माध्यमातून शरीराबाहेर जातात तर ग्रॅफाइट तिथेच साचून राहते. जे फुफ्फुसे व किडनीसाठी घातक ठरू शकते. वर्तमानपत्रावर असलेले सॉल्वेंट्सही पचन समस्यांना जन्म देऊ शकतात आणि हार्मोन बाधित करण्याशिवाय कॅन्सरचे कारण बनू शकतात.

 

मॅगेझिनही घातक

पेट्रोलियम आधारित खनिज तेलाचा वापर पेपरवर शाई जास्त गडद दिसण्यासाठी वापरले जाते आणि कोबाल्ट आधारित एजंट्स ती सुकवण्यासाठी वापरले जाते. जर या दोहोंचे सेवन केले तर ते गंभीर समस्यांचे कारण बनू शकते. जर आपल्याला वाटत असेल की, मॅगेझिनचा कागद न्यूज पेपरच्या तुलनेत फ्राइड फूड ठेवण्यास जास्त उत्तम असतो तर आपला हा विचार साफ चुकीचा आहे. कारण यामुळे जरी शाई सहजतेने खाण्यात जात नसली तरी हा पेपर गुळगुळीत करण्यासाठी व शाई जास्त टिकावू करण्यासाठी वापरले गेलेले केमिकल जास्त घातक असते. यासाठी तळलेले पदार्थातील तेल शोषण्यासाठी सर्वांत चांगले म्हणजे आपण किचन रोल्स व टिश्यू इ.च वापरावेत. जर आपण हे घाऊक बाजारातून जास्त प्रमाणात घ्याल तर ते आपल्याला स्वस्तात मिळू शकते.

त्यामुळे सर्वांनी याची दक्षता घ्यायची आहे की एकतर बाहेर खायचे नाही आणि खाण्याची इच्छा असेल तर मात्र प्लेट आणि टिशूपेपरची मागणी करायची. भले त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले तर चालेल. कारण आपल्या जीवापेक्षा काहीच महत्वाचे नाही.