Nasal Booster Dose
|

DCGI’चा मोठा निर्णय; भारत बायोटेकला इंट्रानासल बूस्टर डोसच्या चाचणीची परवानगी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI‘ ने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकच्या इंट्रानासल बूस्टर डोसच्या चाचण्यांसाठी DCGI‘ ने परवानगी दिली आहे.

विशेष म्हणजे, तिसऱ्या डोसच्या फेज 2 चाचणीसाठी अर्ज सादर करणारी भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे. माहितीनुसार, इंट्रानासल लसींमध्ये ओमिक्रॉनसह कोरोनाच्या विविध प्रकाराच्या संक्रमणांना रोखण्याची ताकद आहे. या इंट्रानासल लसीचा डोस देशात कोरोनाविरुद्ध सुरू मोहिमेला हातभार लावेल अशी आशा आहे.

दरम्यान भारत बायोटेकने सांगितले आहे कि, जगभरात कोरोना व्हायरसविरुद्ध सुरु असलेल्या युद्धाला तोंड देण्यासाठी बुस्टर डोस नक्कीच मदतगार ठरेल. तर नाकातून देण्यात येणाऱ्या या कोरोना लसीची संपूर्ण देशात तब्बल नऊ ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. याबाबत बोलताना भारत बायोटेकने सांगितले आहे की, नाकातून देण्यात येणारी हि लस कोविड- 19 चे संक्रमण रोखण्यासाठी आधीच्या कोणत्याही लसीपेक्षा निश्चितच खूप प्रभावी आहे. केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्थेच्या विषय तज्ञ समितीने इंट्रानासल कोविड- 19 लसीच्या क्लिनिकल चाचण्या घेण्यासाठी भारत बायोटेकच्या अर्जाला मंजुरी दिल्यानंतर तीन आठवड्यांनी आज DCGI’कडून परवानगी देण्यात आली आहे.

याआधी कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना DCGI’ने खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ञांनी केंद्र सरकारकडे शिफारस करताना या लसी परवडतील अश्या दरात उपलब्ध होण्याचीदेखील मागणी केली होती. त्यानुसार या दोन्ही कोरोना लस सुमारे 275 रुपये प्रति डोस आणि 150 रुपयांच्या अतिरिक्त सेवा शुल्कासह उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.