Covid Vaccine
|

DCGI’कडून कोरोनाच्या लसींना खुल्या बाजारात विक्रीची मंजुरी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या अनेक महिन्यांपासून पुन्हा एकदा कोरोनाने जोर धरल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रत्येक देशात अर्थात संपूर्ण जगभरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेगदेखील वाढवण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करीत आहे. यानंतर आता DCGI’ने मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींना DCGI’ने (Drugs Controller General of India) खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. याआधी सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी २५ ऑक्टोबर रोजी DCGI कडे कोविशिल्ड खुल्या बाजारात विक्रीसाठी यावी म्हणून मंजुरीसाठी अर्ज केला होता. तर भारत बायोटेकच्या संचालकांनीदेखील कोवॅक्सिनच्या विक्रीसाठी मंजुरी मिळावी यासाठी प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह माहिती सादर केली होती. यानंतर अखेर आज DCGI’ने आपला निर्णय सुनावला आहे.

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ञांनी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. तसेच या लसी बाजारात परवडतील अश्या दरात उपलब्ध होण्याचीदेखील मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही कोरोना लस सुमारे 275 रुपये प्रति डोस आणि 150 रुपयांच्या अतिरिक्त सेवा शुल्कासह उपलब्ध करुन देण्याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे सरकारी सुत्रांकडून समजत आहे.

सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीसाठी खाजगी रुग्णालयांमध्ये प्रतिडोस १२०० रुपये तर सीरमच्या कोविशील्डसाठी प्रतिडोस ७८० रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. या किंमतींमध्ये १५० रुपये सेवा शुल्काचाही समावेश करण्यात आलेला आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने प्रौढ व्यक्तींसाठी कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसी काही नियम, अटींसह आपत्कालीन परिस्थितींमध्ये वापराच्या परवानगीला नव्या सामान्य औषधांमध्ये अपग्रेड करण्यात आलं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे. तसेच या अटींमध्ये CoWin अॅपवर नोंदणी करण्यासोबत लसीचा पुरवठा आणि ६ महिन्यांचा डेटा जमा करणे बंधनकारक आहे. यासह निःशुल्क लसीकरणाचं सरकारी अभियानदेखील सुरुच राहणार असल्याचे मांडवीय यांनी सांगितले आहे.