| | |

‘कपोतासन’ करा आणि पाठदुखीपासून आराम मिळवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर तुम्हाला तुमचे जीवन निरोगी आणि नेहमी स्वस्थ जगायचे असेल तर यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलायला हवी. मग जीवनशैली बदलायची म्हणजे काय करायचं. काही नियम स्वतःलाही लावून घ्यायचे आणि त्याचे काटेकोर पालन करायचे. मुख्य म्हणजे उठण्याची, झोपण्याची वेळ आणि खाण्यापिण्याच्या वेळा विशेष करून पाळा. पण यासोबत वाईट सवयी सोडा आणि चांगल्या सवयींचा अवलंब करा. जसे कि दररोज सकाळी उठल्यानंतर योगाभ्यास आणि ध्यानधारणा करणे. होय. आयुष्यात योगाचा समावेश करून घेण्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं.

रोजच्या दगदगीच्या आयुष्यात पोटापाण्यासाठी धडपडणारे कित्येक लोक कष्टाची कामे करतात. तर काही लोक अख्खा दिवस एकाच ठिकाणी बसून कामात व्यग्र राहतात. त्यामुळे अश्या लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. मुख्य म्हणजे हि पाठदुखी इतकी प्रबळ असते कि, याकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने हि समस्या मोठी होते. परिणामी पाठीचा कणा देखील दुखावतो. यासाठी योगासनांपैकी ‘कपोतासन’ अत्यंत प्रभावी काम करते. मुळात ‘योगविद्या’ हा एक प्राचीन भारतीय ठेवा आहे. काळानुरूप त्यात बदल झाले असले तरीही त्याचा प्रभाव कायम आहे. यामुळे बैठकीची कामे करणाऱ्या लोकांना मानेचे दुखणे, पाठदुखी यातून सुटका मिळवण्यासाठी मसाज आणि औषधोपचार करण्याऐवजी ‘कपोतासन’ करणे फायद्याचे ठरते.

० ‘कपोतासन’ कसे करावे?
– जमिनीवर वज्रासनात बसा. यानंतर हळूहळू उठून, कंबरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करा. पुढे कंबरेतून वाकल्यानंतर हात जमिनीवर ठेवा आणि त्यानंतर दोन्ही हातांनी पायाची बोटे पकडा व डोके जमिनीवर ठेवा. शक्य होईल तितका वेळ याच स्थितीत राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. त्यानंतर हळूहळू पुन्हा पुर्वस्थितीत या.

० ‘कपोतासन’ करण्याचे फायदे काय?
– कपोतासनामध्ये पाठीतून मागे वाकल्याने कंबर, मान, पाठीचा कणा, खांदे व हातांवर ताण येतो. या आसनामुळे पोटाजवळील फॅट्स अर्थात मेद कमी होतात. शिवाय पाठीचे दुखणे, ताण-तणाव व अस्वस्थतादेखील कमी होण्यास मदत होते.

० हे असं कुणी करू नये?
– पाठ, गुडघा किंवा घोट्यात काही दुखापत असल्यास हे आसन प्रामुख्याने टाळावे.
– रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी हे आसन करणे टाळा.

० महत्वाचे
– जर तुम्ही पहिल्यांदाच योग्याभ्यास करत असाल तर ‘कपोतासन’ करताना योग्य तज्ञांच्या सल्याने आणि त्यांच्या उपस्थितीतच करा.