| |

आता घरच्या घरी करा मिनी फेशिअल आणि मिळवा नॅचरल ग्लो; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल आपली जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे कि आपल्याला आपल्याच आरोग्याची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. यात शरीर आणि त्वचा दोन्हीचा समावेश आहे बरं का.. आता तुमच्यापैकी काहीजण सांगतील आम्ही तर आमच्या आरोग्याची काळजी घेतो बाबा. पण एकदा खर्च स्वतःला विचारून पहा कि यात तथ्य आहे का? चला मान्य कि आपण अनेकदा आजारपणाच्या भीतीने शारीरिक आरोग्याची काळजी घेतो पण त्वचेचं काय? तिची काळजी कोण घेणार? अनेक स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करुन आपला चेहरा खुलवण्याचा प्रयत्न करतात. पण काही काळानंतर याच फेशिअलमुळे चेहरा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून घरच्या घरी फेशिअल करण्याचा उपाय अगदी सोप्पा, कमी खर्चिक, कमी वेळ खाणारा आणि उत्तम निकाल देणारा आहे. आता घरच्या घरी फेशिअल कसे करायचे तुम्हाला ठाऊक नसेल तर काळजी करू नका. कारण आजच्या या लेखात आपण याचविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

स्टेप १ क्लिंजिंग – कोणत्याही प्रकारचे फेशिअल करायचे असेल तर सर्वात आधी चेहरा स्वच्छ करून चेहऱ्यावरील तेलकटपणा हटवणे गरजेचे आहे. त्यासाठी चेहरा चांगल्या प्रकारे धुऊन घ्या. जर तुमच्या चेहऱ्यावर थोडासा जरी मेकअप राहिला तर, चेहऱ्याला ऑईल क्लींजरने साफ करा. त्यानंतर नियमित वापरातील फेस क्लींजरने पुन्हा एकदा स्किन क्लींजिग करा.
आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार क्लिंजिंग ऑइल वापरा. यासाठी शुद्ध नारळाचे तेल वा ऑलिव्ह ऑइल वापरता येईल.

 

स्टेप २ स्क्रबिंग – फेशिअल करतानाची सर्वात महत्वाची आणि दुसरी स्टेप म्हणजे स्क्रबिंग. हा स्क्रब बनवण्यासाठी आपण ओट्सचा वापर करु शकता. कारण ओट्स त्यांच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे त्वचेसाठी उत्तम असतात. यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

० साहित्य – २ चमचे बारीक ओट्सचे जाडे भरडे पीठ, १ टीस्पून मध, १ टेबलस्पून कोमट पाणी

० कृती आणि वापरण्याची पद्धत – एका वाटीत बारीक ओट्सचे जाडे भरडे पीठ आणि मध एकत्र करा. यात कोमट पाणी घाला आणि चांगले मिसळा. आता संपूर्ण चेहऱ्यावर बोटांनी स्क्रब लावा आणि साधारण १ मिनिट मसाज करा. यानंतर ५ मिनिटे असेच राहूद्या. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

 

स्टेप ३ स्टीमिंग – स्क्रब झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन चेहऱ्याला स्टीमिंग करा. यासाठी पाणी गरम करुन त्याची वाफ घ्या. यामुळे चेहऱ्यावरील सूक्ष्म खुली छिद्रे स्वच्छ होऊन चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते.

 

स्टेप ४ फेस मास्क – चेहऱ्याच्या त्वचेत साचलेली घाण आणि अशुद्धता बाहेर काढण्यासाठी फेसमास्क वापरणे उपयुक्त आहे. तसेच यामुळे चेहरा ग्लो करतो. यासाठी खालील फेसमास्क उपयुक्त आहे.
० साहित्य – १ केळ, २ चमचे कोरफडीचे जेल, ३ टीस्पून बदाम तेल

० कृती आणि वापरायची पद्धत – एका स्वच्छ भांड्यात केळ्याचे काप घ्या आणि काट्याने स्मॅश करा. या स्मॅश केलेल्या केळ्यामध्ये कोरफड जेल घाला आणि बदामाचे तेल टाका. आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. तुमचा पॅक तयार. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. यानंतर साधारण १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका

 

स्टेप ५ मॉइस्चराइज – चेहरा धुऊन झाल्यानंतर चेहऱ्याला रोजच्या वापरातील मॉइस्चराइजर लावा किंवा ताज्या कोरफडीचा गर काढून लावा.