| |

मानसिक आरोग्यासाठी करा सोप्पे आयुर्वेदिक उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एकाग्रता अस्थिर होणे किंवा कमी वयामध्ये विसर पडण्याच्या समस्येमुळे आजकाल अनेक लोक त्रस्त आहेत. तसे पाहता वाढत्या वयानुसार वृद्धांमध्ये विसरण्याची समस्या मुख्यत्वे आढळून येते. मात्र बदलती जीवनशैली आणि धावती जीवनपद्धती यामुळे आजकाल तरुणांमध्ये ताण – तणावाच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत कि कि त्याचा परिणाम थेट मानसिकतेवर होतो आणि परिणामी एकाग्रता अस्थिर होते. यामुळे कामात लक्ष न लागणे, जगणे नकोसे होणे आणि सतत चिडचिड अश्या समस्यांची उत्पत्ती होते जी अतिशय हानिकारक ठरू शकते. म्हणून आम्ही तुम्हाला अगदी सोप्पे, घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. ज्याने तुमची स्मरणशक्ती देखील व्यवस्थित राहील आणि एकाग्रतेची वाढ होईल.

मानसिक आरोग्यासाठी करावयाचे आयुर्वेदिक उपाय :-

१) तुळस – तुळशीच्या पानांचा अधिक वापर देवपूजा करण्यासाठी केला जातो. मात्र तुळशीचा वापर इथपर्यंत मर्यादित नसून तिच्यात अनेक औषधीय गुण असल्यामुळे आयुर्वेदात तुळशीचे मोठे स्थान आहे. तुळशीच्या पानांचा वापर अनेक प्रकारच्या आजारांसाठी केला जातो. तुळशीच्या ५ ते ७ पानांचे आपण दररोज सेवन केल्याने आपली एकाग्रता वाढते. कारण तुळशीचे पान मानसिक ताण कमी करण्याचे कार्य करते. शिवाय तुळशीच्या नियमित सेवनाने रक्त परिसंचरण सुधारते आणि नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो.

२) शंखपुष्पी – शंखपुष्पी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचा उपयोग मनशांती आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी केला जातो. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी शंखपुष्पी कार्यरत असते. याकरिता कोमट पाण्यातुन शंखपुष्पीचे सेवन करता येते. याचे नियमित सेवन केल्याने नैराश्य, चिंता, ताणतणाव दूर करण्यासाठी मदत होते. विशेष म्हणजे शंखपुष्पीचा आहारात समावेश केल्याने आपली एकाग्रता वाढते आणि मानसिक स्थैर्य येते.

३) अश्वगंधा – अश्वगंधा एक गुणकारी औषधी वनस्पती आहे. जिचा वापर करून ताणतणावातून सुटका मिळू शकते. अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे जी शरीरास आतून आणि बाहेरून एकाच वेळी बरे करण्याचे काम करते. कारण यात असणारी अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि पौष्टिक घटक शरीराच्या विकासास मदत करत असतात. शिवाय अश्वगंधाचे सेवन आजार रोखण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदतयुक्त ठरतात.

४) ब्राह्मी – ब्राह्मी एक प्राचीन आणि प्रसिद्ध गुणकारी औषधी वनस्पती आहे. यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. अनेक आयुर्वेदाचार्य या वनस्पतीचा आयुर्वेदिक औषधांसाठी हजारो वर्षांपासून वापर करीत आहेत. ब्राह्मीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारतेच पण त्याचसोबत मन प्रसन्न होते व एकाग्रता वाढते. स्मृतीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हि वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. याकरिता दूध किंवा पाण्यात ब्राह्मीची पावडर मिसळून खाणे योग्य ठरते.