| |

सणासुदीला मावा खरेदी करताय? तर, थांबा – पडताळा – मग खरेदी करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। संपूर्ण राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे लाखो दिवे आणि भरपूर मिठाई. दिवाळीच्या अगदी पहिल्या दिवसापासून मिठाईची नुसती चंगळ असते. आता उद्या दिवाळी पाहत आणि मग भाऊबीज येईपर्यंत प्रत्येक घरात विविध मिठाई बनवल्या जातात. कारण सणाची मजा आणि नात्यात गोडवा मिठाईशिवाय कसा येणार? भाऊबीजेला बहिणी मोठ्या उत्साहाने लाडक्या भावासाठी घरातच मिठाई बनवितात. हि मिठाई बहुतेकदा माव्यापासून बनविलेली असते. जी खायला खूपच चविष्ट लागते. पण मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मावा जर बनावट असेल तर? तर साहजिकच हा मावा सणाची मजा खराब करू शकतो आणि आरोग्याचे नुकसानही करू शकतो. बनावट मावा खाल्ल्यामुळे पोटदुखी, आतड्यांचे विकार आणि इतर अनेक आरोग्यविषयक समस्या उदभवू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हीही या दिवाळीत मावा खरेदी करणार असाल तर मावा खरेदी करताना आधी थांबा- पहा आणि मगच खरेदी करा. मावा खरेदी करताना कोणत्या गोष्टी पडताळाव्या हे जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) मावा बनावट आहे का नाही हे ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे,
अस्सल मावा मऊ आणि बनावट मावा खडबडीत असतो. त्यामुळे मावा खरेदी करताना तो जर मऊ नसेल तर तो अशुद्ध आहे हे समजून घ्या.

२) मावा घेण्यापूर्वी थोडासा खाऊन बघा. मावा अस्सल असेल तर तोंडाला चिकटणार नाही पण मावा तोंडात चिकटला तर समजून घ्या की तुम्ही घेत असलेला मावा भेसळयुक्त वा बनावट आहे.

३) मावा खरेदी करण्यापूर्वी थोडासा हातात घेऊन त्याची गोळी तळ हातावर ठेवा. असे केल्यावर जर तो फुटायला लागला तर समजून घ्या की मावा बनावट आहे.

४) मावा खरेदी करताना आधी तो अंगठ्याच्या नखेवर चोळून पहा. असे केल्यास अस्सल मावा असेल तर त्यातून तुपाचा वास येईल.

५) मावा विकत घेताना तोंडात ठेवून तपासून पहा. मावा खाल्ल्यानंतर जर कच्च्या दुधाची चव जाणवत असेल तर मावा अस्सल आहे हे समजून घ्या.