ताप आला म्हणून लहान मुलांना ‘पॅरॅसिटॅमोल’ देता? मग या गोष्टी जरूर जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। साधारणपणे ऋतूत आणि वातावरणात बदल झाला कि त्याचा सगळ्यात पहिला परिणाम लहान मुलांवर होत असतो. अगदी सर्दी, खोकला आणि ताप याचा त्रास लगेच मुलांना सुरु होतो. प्रामुख्याने लहान बाळ आणि १० वर्षाखालील मुलांमध्ये ह्या आजारांचा प्रभाव अधिक दिसून येतो. लहान मुलं आजारी पडली कि नेहमी हसरी खेळणारी, नुसता उत्तमात माजवणारी मुलं अगदीच कोमेजून आणि निराश झालेली दिसू लागतात. परिणामी त्यांचे पालक त्यांची अधिक चिंता करू लागतात. कारण आजारपणात लहान मुले खूप चिडचिड करतात, रडतात, हात पाय दुखत असल्यामुळे हालचालसुद्धा कमी करतात. मुख्य म्हणजे त्यांची भूक मंदावते कारण त्यांच्या जीभेवर चव राहत नाही. इतकेच काय तर त्यांचे शरीर तापामुळे लवकर डीहायड्रेट होते. यामुळे आपली मूलं आजारी पडली कि त्यांची आई सुद्धा अस्थिर होते.

अनेकदा डॉक्टरांकडे जाणे शक्य नसले कि लहान मुलांना देखील ‘पॅरॅसिटॅमोल’ दिले जाते. त्यामुळे अनेक पालकांना लहान मुलांना तापात पॅरॅसिटॅमोल देणे योग्य आहे का? असा प्रश्न पडलेला आहे. तर बालतज्ञ म्हणतात कि, लहान मुलांना येणारा प्रत्येक ताप गंभीर नसतो. मात्र लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती आपल्या शरीराच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे साधारण १०० डिग्री फॅरॅनाईट किंवा त्यापेक्षा अधिक ताप असेल तर मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरॅसिटॅमोल देणे सुरक्षित आहे.

० लहान मुलांना अचानक ताप आला तर घरगुती उपचार काय करावे?
– लहान मुलांना अचानक ताप आल्यास पॅनिक न होता प्रथम त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याचा घड्या ठेवा. त्यांचे संपूर्ण अंग कोमट पाण्याने पुसा. यानंतरही त्यांचं अंग गरम असेल तर पॅरॅसिटॅमोलचे ड्रॉप्स द्या किंवा सिरप द्या. मात्र तुम्ही देत असलेल्या पॅरॅसिटॅमोलच्या ड्रॉप्स किंवा सिरपची मात्रा आधी पडताळून पहा.
महत्वाचे – सामान्यपणे हि औषधं दोन प्रकारच्या मात्रांमध्ये असतात.
१) 120mg/5mL आणि २) 250mg/5mL
अर्थात, ही औषधं 2mL आणि 5mL अश्या प्रमाणात द्यावी. सर्वसाधारणपणे एका दिवसात मुलांना पॅरॅसिटॅमोलचे ड्रॉप्स किंवा गोळ्या फक्त चार वेळेस देऊ शकता. सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवल्यावर, संध्याकाळी हलक्या नाश्त्यानंतर, रात्री जेवल्यावर.

० लहान मुलांना पॅरॅसिटॅमोल देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

१) पॅरॅसिटॅमोल तापात फायदेशीर आहेत. मात्र या गोळ्या काही वंडर ड्रग नाहीत. त्यामुळे व्हायरल इंफेक्शनमुळे ताप येत असेल तर ३ ते ५ दिवस राहतो. म्हणजेच संसर्गातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता निर्माण झाल्यास याचा त्रास कमी होतो. परंतु ताप पुन्हा उलटल्यास पॅरॅसिटॅमोलचा डोस वाढवू नका. कारण यामुळे ताप लगेच जाणार नाही. मात्र, मुलांना त्रास होण्याची शक्यता संभवते.

२) नवजात बाळ किंवा काही महिन्यांचे लहान बाळ असल्यास त्याला कोणतेही औषध आपल्या मानाने देऊ नका. बाळाला ताप आल्यास औषध देण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण ३ ते ४ महिन्यांपेक्षा लहान बाळांसाठी कोणतेही औषध देणं त्रासदायक ठरू शकते.

३) औषध देण्यापूर्वी औषधांची एक्स्पायरी डेट आणि मात्रा यावर विशेष लक्ष द्या. मुलांना कोणतेही ओरल ड्रग देण्यापूर्वी आधी ताप तपासून पहा. जर ताप १०० डिग्री एफ’पेक्षा कमी असेल आणि बाळाचं अंग खूप गरम असेल तर पॅरॅसिटॅमोल टाळा.

४) महत्वाचे म्हणजे तुमच्या मुलांना इतर कोणत्याही गोळ्या किंवा औषध चालू असतील तर आधी तपासून पहा. त्यामध्ये पॅरॅसिटॅमोल असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही पॅरॅसिटॅमोल दिलात तर मुलांना ओव्हर डोस झाल्यामुळे त्रास होऊ शकतो.

५) आपल्या बाळाच्या वजनानुसार त्यांच्यासाठी पॅरॅसिटॅमोलचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा आणि मग द्या. शिवाय ५ किलोपेक्षा बाळाचे वजन कमी असेल तर पॅरॅसिटॅमोल देणं टाळा.

६) बाळाच्या इम्युनायझेशन नंतर त्याला लगेच पॅरॅसिटॅमोल देण्याची गरज नाही. कारण इंजेक्शननंतर आलेला ताप हळूहळू कमी होतो.

७) पॅरॅसिटॅमोल केवळ ताप आला म्हणून वापरली जात नाही. शारीरिक वेदना कमी करण्यासाठी देखील पॅरॅसिटॅमोलचा वापर करतात. त्यामुळे जर तुमचं बाळ किंवा मुलं चिडचिड करत नसेल तर त्यांना पॅरॅसिटॅमोल देणे टाळावे.

० अत्यंत महत्वाचे:- मुलांना योग्य मात्रेत ‘पॅरॅसिटॅमोल’ देऊनही सलग ताप टिकल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.