Habit of Cracking Fingers
| |

तुम्हाला पण आहे का बोटे मोडण्याची सवय, वेळीच लक्ष द्या नाहीतर होऊ शकते ‘हे’ नुकसान

हॅलो आरोग्य आॅनलाईन : आपल्याला आठवतच असेल की लहानपणी जेव्हा आपण मजा म्हणून बोटे मोडायचो. तेव्हा आजी किंवा आजोबा आपल्याला बोट मोडू नये म्हणून रागवायचे, आणि म्हणायचे की बोट मोडणे हा एक मोठा अपशकुन आहे. त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही. पण या पण या गोष्टी काल्पनिक असल्या तरी त्या मागे सुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे. डॉक्टरांच्या मते हाताची किंवा पायाची बोटे मोडल्याने आपल्या हाडांवर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यातील कार्यक्षमता कमी होते हे सर्व आपल्या सांध्याना अतिशय हानिकारक ठरू शकते.

माणूस सवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. कित्येक लोकांना वेगवेगळ्या सवयी असतात आणि याच सवयींचे चांगले वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतात. आपल्याला लागलेल्या 90 % सवयी ह्या आपल्या नकळत आणि कधीपासून लागल्या आहेत, हे आपण स्वतः ही खात्रीने सांगू शकत नाही. बोटे मोडणे ही अतिशय सामान्य सवय आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कितीदातरी नकळत बोटे मोडली असतीलच. तसेच काही लोकांना आपल्या बोटांबरोबर मान मोडण्याची पण सवय असते. झटका देऊन मान डावीकडे नाहीतर उजवीकडे फिरवून त्यातून कडकड असा आवाज आला की, एकदम मोकळे झाल्यासारखे वाटते. त्यातूनही बरेचदा एका जागी बसून कॉम्प्युटर टायपिंग किंवा लेखन केल्यावर हात – पाय आखडून जातात. त्यांना जरा मोकळ वाटावं म्हणून ही बोटांची आणि मानेची मोडा-मोड केली जाते.

दिवसभर आपण एका जागेवर काम करत असू तर काही वेळाने रिकामा वेळ मिळाल्यानंतर आपण एक आवडीचं काम करतो ते म्हणजे बोटे मोडणे. बोटे मोडल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो म्हणजे जेव्हा कधी ब्रेक मिळतो त्यावेळेला दोन्ही हात एकमेकांत गुंफून सर्व बोटे कडकण मोडून घेतो. जवळपास सर्वच लोक हे काम आवडीने करतात आणि अशी बोटे मोडल्याने आपल्यालाही मोकळ मोकळ वाटतं. पण हा एक मोठा गैरसमज आहे. शास्त्रीयदृष्ट्या सांगायचे तर या सवयीमुळे आपल्या हाडांच्या सांध्या वर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे ही सवय जेवढे लवकर सोडता येईल तेवढे चांगले.

आपल्या सांध्यांच्या मध्ये म्हणजेच जॉईंट मध्ये एक विशिष्ट प्रकारचे लिक्विड असतं ज्याला सायनोव्हायल फ्लुईड असे म्हणतात. हे लिक्विड आपल्या हाडांच्या जॉईंट च्या मध्ये वंगणासारखे काम करते. ह्यामुळे आपली हाडे एकमेकांशी घर्षण करीत नाहीत. या लिक्विड मध्ये असणारा कार्बन-डाय-ऑक्‍साईड तिथे स्वतःसाठी जागा बनवतो. त्यामुळे तिथे बुडबुडे तयार होतात जेव्हा आपण बोटे मोडतो, तेव्हा हे बुडबुडे म्हणजेच बबल्स फुटतात. त्यामुळे बोट मोडल्यावर ‘कटकट’ आवाज येतो.

एकदा मोडलेलं बोट दुसऱ्यांदा मोडायला गेल्यावर विशिष्ट आवाज का येत नाही?

एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच की, एकदा बोट मोडल्यावर दुसऱ्यांदा तेच बोट मोडायला गेल्यावर तो विशिष्ट आवाज येत नाही. असं का होत असेल? तर त्याचं असं होतं की एकदा बोट मोडले आणि त्याच्यामध्ये बबल्स फुटल्यावर पुन्हा बबल्स तयार व्हायला 15 ते 20 मिनिटाचा कालावधी जावा लागतो. त्यामुळे लगेच दुसऱ्यांदा बोट मोडले आवाज येत नाही. एका रिपोर्टनुसार आपली हाडे एकमेकासोबत लिगामेंट च्या साह्याने जुळलेली असतात. नेहमी अशा पद्धतीने बोटे मोडत राहिल्याने त्यातील लिक्विड कमी होऊ लागते. जर ते पूर्णपणे संपले तर संधीवात होऊ शकतो. तसेच जर सांध्यांना नेहमी ओढत राहिले तर आपली हाडे सैल होऊ शकतात. त्यांची पकड ढिली होऊ शकते. यामुळे तुमच्या हाताच्या आणि पायाच्या संध्यामध्ये विकृती निर्माण होऊन बोटे वाकडी होऊ शकतात. तेव्हा आता बोटे मोडताना विचार करा आणि त्यांना अशी सवय असेल त्यांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करा