| | |

सोनोग्राफी !!! आपणांस माहीत आहेत का सोनोग्राफी तंत्रज्ञानाचे ‘हे’ विलक्षण फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सोनोग्राफी हे पुरुष व स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यास अत्यंत उपयुक्त असं उपकरण आहे. पण, स्त्री व सोनोग्राफी हे समीकरण जरा जास्त रुढ आहे. कारण आजारांशिवाय स्त्रीच्या जीवनात तिला येणाऱ्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये, होणाऱ्या त्रासांमध्ये सोनोग्राफी एखाद्या जीवलग मैत्रिणीसारखी तिला मदत करते.

 

पौंगडावस्थेतील सोनोग्राफी

स्त्रियांच्या आयुष्यातली ही एक अतिशय दोलायमान अवस्था आहे. कारण यामध्ये ती लहानपणातून तारुण्यात पदार्पण करीत असते. बऱ्याच किशोरवयीन मुलींना पाळीचे वेगवेगळे त्रास असतात. त्याची शहानिशा लवकरच केलेली बरी. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तिची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. बऱ्याचदा या मुलींची सोनोग्राफी करावी लागते. पाठीच्या वेळी पोटात अति दुखणं, पाळी लवकर लवकर येणं, अतिरक्तस्राव जाणं, अनियमित रक्तस्राव जाणं, पाळी जास्त दिवस जाणं, ओटीपोटात गाठ लागणं, पाळीच सुरू न होणं, नियमित असलेली पाळी चुकणं, पाळी न येणं, पाळी खूप उशिरा येणं अशा अवस्थेत सोनोग्राफी करावी. सोनोग्राफीमुळे मुलींच्या जननेंद्रियांच्या कितीतरी आजारांचं निदान होतं. उदा. जन्मदोष, गर्भाशयाच्या गाठी, बीकोषाच्या गाठी आदी. या मुलींमध्ये सोनोग्राफीची चाचणी पोटावरून करावी लागते. त्यासाठी निदान चार तास लघवी न करता मूत्राशय पूर्ण भरलेलं असेल, अशी काळजी घ्यावी लागते. यासाठी खूप पाणीही प्यायला सांगितलं जातं. लघवीनं भरलेल्या मूत्राशयाच्या पाठीमागेच गर्भाशय असल्यामुळे या लघवीच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर गर्भाशय, बीजकोष व्यवस्थित दिसायला मदत होते.

 

वंध्यत्व आणि सोनोग्राफी

वंध्यत्वामध्ये सोनोग्राफीचा सहभाग ही जगन्मान्य गोष्ट आहे. सोनोग्राफीशिवाय वंध्यत्वाच्या उपचाराची सुरुवातच होत नाही. यामध्ये सोनोग्राफी दोन प्रकाराने करता येते. पोटावरून व योनीमार्गाद्वारे. वंध्यत्वामध्ये प्रामुख्याने योनीमार्गाद्वारे सोनोग्राफीचा वापर होतो. स्त्रियांमध्ये दर महिन्याला बीजकोषामध्ये एक स्त्रीबीज तयार होते. साधारणपणे मासिक पाळीच्या बाराव्या ते पंधराव्या दिवशी बीजकोषातील पुटक फुटून त्यातून स्त्रीबीज बाहेर येते. या पुटकांच्या वाढीतील बदल व फुटणं हे आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसू शकते. ज्या स्त्रियांमध्ये ही तपासणी करतात, त्यांना पाळीच्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी बोलावून बीजकोषातील पुटकांतील वाढ पाहिली जाते. त्याप्रमाणे त्यांना रोज किंवा एक ते दोन दिवसानंतर परत बोलावून साधारणतः एखादा आठवडा ही तपासणी करतात. बऱ्याच स्त्रियांमध्ये स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नाहीत किंवा तयार होत असले तरी पूर्णत्वास जात नाहीत. अशा स्त्रियांना स्त्रीबीज तयार होण्यासाठी औषधं किंवा हार्मोन्स देऊन स्त्रीबीज वाढवणं व पूर्णत्वास नेणं हे स्त्रीवंध्यत्वाच्या उपचारांमध्ये खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक स्त्रीचा त्या उपचारांचा प्रतिसाद वेगळा असतो व त्याप्रमाणे औषधांच्या किंवा हार्मोन्सच्या डोसेसमध्ये कमी-जास्त बदल करावा लागतो. या सर्वांचं नियंत्रण केवळ सोनोग्राफीमुळे शक्य होते. पण यासाठी बऱ्याचदा सोनोग्राफी वारंवार करावी लागते.

गर्भावस्थेतली सोनोग्राफी

गर्भवती स्त्रीला गर्भ राहिल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत त्याची वाढ, हालचाल बघणं हे एक विलक्षण आश्चर्य केवळ सोनोग्राफीमुळे साध्य झालं आहे. अगदी बाळाच्या ठिपक्याएवढ्या अंशापासून ते त्याची जडणघडण आणि पूर्ण वाढ आपण नोंद करू शकतो. याशिवाय गर्भात असणारे आजार, विकार, दोष यांची पण बऱ्याच अंशी माहिती मिळवू शकते. बऱ्याच वेळा त्यावर आपण उपाययोजना पण करू शकतो. गर्भवती स्त्रीची सोनोग्राफी करणं हा इतर चाचण्यांबरोबर असणारा नेहमीचा एक भाग आहे. ज्या स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याची भीती असते किंवा होतात त्यांच्यामध्ये अगदी सोनोग्राफीमार्फतच उपचार चालू असतात. गर्भवती स्त्रियांमध्ये नऊ महिन्यांच्या काळात तीन ते चार वेळेला सोनोग्राफी करतात व गरजेप्रमाणे जास्त वेळेस पण सोनोग्राफी करावी लागते.

पहिली सोनोग्राफी दीड ते दोन महिन्यात (सहा ते आठ आठवडे) करतात. यामध्ये गर्भधारणा आहे की नाही हे निश्चित केलं जातं. असेल तर किती आठवड्यांची आहे हे बघितलं जातं. दुसरी सोनोग्राफी तीन ते चार महिन्यात (११ ते १४ आठवडे) करतात. यावेळी आपल्याला गर्भ थोडासा आकारात दिसतो. बाळ मतिमंद असण्यासारख्या मोठ्या आजारांची एक प्राथमिक तपासणी व निदान आपण सोनोग्राफीद्वारे करू शकतो. तिसरी सोनोग्राफी चौथ्या ते पाचव्या महिन्यात (१८ ते २२ आठवडे) केली जाते. ही सोनोग्राफी ‘टार्गेटेड’ सोनोग्राफी म्हणून ओळखली जाते. यामध्ये गर्भाचे डोके, पाठ, पोट, हृदय, हातपाय, चेहरा यांची व्यवस्थित तपासणी केली जाते. चौथी सोनोग्राफी सात ते आठ महिन्यात (२१ ते ३२ आठवडे) करतात. यालाच ग्रोथ स्कॅन असेही म्हणतात. यामध्ये बाळाची वाढ, गर्भजलाची पातळी, बाळाचे वजन बाळातील जन्मदोष अशा बऱ्याच बाबींकडे लक्ष दिले जाते.

प्रेग्नेंट राहिल्यापासून स्त्रियांना सोनोग्राफीची प्रक्रिया करावी लागते. याविषयी अनेक जोडप्यांच्या मनात संभ्रम आणि विवीध प्रश्न असतात. याची उत्तरं हवी असल्यास हा लेख नक्की वाचा. सोनोग्राफीबद्दलचे समज व गैरसमज सारं काही दूर होईल आणि तुम्ही गर्भातील बाळाची योग्य काळजी घेऊ शकाल. गर्भधारणा म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी आणि परिवारासाठी आनंदाची गोष्ट असते. गर्भधारणा हा शब्द ऐकला म्हणजे चाहूल लागते ती लहान बाळाच्या पावलांची आणि त्याच्यासोबतच येणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांची. सोनोग्राफी हा गर्भधारणा व प्रसुती प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, या सोनोग्राफीबद्दल गर्भवती महिला आणि तिच्या परिवारातील सदस्यांच्या मनात अनेक प्रश्‍न असतात. एकूण किती सोनोग्राफी कराव्यात, त्या सोनोग्राफीत नेमके काय दिसते आणि त्याचे काही दुष्परिणाम तर होणार नाही ना, याच प्रश्‍नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण प्रस्तुत लेखातून करणार आहोत. गर्भधारणेपासून प्रसुतीपर्यंत विविध टप्प्यांवर डॉक्टर सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतात. त्यापैकी आपण कन्फर्मेशन स्कॅन, अ‍ॅन्टीस्कॅन, अनॉमली स्कॅन आणि शेवटचा स्कॅन म्हणजे ग्रोथ स्कॅन व डॉपलर या मुख्य स्कॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

 

कन्फर्मेशन स्कॅन

गर्भधारणा निश्‍चित झाली की, पहिली सोनोग्राफी म्हणजे कन्फर्मेशन स्कॅन होय. या सोनोग्राफीद्वारे सर्वप्रथम आपण हे बघतो की, गर्भधारणा नेमकी गर्भाशयातच झाली आहे ना…! जर गर्भधारणा गर्भाशयाच्या आत न होता, अन्यत्र कुठे झाली असेल तर ती गर्भधारणा ठेवता येऊ शकत नाही. बाळ एक आहे की, जुळे वा तिळे आहे, हे आपण या स्कॅनद्वारे बघतो. फिटल पोल आलयं का? त्यात हृदयाचे ठोके आहेत का? रक्तपिशवीत कुठे रक्ताची गाठ तर नाहीय ना? हे या स्कॅनद्वारे तपासले जाते. गर्भाशयाचे तोंड उघडे आहे की बंद हे देखील या स्कॅनद्वारे तपासण्यात येते. जर ते उघडे असेल तर बाळ आपोआप पडण्याचा धोका असतो. गर्भाशयात बाळ किती आठवड्याचे झाले आहे,  हे या स्कॅनवरून कळते.

अ‍ॅन्टीस्कॅन

गर्भधारणेनंतर साधारणतः अकरा ते चौदा आठवड्यात करण्यात येणाऱ्या सोनोग्राफीला अ‍ॅन्टीस्कॅन असे म्हणतात. या सोनोग्राफीत तीन बाबी प्रामुख्याने तपासल्या जातात. पहिली बाब म्हणजे नेजल बोन अर्थात नाकाचे हाड, दुसरी बाब म्हणजे मानेच्या मागे असलेल्या पाण्याचा थर ज्यास न्युकल ट्रान्सलुसेन्सी म्हणतात व तिसरी बाब म्हणजे डक्टस व्हिनोसस या रक्तवाहिनीतील प्रवाह. यासोबत डबल मार्कर टेस्ट ही रक्तचाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. स्कॅन व रक्तचाचणी या दोन्ही गोष्टी मिळून बाळामध्ये कुठली क्रोमोजोमल अ‍ॅबनॉर्मिलिटी म्हणजे डाऊन्स, टर्नर्स सिन्ड्रोम आहे का, हे कळू शकते. शिवाय गर्भातील बाळाच्या विकासासंबंधीचे विकार, हृदयदोष, अनुवांशिक विकार हे देखील या स्कॅनद्वारे कळू शकतात.

अ‍ॅन्टीस्कॅनसाठी गर्भाशयात बाळ विशिष्ट स्थितीत असायला हवे. ही स्थिती नैसर्गिकरीत्याच प्राप्त होत असते. बाळ त्या स्थितीत येत नाही, तोपर्यंत हे स्कॅन शक्य नसते. त्यामुळे या सोनोग्राफीला वेळही लागू शकतो. एकूणच स्कॅन किती लवकर होईल, हे बाळाच्या गर्भाशयातील स्थितीवर अवलंबून असते.

 

प्रौढावस्थेतील सोनोग्राफी

बऱ्याच स्त्रियांना वाटतं की आता चाळीशीनंतर तपासण्याची काय गरज आहे? खरे तर वयाच्या चा‌ळिशीनंतर स्त्रीचं तिसरं वळण (टप्पा) चालू होतं. अशा स्त्रियांनी दर वर्षी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून आतून तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर दरवर्षी एकदा सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. याच वयामध्ये ऋतूनिवृत्ती पण येते. बऱ्याच स्त्रियांना या वेळेस स्त्री हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे अनियमित रक्तस्राव होतो. तसंच याच वयात कॅन्सरचं प्रमाण पण जास्त असते. यामुळे महत्वाच्या काही तपासण्या करणे गरजेचे असते त्यावेळी सोनोग्राफीमुळे अनेक आजारांचे निदान होऊ शकते.