| |

निकोटीन रोखतो कोरोनाचा संसर्ग? सिगारेट- बिडी विक्रेता संघटनांचा अजब दावा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि धुम्रपान हे मानवी शरीरासाठी किती घातक आहे. परंतु तरीही अनेको लोक या व्यसनाधीन आहेत त्यात काही वादच नाही. दरम्यान सिगारेट बिडी विक्रेत्या व्यापाऱ्यांनी असा दावा केला आहे कि, धूम्रपानामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका संभवत नाही. शिवाय निकोटिन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विश्वास बसत नाही ना? पण हेच सत्य आहे. इतकेच नव्हे तर या व्यापाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने अँड. रवी कदम यांनी न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध समस्यांबाबत स्नेहा मरजादी यांनी अ‍ॅड. अर्शिल शहांमार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर मंगळवारी मुख्य न्या.दीपांकर दत्ता आणि न्या.गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. दरम्यान राज्य सरकारला मागील सुनावणी दरम्यान खंडपीठाने काही मुद्दांवर बाजू मांडण्याचे निर्देश दिल्याप्रमाणे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी त्या मुद्दांवर भूमिका स्पष्ट केली होती.

यात धुम्रपानामुळे कोरोना रुग्णांवर होणाऱ्या परिणामांबाबत बोलताना त्यांनी टाटा मेमोरियल सेंटरच्या डॉक्टरांनी केलेल्या रिसर्चचा अहवाल खंडपीठासमोर सादर केला. यात धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याचा दावा करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसे असले तरीही काही उत्पादकांनी आमच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. मात्र, सरकारचा बिडी, सिगरेट उत्पादकांना कोणताही विरोध नाही. तसेच आम्ही सिगारेट अथवा बिडी उत्पादनावर, विक्रीवर अद्याप कोणतीही कारवाई करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यावर फेडरल रिटेलर असोसिएशन आणि पान- बिडी- तंबाखु विक्रेता संघाने याविरुद्ध मंगळवारी हस्तक्षेप अर्ज दाखल करताना लिहिले कि, निश्चितच धुम्रपान हे शरीरासाठी घातक आहे, त्यात काहीच वाद नाही, मात्र, धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा अधिकचा धोका संभवत नाही. उलट त्यातील निकोटिन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, असा दावा व्यापाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने अँड. रवी कदम यांनी केला.

जगातील अमेरिका, फ्रांन्स, इटली, चीन यांसारख्या देशातही यावर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे संदर्भात त्यांना बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. त्याची दखल घेत जर विक्रेत्यांच्या संघटनांचा दावा स्वीकारला तर धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे, हा केंद्र सरकारने अशा उत्पादनांवर केलेला वैधानिक इशारा काढून टाकावा लागेल असा टोला खंडपीठाने लगावला आणि हस्तक्षेप अर्ज स्विकारत सुनावणी १ जुलै २०२१ अर्थात आजपर्यंत तहकूब केली. आता या पुढील सुनावणी दरम्यान कोणाची बाजू वरचढ ठरते हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

  • महत्वाचे : असा कोणताही दावा अद्याप सिद्ध झालेला नाही. मात्र निकोटिनचे सेवन मानवी आरोग्यासाठी हानिकारक असते हे गेल्या अनेक वर्षांपासून तज्ञांनी विविध स्वरूपात सिद्ध केलेले आहे.