| |

बाळाला रात्री दूध पाजल्यावर पाणी पाजणे आवश्यक आहे का?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एखाद्या दांपत्याच्या आयुष्यात बाळाची चाहूल लागण्यापासून त्याच्या जन्मापर्यंतचा काळ एक विशेष काळ असतो. खूप हर्ष आणि खूप स्वप्न यांचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं बाळ. पालकत्वाची भावना इतकी हळवी असते कि बाळ झाल्यानंतर त्याच्या बाबतीत प्रत्येक लहानातली लहान गोष्ट सुद्धा एकदम परफेक्ट असावी यासाठी बाळाचे आई आणि बाबा दोघेही धडपडत असतात. त्याचे कारणही तसेच आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा आहार आणि त्याचे आरोग्य याबाबत सतत सतर्क राहावे लागते. त्याच्या खाण्या-पिण्याच्या प्रत्येक वेळा सांभाळाव्या लागतात. याशिवाय त्याचे लसीकरण आणि औषधी या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. पण या सगळ्यात अनेकदा असे होते कि, मोठमोठ्या गोष्टींपुढे आपण लहान सहान गोष्टींकडे नकळतच दुर्लक्ष करतो. यांपैकी एक म्हणजे, रात्री झोपण्याआधी बाळाला दूध पाजणे. पण यानंतर उपस्थित राहणारा प्रश्न म्हणजे बाळाला रात्री दूध पाजल्यानंतर पाणी पाजायचे का नाही? आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच लेखात मिळेल पण त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण वाचावा लागेल.

– बाटलीने दूध पिताना किंवा ब्रेस्टफिडींग करताना थोडेसे दूध बाळाच्या तोंडात राहते मग ते पूर्णपणे गिळले जात नाही. त्यामुळे बाळाला येणाऱ्या दातांना हानी पोहचते. परिणामी दात लवकर येत नाहीत. शिवाय दातांचा आकार बिघडतो. त्यामुळे कधी कधी दात येत असताना रात्रीचे दूध न पाजण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
– पण विशेषतः बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर असे करणे टाळावे. कारण अनेक लहान बाळांची भूक पूर्ण झाली नसेल तर त्यांना मध्यरात्री भूक लागते. त्यामुळे या बाळांना रात्रीचे दूध दिल्याशिवाय झोप लागत नाही. त्यामुळे दूध पाजल्यानंतर बाळाला थोडं पाणी पाजा. याचे दोन फायदे होतील –
१. पाणी प्यायल्याने बाळाच्या तोंडात राहिलेले दूध त्याला गिळण्यास मदत होईल.
२. बाळाच्या दातांचे कॅव्हिटीपासून संरक्षण होईल. म्हणून लहान मुलांना दात येताना वेळीच काळजी घ्या.

० योग्य पद्धत खालीलप्रमाणे:-
– दूध पाजताना बाळ झोपी गेले तर बाळाला अलगद उचला आणि अर्धा चमचा पाणी पाजा. त्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन त्याच्या पाठीवरून सावकाश हात फिरवा म्हणजे बाळाला ढेकर येईल. हे करण्याचे कारण म्हणजे, ढेकर न आल्यास बाळाच्या पोटात दुखू लागेल. याशिवाय मध्यरात्री बाळ रडत उठेल. त्यामुळे रात्री भूक लागल्यावर बाळ मध्ये मध्ये जागे झाल्यास दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळी बाळाला १-२ चमचे पाणी पाजा आणि खांद्यावर घ्या. हे करणे नवमातांसाठी थोडेसे कठीण असले तरी त्यामुळे बाळाचे दात सुरक्षित राहतात.