| |

भितीदायक स्वप्नांच्या भीतीने झोप लागत नाही?; जाणून घ्या कारण आणि निवारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि आपण अख्ख्या दिवसाच्या कामांमुळे अतिशय दमून गेलेलो असतो आणि या दरम्यान आपल्या शरीराला आणि मेंदूला शांततेची गरज असते. यामुळे एकदा का रात्रीचे जेवण उरकले कि आपली पावले थेट अंथरुणाकडे वळतात. मग काय..? आपण कधी गाढ झोपेच्या आधीन जातो तेच कळत नाही.

पण मित्रहो कधी असे झाले आहे का? कि तुम्ही गाढ झोपले आहेत आणि अचानक घाबरून घामाघूम होऊन अगदी दचकून तुम्हाला जाग आली आहे? खरंतर असं अनेकदा होतं कि, एका भितीदायक स्वप्नामुळे झोप तुटते आणि भीतीने घाबराघुबरा झालेला जीव मेताकुटीला येतो. हा अनुभव प्रत्येकाने किमान एकदा असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. पण या समस्येमागे काय कारण आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतच नाही. तर यामागे नेमके कारण काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

० अनेकदा मनात कोणतीही भीती वा मानसिक ताण नसतो, कशाची चिंता नसते आणि तरीही भयानक स्वप्न पडत असतात. मग अख्खा दिवस हे असं का घडलं याची काळजी वाटते. तर, वास्तविक अशी स्वप्न पडण्यामागे झोपण्याची स्थिती कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. होय आणि आज आपण अश्या झोपण्याच्या स्थितीबाबत जाणून घेणार आहोत.

० भितीदायक स्वप्न पडतेवेळी झोपण्याची स्थिती कोणती?
– आपली झोपण्याची स्थिती अथवा पोझिशन आणि भयानक स्वप्न यांचा दृढ संबध आहे. सर्वात जास्त भयानक स्वप्न उपडी झोपण्यामुळे अर्थात छातीवर वा पोटावर हात ठेवून झोपण्याच्या स्थितीमूळे पडतात.
मनोविज्ञानानूसार, भितीदायक स्वप्नांच्या मागे मानसिक ताण तणाव वा झोपण्याची पद्धत कारणीभूत ठरू शकते. मुख्य म्हणजे, छातीवर हात ठेवल्यास शरीरावर ताण येतो आणि झोपतेवेळी आपले शरीर शिथील होते. या दरम्यान ह्रदय, फुफ्फुसे आणि मेंदू धीम्या गतीने कार्यरत असतो. अशा काळात शरीरावर पडलेला ताण या अवयवांच्या कार्यात अडसर ठरतो. मेंदूला योग्य सूचना न मिळाल्यामुळे मेंदूमध्ये विविध रासायनिक क्रिया घडतात आणि परिणामी भितीदायक स्वप्न पडतात.

० झोपण्याची स्थिती बदलण्यामुळे खरचं फायदा होतो का?
– सतत भितीदायक स्वप्न पडणे याचा तुमच्या भविष्याशी किंवा मनोवस्थेशी संबध लावण्यापेक्षा तुमच्या झोपण्याच्या स्थितीत थोडासा बदल करा. कारण अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे, कि केवळ झोपण्याची स्थिती या स्वप्नदोषांना कारणीभूत आहे. पोटावर, डोकं आणि हात उशीत खुपसून, अथवा पोटाजवळ पाय घेऊन झोपण्यामुळेही भयानक स्वप्न पडतात. कारण यामुळे मेंदूचे कार्य आणि विचारशक्तीवर ताण येतो. यासाठी अशा पोझिशनमध्ये झोपा ज्यामध्ये शरीरावर ताण येणार नाही आणि चांगला आराम मिळेल.

० चांगल्या झोपेसाठी कोणती स्थिती असावी?
– तसे पाहता झोपण्याची अशी कोणतीही विशिष्ट आदर्श स्थिती नाही. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप मिळते आणि चांगली स्वप्नदेखील पडू शकतात. कारण, स्वप्न पाडणं हे कुणाच्याही हातात नाही. परंतु डाव्या कुशीवर झोपल्यामूळे शरीराला चांगला आराम मिळतो. शिवाय झोपण्याआधी अर्धा तास टीव्ही, मोबाईल किंवा कोणत्याही डिजिटल स्क्रीनचा वापर करणे बंद करा. कारण या गोष्टींचा मेंदूवर ताण येतो.

झोपण्याआधी २ तास हलका आहार घ्या, मंद संगीत ऐका, नामस्मरण करा. यामुळे मन शांत राहते आणि झोपदेखील लागते. मुळात झोपताना आपण जसे विचार करतो त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. परिणामी जसे विचार तसा प्रभाव. यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि रात्री झोपण्याआधी चिडचिड करू नका. शिवाय अंगावर ताण येणार नाही याची काळजी घ्या.