| |

लहान मुलांचे डोळे वारंवार लाल होत असतील तर घाबरू नका; जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या मुलांना होणार त्रास तीव्र असो वा सौम्य पालकांना जीव घाबराघुबरा होतोच. याचे कारण म्हणजे लहान मुलांचा प्रत्येक अवयव हा अतिशय संवेदनशील असतो. त्यात डोळे हा अवयव असा आहे जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव आहे. लहान मुलांच्या बाबतीत या अवयवाची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. कारण लहान मुलांमध्ये डोळ्यांचे संक्रमण सामान्य आहे. यात डोळे लाल होतात आणि त्यात कोरडेपणा, खाज सुटणे, पाणी येणे सुरू होते. परिणामी मुलं चिडचिड आणि रडारड करू लागतात. त्यामुळे पालक घाबरतात. डोळे अतिशय नाजूक असल्यामूळे डोळ्यांच्या संसर्गावर त्वरित उपचार करण्याला प्राधान्य देणे जरुरी आहे. यातील काही संसर्गांवर घरगुती उपायांच्या साहाय्याने मात करता येते. म्हणूनच आज आपण लहान मुलांचे डोळे लाल होण्याची कारणे आणि त्यावर करायचे घरगुती उपाय जाणून घेऊ खालीलप्रमाणे:-

० लहान मुलांचे डोळे लाल होण्याची कारणे :-

-कडक उन्हाळा

-प्रदूषण

-मातीचे कण

-वाहनांचा धूर

-डोळ्यातील इन्फेक्शन वा जंतुसंसर्ग

-अॅलर्जी

– स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या डिजिटल स्क्रीनचा अतिवापर.

 

० लहान मुलांचे डोळे लाल झाल्यास व संक्रमण झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय:-

१) थंड काकडीच्या चकत्या – मुलांचे डोळे सतत लाल होत असतील तर काकडीचे काप करून फ्रीजमध्ये ठेवा आणि थोड्यावेळाने ते मुलांच्या डोळ्यांवर ठेवा. काकडी स्वभावाने थंड असल्यामुळे मुलांच्या डोळ्यांना आराम मिळून डोळे लाल होणे थांबते.

२) बटाट्याच्या ओल्या चकत्या – मुलांच्या डोळ्यांचा लालसरपणा जावा यासाठी एक बटाटा न सोलता स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे गोलाकार काप करून पाण्यात ठेवा. यानंतर ते काप मुलांच्या डोळ्यावर ठेवा. यामुळे मुलांच्या डोळ्यातील जळजळ कमी होईल आणि लालसरपणा हळूहळू कमी होईल.

३) गुलाब पाणी – मुलांचे डोळे लाल होत असतील आणि डोळे झोंबत असतील तर यासाठी गुलाब पाण्यात कापसाचे बोळे बुडवा आणि मुलांच्या डोळ्यावर ठेवा. याशिवाय मुलांच्या डोळ्यात एक थेंब गुलाब पाणी घातल्याने डोळ्यातील लालसरपणा दूर होईल.

४) एरंडेल तेल – मुलांच्या डोळ्यांमधील लालसरपणा जावा यासाठी एरंडेल तेलात भिजवलेला कापसाचा बोळा त्यांच्या डोळ्यावर साधारण २ मिनिटे ठेवा. यामुळे मुलांचे डोळे लाल होण्याची समस्या दूर होते.

५) उबदार कापडाचा शेक – मुलांच्या डोळ्यांवर उबदार कपड्याने शेक दिल्यास डोळ्यांचा लालसरपणा दूर होतो. यासाठी कोमट पाण्यात रुमाल बुडवा आणि १० मिनिटे डोळ्याला शेक द्या. यानंतर गोलाकार हळुहळु मालिश करा. रुमाल थंड झाल्यावर पुन्हा अशीच क्रिया करा.

 

० महत्वाचे डोळ्यांच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पुरळ, जास्त पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळे चिकट होणे, सुजणे अशी लक्षणे दिसतात. वरील उपाय केल्यानंतर या लक्षणांची तीव्रता कमी झाली नाही तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.