|

मातांनो, बाळंतपणानंतर प्या ओव्याचे पाणी; जाणून घ्या कारण आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गर्भारपण आणि बाळंतपण हे दोन्ही कालावधी अतिशय काळजी आणि जबाबदारीचे असतात. कारण यातून जाताना प्रत्येक महिला दुसरा जन्म घेत असते आणि हा जन्म म्हणजे आई होणे. या दरम्यान स्त्री आपल्या गर्भात एक जीव वाढवत असते त्यामुळे एखादी छोटीशी चूकसुद्धा या काळात महागात पडू शकते. यासाठीच अनुभवी महिलांचा सल्ला, डॉक्टरांशी संवाद, योग्य औषधोपचार आणि गरजेची काळजी या काळात घ्यायला हवी. महिलांच्या शरीरात खूप बदल होत असतो. यासाठीच महिलांनी अगदी बाळंतपणानंतरसुद्धा स्वतःच्या शरीराची योग्य काळजी घ्यायला हवी. याचे आणखी एक कारण म्हणजे यातील कोणत्याही स्थितीमध्ये बाळ आपल्या आईवर अवलंबून असते. त्यामुळे मातांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे असते. बऱ्याचदा तुम्ही ऐकले व पाहिले असाल कि या काळात महिलांना ओवा खाण्याचा वा ओव्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तर आज आपण यामागील कारण आणि फायदे जाणून घेणार आहोत खालीलप्रमाणे:-

० ओव्याचे पाणीच का?
– कारण, ओवा हा अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असलेला पदार्थ आहे. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप, सायनस या आजारापासून संरक्षण होते. बाळाच्या जन्मानंतर आईचे शरीर कमकुवत असते. त्यामुळे तीला इनफेक्शन होण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम बाळाच्याही आरोग्यावर होतो. म्हणूनच आईला इनफेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी हा घरगुती उपाय केला जातो. शिवाय या संपूर्ण काळात महिलांच्या पोटात गॅस तयार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाळंतपणानंतर ओवा वा ओव्याचे पाणी पिण्यामुळे पोटातील गॅस कमी होतो. शिवाय बाळंतपणानंतर स्तनपान देताना शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत असावा यासाठी ओव्याचे पाणी महिलांसाठी फायदेशीर ठरते. याशिवाय गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी लाभदायक ठरते आणि बाळंतपणानंतर पहिल्यांदा मासिक पाळी येताना महिलांना होणार त्रास देखील ओवा शमवितो.

० ओव्याचे पाणी पिण्यामुळे बाळाला काय फायदा होतो?
– या संपूर्ण काळात आई जे जे खाते आणि त्या पदार्थामधून आईला जे काही पोषण मिळते त्याचा परिणाम बाळाच्या विकासावर होतो. कारण, गर्भात असल्यापासून जन्माला आल्यानंतर पहिले ६ महिने बाळ फक्त आईच्या दुधावर मोठे होते. त्यामुळे या काळात आईने अपथ्यकारक आहार घेतला तर बाळाला दूध पचत नाही. परिणामी बाळाचे पोट बिघडते. मात्र जर आईने ओव्याचे पाणी घेतले तर त्याचा परिणाम बाळाच्या विकासावर, वाढीवर आणि स्वास्थावर होतो. यामुळे बाळाला पोटदुखणे, अपचन असे त्रास होत नाहीत. यासाठी बाळाच्या आईने नियमित ओव्याचे पाणी पिणे बाळासाठी लाभदायक ठरते.