Thursday, March 23, 2023

केळफुलाचा काढा प्या आणि मिळवा आरोग्यवर्धक लाभ; जाणून घ्या फायदे

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। केळी हे एक असे फळ आहे ज्यात फायबरची मात्रा मोठी असल्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. फक्त ते खाण्याची वेळ पाळणे आवश्यक आहे. जसे हे फळ आरोग्यदायी अगदी तसेच केळफुलेदेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कारण केळफुलाचा आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावीरित्या लाभ होतो. मुख्य म्हणजे हा काढा अगदी सहज आणि सोप्प्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येतो. केळफुलामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, लोह आणि मॅग्नेशियम यांसारख्या विविध आरोग्यवर्धक घटकांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे केळफुलांचे तुम्ही कच्चेदेखील सेवन करू शकता. पण याचे काढ्याच्या रूपात सेवन करणे याहून अधिक फायदेशीर आहे.

० केळफुलाचा काढा कसा बनवालं..?

केळफुलं सोलून स्वच्छ करून घ्या आणि एका भांड्यात पाण्यात मीठ घालून व्यवस्थित शिजवून घ्या. यानंतर एक ग्लास पाणी गरम करायला ठेवून त्यात १ चमचा हळद, ५ ते ७ काळीमिरी, १/२ चमचा सुंठपावडर किंवा १ चमचा किसलेले आले, १/२ चमचा जिरंपूड, १ चमचा ओवा घालून पाण्याला उकळू द्या. आता यात शिजवलेल्या केळफुलांना पिळून त्याचा रस मिसळा. यानंतर तयार काढा गाळून गरमागरम प्या.

टीप – पिळलेल्या केळफूलाचा चोथा फेकू नका. त्याचे सूप किंवा भाजी बनवा आणि खा.

० केळफुलाच्या काढ्याचे सेवन करण्याचे फायदे

1. मधुमेहावर नियंत्रण – केळफुलाचा काढा मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. या काढ्यामुळे मधुमेहींच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते. तसेच रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. केळफुलाची भाजी खाणेदेखील मधुमेहींसाठी लाभदायी आहे.

2. निरोगी किडनी – केळफुलातील फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स किडनीच्या समस्यांवर मात कारण्यासाठी मदत करतात. या काढ्याचे सेवन केल्यास किडनीचे इतर कोणत्याही रोगांपासून संरक्षण होते. शिवाय शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. मात्र याच्या सेवनाबाबत शंका असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3. फ्री रॅडिकल्स दूर होतात – फ्री रॅडिकल्समुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. पण केळफुलातील अँटी- ऑक्सिडंट हे फ्री रॅडिकल्स कमी करतात. यासाठी केळफुलाचा काढा पिणे फायदेशीर ठरते. फ्री रॅडिकल्समुळे, पार्किन्सन आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका असतो. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी हा काढा मदत करतो.

4. निरोगी गर्भाशय – केळफुलाच्या काढ्याचे सेवन केल्यास गर्भाशयातील समस्या दूर होतात. यामुळे गर्भाशय निरोगी आणि स्वस्थ राहाते. हा काढा स्त्रियांनी नियमितपणे प्यायल्याने गर्भाशयातील समस्या दूर होतात.

5. मासिक पाळीतील वेदनांवर प्रभावी – केळफुलाचा काढा मासिक पाळीदरम्यान होणारा अतिरक्तस्राव आणि वेदना नियंत्रित करतो. या वेदनांवर मात करण्यासाठी केळफुले पाण्यात उकळून घ्या. यात थोडे मीठ घालून चांगले शिजवून घ्या. ते थंड झाल्यावर अर्धा चमचा जिरेपूड आणि काळी मिरी एकत्र करून प्या. याशिवाय त्याची फुले उकळून दह्यासोबत खाल्ल्यानेही मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...