| |

मातीच्या माठातील पाणी नैसर्गिकरित्या आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। माती अनेको मिनरल्स आणि पोषक घटकांचा साठा आहे. यामुळे आपल्या जन्माआधीपासून अतिशय प्राचीन पद्धतीमध्ये मातीची भांडी प्रचलित होती. परंतु माणूस प्रगत झाला आणि आधुनिकतेला बळी गेला. यामुळे आधुनिक जीवनात सगळ्याच गोष्टी बद्दलच्या आणि मातीची जागा ऍल्युमिनिअम, लोखंड आणि स्टीलने घेतली. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? कि आपले पूर्वज मातीच्या भांड्यातले पाणी का प्यायचे? त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ अशी हस्तरचित भांडी का बनवून वापरली असतील? यामागे काही कारण आहे का परंपरा?

खरतर मातीच्या मडक्यातून पाणी प्यायचे हे लोकांच्या अंगवळणी पडले होते आणि याचमुळे कालांतराने ती आपली परंपरा बनली. पण यामागील मुख्य कारण हे नसून आरोग्याशी संबंधित आहे. होय. आरोग्याचा आणि मातीच्या भांड्याचा फार प्राचीन संबंध आहे. मातीच्या माठातून पाणी प्यायल्याने प्रामुख्याने उन्हाळ्यात डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होत नाही. याशिवाय शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा मिळतो. याशिवाय शरीराचा मेटॅबॉलिझम रेट देखील सुधारतो. चला तर जाणून घेऊयात मातीच्या माठातून पाणी पिण्याचे फायदे:-

१) नैसर्गिक थंडावा – बारीक छिद्र असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. यामुळे तहान भागवण्यासाठी फ्रिजमधील थंड पाण्याऐवजी माठातले पाणी पिणे फायद्याचे ठरते. यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा लाभतो.

२) मातीचे आरोग्यवर्धक गुणधर्म – मातीचा माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत अनेक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा समाविष्ट असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात आणि ते पाणी पिण्यामुळे शरीराला फायदा होतो.

३) नैसर्गिक अल्कलाईन – शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांनी शरीर त्रस्त होते. पण जर शरीरातील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर आरोग्य उत्तम राहते आणि माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेले पाणी आरोग्यदायी सिद्ध होते.

४) केमिकल्स नाहीत – प्लॉस्टिक बॉटल्समध्ये BPA टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला हानी पोहचवते. म्हणून मातीच्या माठातील पाणी पिणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते आणि मुख्य म्हणजे ते दूषित वा केमिकलयुक्त नसते.

५) मेटॅबॉलिझम सुधार – मातीच्या माठातील पाणी प्यायल्यामुळे शरीराचा मेटॅबॉलिझम सुधारतो. यामुळे शरीरात ऊर्जा कायम साठून राहते आणि कार्यप्रणाली सुरळीत चालते.

६) उष्माघाताला आळा – प्रामुख्याने उन्हाळ्यात माठातले पाणी अतिशय लाभदायक ठरते. कारण उन्हाळ्यात होणारे त्रास जसे की, उष्माघात आणि डिहायड्रेशन यावर मातीच्या माठातील नैसर्गिक घटक समाविष्ट असलेले पाणी फायदेशीर ठरते.

७) घशाची काळजी – सर्दी, खोकला आणि अस्थमा या आजारांसाठी फ्रिजमधील थंड पाणी कारणीभूत असते. शिवाय या आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींनी फ्रिजमधील पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. परंतु, माठातील थंडगार पाणी हे लोक पिऊ शकता. कारण ते घशासाठीदेखील चांगले असते आणि ते पिण्यामुळे या आजारांना बळकटी येत नाही.