Green Tea
| | |

दिवसभर सतत ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। असं एकही घर नसेल जिथे चहा पित नाहीत. कारण एकतर घरात दुधाचा चहा प्यायला जातो नाहीतर फिटनेस लव्हर्सच्या घरात ग्रीन टी प्यायला जातो. आजकाल फिटनेस लव्हर्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे एखादा नवा फॅशन ट्रेंड असतो त्याप्रमाणे ग्रीन टी पिण्याचा जणू ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे आरोग्य आणि वजन कमी करण्याच्या नादात लोक सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि अगदी रात्रीसुद्धा ग्रीन टी पिताना दिसतात. पण मित्रांनो, तुमचे ग्रीन टी पिण्याचे प्रमाण जर असे काहीसे असेल तर मात्र तुमच्या आरोग्यासाठी हि बाब धोकादायक ठरू शकते.

आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, कमीत कमी प्रमाणात प्रक्रिया करून ग्रीन टी तयार केला जातो. ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आपले आरोग्य राखण्यास मदत करतात. इतकेच नव्हे तर अनेक आजारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करतात. मात्र, ग्रीन टीचे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केले नाही तर शरीराचे नुकसान होऊ शकते. यात जे लोक सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पितात त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय शरीराचे आणखी बरेच नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घ्या खालिलप्रमाणे:-

१) दिवसभरात एकापेक्षा अनेकवेळा ग्रीन टी प्यायल्याने आपले भुकेचे प्रमाण फार कमी होते. यामुळे शरीराला आवश्यक असणारी तत्त्वे पूरेशा प्रमाणात मिळत नाहीत.

२) रिकाम्या पोटी ग्रीन टी पिण्याची सवय पोटाचे नुकसान करू शकते. कारण उपाशी पोटी ग्रीन टी प्यायल्यास पोटात जळजळ होते आणि यामुळे आतड्या दुखावतात. शिवाय पोटात एक विशिष्ट प्रकारचे अॅसिड तयार होते आणि पोटदुखी तसेच अतिसार होऊ शकतो.

३) ग्रीन टीमध्ये असलेले टॅनिन शरीराला पोषक घटकांमधून लोह शोषण्यात व्यत्यय आणतात. यामुळे ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात लोहाची कमतरता जाणवते.

४) ग्रीन टीचे अतिसेवन केल्यास गर्भधारणेमध्ये अडचण येते. शिवाय बाळाच्या जन्मानंतर दुधाची गुणवत्ता कमी होते. तर ग्रीन टी च्या अतिसेवनाने गर्भपाताची शक्यता बळावते.

५) ग्रीन टीमध्ये समाविष्ट असलेले कॅफिन रिकाम्या पोटात गेल्याने डिहायड्रेशनची समस्या होते. त्यामुळे ग्रीन टी पिताना जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावून घ्या.

६) ग्रीन टीचे उपाशी पोटी सेवन केल्यास डोकेदुखीचा त्रास संभवतो. कारण ग्रीन टी जास्त पोटात गेल्याने पोटात गॅस तयार होतो आणि काही वेळाने हा गॅस डोकेदुखीचे कारण बनतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *