| | | |

ओव्याचे सेवन करा आणि पोटाच्या समस्या चुटकीसरशी पळवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो की सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या अन्न पदार्थाचा स्वाद आणि त्याचा खमंग सुवास वाढविण्यासाठी केला जातो. याशिवाय कितीतरी वर्षांपासून आजीच्या बटव्यामधील औषधींमध्ये ओव्याचा आवर्जून वापर केला जातो. घरातील प्रत्येक स्त्रीला ओव्याचा वापर पोटदुखीच्या त्रासावर प्रभावी आहे हे माहीत असतेच. त्यामुळे पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांसाठी ओव्याचा वापर सर्रास केला जातो. मुख्य म्हणजे ओव्यांमध्ये पोटातील जळजळ रोखणारी तत्वे असतात त्यामुळे पोटाच्या कोणत्याही समस्यांवर ओवा हा उत्तम पर्याय आहे. तसेच छातीमध्ये जमलेला कफ निघून येण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. त्यामुळे सायनसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी ओवा अतिशय गुणकारी आहे.

१) पोटाच्या तक्रारींवर १००% रामबाण
– पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी औषधी म्हणून वापरली जाते. कारण ओव्यांमध्ये पोटातील जळजळ, मुरडा, उष्णता आणि अपचनसारख्या समस्यांवर परिणामकारक असणारे गुणधर्म समाविष्ट आहेत. त्यामुळे ओव्याचे सेवन केल्याने पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त अश्या कोणत्याही पोटाशी संबंधित विकारांमध्ये लगेच आराम मिळतो. या विकारांवर लगेच परिणाम मिळावा म्हणून ओव्याचे सेवन करण्यासाठी खालील चूर्ण खावे.
० ओवा, काळे मीठ, आणि सुंठ हे पदार्थ एकत्र करून त्याची बारीक चूर्णासारखी पावडर करावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच गुण दिसतो. शिवाय अपचन झाले असेल, तर ओवा थोडा तव्यावर शेकून घ्या आणि चावून खा. यामुळे अपचन दूर होईल.

२) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
– वजन कमी करण्यासाठीसुद्धा ओवा उपयुक्त आहे. कारण ओवा घालून ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढते. परिणामी शरीरातील चरबी घटते.
० हा उपाय करण्यासाठी केवळ एक ग्लास पाण्यात १ चमचा ओवा रात्रभर भिजवून सकाळी यात १ चमचा मध घालून रिकाम्या पोटी प्या.
० याव्यतिरिक्त हे पाणी आधी ओव्यासकट उकळून घेऊन मग गाळून घ्या आणि थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून प्यायले तरीही चालेल.

३) खोकल्यापासून सुटका
– जर खूप दिवस सातत्याने कोरडा खोकला येत असेल आणि छातीत कला जात असतील. तर यासाठी ओव्याचे पाणी अतिशय गुणकारी आहे.
० या उपायाकरिता पाण्यामध्ये ओवा घालून ते उकळून घ्यावे. हे पाणी हलके थंड झाल्यावर गाळून त्यात थोडे काळे मीठ घालून त्याचे सेवन करावे. यामुळे खोकला थांबतो व आराम मिळतो.

४) सांधेदुखीपासून आराम
– वय उतरू लागले कि सांध्यांच्या व्याधी खूप त्रास देतात. यात गुडघेदुखी प्रामुख्याने डोके वर काढते. यासाठीदेखील ओवा फायदेशीर आहे.
० यासाठी गरम केलेला ओवा एका रुमालात बांधून, त्या पुरचुंडीने गुडघ्यांना शेक द्या. यामुळे गुढघेदुखीपासून अराम मिळतो.
० शिवाय अर्धा कप ओव्याच्या पाण्यामध्ये सुंठीची पूड घालून या पाण्याचे सेवन केले असता सांधेदुखीमध्ये आराम पडतो.

५) हिरड्यांच्या समस्यांसाठी मदतयुक्त औषधी
– एखाद्या इन्फेक्शन मुळे हिरड्यांना सूज येऊ शकते अश्यावेळी लगेच उपाय करायचा असेल, तर त्यासाठी
० ओव्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये मिसळून गुळण्या करा. यामुळे हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.
० शिवाय ओवा भाजून घेऊन त्याची पूड हिरड्यांवर हलक्या हाताने मालिश करावी. यामुळेही हिरड्यांची सूज कमी होते.

६) मासिक पाळीच्या समस्यांवर उपायकारक
– महिलांना मासिक पाळीवेळी कंबरदुखी, पोटदुखी आणि पाठदुखीचा समस्या जाणवतात. हा त्रास तात्पुरता असला तरी भयंकर असतो.
० अश्यावेळी थोडासा ओवा गरम पाण्याबरोबर घेतल्याने आराम मिळतो. पण ओवा उष्ण असल्याने ज्या महिलांना मासिक पाळी मध्ये रक्तस्राव जास्त होतो त्यांनी ह्या उपायाचा अवलंब करताना काळजी घावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

७) मुरुम येणे बंद होईल
– चेहऱ्यावर सतत मुरुमे किंवा पुटकुळ्या येत असतील तर अश्या व्यक्तींसाठी ओवा परिणामकारक पर्याय आहे.
० यासाठी ओव्याची पूड करून दह्यामध्ये मिसळावी व चेहऱ्यावर लावावी. जेव्हा हा लेप सुकेल, तेव्हा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. काही दिवसातच चेहऱ्यावर मुरूमे येणे पूर्णपणे बंद होईल.