| | | |

गाजर खा आणि निरोगी रहा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गाजर एक असे कंदमूळ आहे, जे कोणत्याही हंगामात बाजारात सहज मिळते. गाजरामध्ये प्रामुख्याने बीटा कॅरेटीन अधिक प्रमाणात आढळते. शिवाय अनेक पोषक तत्वांसह आणि अ जीवनसत्त्वानं गाजर परिपूर्ण असते. गाजर रोज खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढते आणि धोकादायक आजारांपासून आपले संरक्षण होते. या व्यतिरिक्त रोज एक गाजर खाल्ले असता हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गाजराचे असे काही फायदे सांगणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही चकितच व्हाल.

१) दृष्टी सुधार – गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई असल्यामुळे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. गाजराचा रस नियमित पिण्याने तुमची नजर उत्तम राहते शिवाय दृष्टीसंबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात व्हिटॅमिन ए चा अभाव असेल तर त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यामुळे दृष्टीवर हळूहळू परिणाम जाणवू लागतो.

२) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ – रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजरामधील व्हिटॅमिन ए फायदेशीर असते. कारण व्हिटॅमिन ए मुळेच आपले रोगांपासून संरक्षण होत असते.

३) रक्तदाब नियंत्रण – गाजरात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे पोषक घटक असतात. ज्यांचा रक्तदाबावर चांगला परिणाम होतो. यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज गाजराचा रस पिणे फायदेशीर ठरते.

४) मधुमेहावर नियंत्रण – एका संशोधनानुसार, आहारात व्हिटॅमिन ए चा समावेश करून तुम्ही मधुमेह प्रकार २ वर उपचार करू शकता. गाजरात व्हिटॅमिन ए मुबलक असते. यामुळे मधुमेहींसाठी गाजर खाणे फायद्याचे ठरते.

५) कर्करोगापासून बचाव – गाजरातील बीटा केरोटीन आणि कॅरोटेनॉईडमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे कॅन्सरच्या पेशींना प्रतिबंध करणे सोपे जाते. काही संशोधनानुसार नियमित गाजराचा रस पिण्याने लुकेमिया अथवा तोंडाच्या कॅन्सरवर मात करता येते.

६) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे – नियमित गाजराचे सेवन केल्याने शरीराला अॅंटिऑक्सिडंटचा पुरवठा होतो आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते .

७) यकृत यंत्रणेत सुधार – गाजरात मुबलक प्रमाणात फ्लेवोनॉईड आणि बीटा केरोटीन असते. यामुळे यकृत डिटॉक्स होते आणि यकृताचे संपूर्ण कार्य सुधारते.

८) हाडे मजबूत होतात – गजरात आढळणाऱ्या व्हिटॅमिन ए मुळे हाडांच्या पेशींचे मेटाबॉलिझम सुधारते. तसेच गाजरातील बीटा केरॉटीनमुळे शरीराला अॅंटिऑक्सिडंटचा पुरवठा होतो आणि परिणामी हाडांचे आरोग्य सुरक्षित राहते.

९) दात व हिरड्यांचे उत्तम आरोग्य – ताज्या आणि कच्च्या गाजरामुळे दात मजबूत राहतात. शिवाय, तोंडाला येणारा घाणेरडा वास कमी होतो. गाजरातील फायबर्समुळे तोंडात अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते. तोंडात निर्माण होणारी लाळ तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली असते.

१०) पीसीओडीचा त्रास कमी होतो – आजकाल कित्येक महिलांना कमी वयापासून पीसीओडीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. या त्रासावर उपाय म्हणून ताज्या भाज्या व कंदमुळे खाण्याचा सल्ला देतात. काही संशोधनानुसार पीसीओडीवर उपचार करण्यासाठी गाजर खाणे फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

११) त्वचेच्या आजारांपासून आराम – गाजरामध्ये असणाऱ्या अॅंटी ऑक्सिडंटमुळे शरीरातील रक्त शूद्ध होते. त्वचेचे योग्य पोषण न झाल्याने वा इनफेक्शमुळे त्वचेच्या समस्या आणि आजार उदभवतात. मात्र जर तुम्ही नियमित गाजराचे सेवन केलात तर या आजारांपासून आराम मिळेल.

१२) सुंदर त्वचा व मजबूत केस – केसांचे पोषण न झाल्यास केस निस्तेज होतात आणि अकाली पांढरे दिसतात. यासह त्वचेस पोषक तत्व न मिळाल्याने त्वचा निस्तेज होते आणि अकाली म्हातारपण येत. मात्र गाजराचे सेवन केले असता त्यातील पोषक घटकांमुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते आणि अगदी केसांचेही योग्य पोषण होते.