| | | |

खेकडे खा बिंधास्त आणि आयुष्य जगा निर्धास्त; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेको लोकांना मांसाहार करणे अतिशय आवडते. अश्या प्रत्येक मांसाहार प्रेमींसाठी हा आजचा लेख समर्पित. मासे, अंडी, चिकन, मटण यासोबतच आवर्जून आणि आवडीने खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. खेकड्याचे सूप, सलाड, कालवण, रस्सा आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून आहारात खाल्ले जाते. खेकडे चवीला अतिशय उत्तम असतात. पण याहीपेक्षा जास्त खेकडे आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. मुख्य करून मधुमेहाने ग्रासलेल्या लोकांना मांसाहार करावा का करू नये असा प्रश्न पडतो. पण मधुमेहींसाठी खेकडे सर्वात उत्तम असा आरोग्यदायी पर्याय आहे. कारण, खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खेकडा खाण्याचे फायदे सांगणार आहोत जे वाचल्यानंतर तुम्ही निर्धास्तपणे खेकडे अगदी चवीने पाहू शकता.

१) हृद्यविकाराचा धोका कमी – खेकड्यांमधून ओमेगा 3 फॅटी अॅसिड मिळते. शिवाय यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शिवाय यात आढळणाऱ्या नायसिन व क्रोमियममुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी हृद्यविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

२) कॅन्सरचा धोका कमी – खेकड्यामध्ये आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्सिडेटीव्हमुळे होणारे नुकसान कमी करते. परिणामी कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच यातील अॅन्टी ऑक्सिडंट घटक शरीरात कॅन्सरला प्रवृत्त करणाऱ्या घटकांचा प्रादूर्भाव कमी करतात.

३) मधूमेहींसाठी उत्तम – खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम असते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच खेकड्यातील मांसात कार्बोहायड्रेट कमी असते. त्यामुळे मधुमेहींसाठी खेकडा उत्तम पर्याय आहे.

४) रक्तपेशींच्या निर्मितीत सुधार – रक्तपेशींच्या निर्मीतीसाठी व्हिटामिन बी १२ आवश्यक असते आणि हे खेकड्यांमध्ये आढळते. यामुळे खेकडे खाल्ल्यास अॅनिमिया होण्याचा धोका कमी होतो. शिवाय खेकड्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड रक्तभिसर प्रक्रिया सुधारतात.

५) रक्तदाब नियंत्रण – खेकड्यामधील पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलेटसचे संतुलन राखतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच खेकड्यांमध्ये आढळणारे पोटॅशियम घटक शरीरात रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत करतात.

६) सांधेदुखीपासून आराम – शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखी होते. म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करा. यामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास तसेच सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते. कारण मुळातच खेकडे सेलेनियम या अॅन्टी ऑक्सिडंटचा पुरवठा करतात.

७) वजन कमी करते – खेकड्यांमध्ये कॅलरी कमी असतात. यामुळे ते आरोग्यदायी आहेतच शिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच यामधून मिळणारे प्रोटीन घटक खेळाडू आणि बॉडीबिल्डर व्यक्तींच्या आहारात फायदेशीर ठरते.

८) त्वचा विकार दूर – खेकडे खाल्ल्याने चेहऱ्यावर येणारे पुरळ, मुरूम, खड्डे आणि रॅशेस अशा त्वचा विकारांचा त्रास कमी होण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये मुबलब प्रमाणात झिंक आढळते, यामुळे तेल निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी त्वचा विकारापासून बचाव होण्यास मदत होते.