| | |

हिवाळ्यात खा ऊर्जादायी पौष्टिक मेथीचे लाडू; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून उष्णतेची अत्यंत गरज असते. स्वेटर वा गरम कपडे परीक्षण करून आपण आपल्या शरीराचा थंडीपासून बाहेरून बचाव करतो. मात्र आपल्या शरीराला आतूनही तितक्याच ऊर्जेची आणि उष्णेतेची गरज असते आणि त्यासाठी आपण आपल्या आहारात काही पदार्थ खाण्याची अतिशय गरज असते. मुख्य म्हणजे, वातावरणात गारवा वाढल्यास आहारात सुद्धा बदल करणे गरजेचे आहे हे विसरू नका. यासाठी हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू घरगुती पद्धतीने बनवा आणि खा. आम्ही जाणतो कि, अनेकांना मेथीचे लाडू खायला अजिबात आवडत नाही. कारण मेथी चवीने कडू असते. पण आम्ही तुम्हाला आज मेथीचे लाडू बनवण्याची अशी एक पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे मेथीचा कडवटपणा नाही तर पौष्टिकपणा तुम्हाला अनुभवता येईल. जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे खालीलप्रमाणे:-

मेथीचे लाडू तयार करण्याची घरगुती पद्धत

साहित्य :-
– १/२ कप तूप,
– १ कप गव्हाचं पीठ,
– १ टेबल स्पून मेथी,
– २ टीस्पून बडिशेप,
– प्रत्येकी १ चमचा बदाम, काजूची पावडर
– १ छोटा चमचा सुंठ पावडर,
– ¾ कप गुळ

कृती :-
आता सर्वप्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर गव्हाचं पिठ मंद आचेवर भाजून घ्या. जवळपास १५ ते २० मिनिटे भाजल्यानंतर पिठ सोनेरी रंगाचं दिसू लागल्यानंतर गॅस बंद करून ते थंड करून घ्या. (हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले नाही आणि तुम्ही यामध्ये साखर एकत्र केली तर मिश्रण कोरडं होईल.) आता दुसऱ्या कढईमध्ये मेथी आणि बडिशेप भाजून नंतर मिक्सरमध्ये बारिक करा. आता पिठाचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर साखर आणि बारिक केलेलं मिश्रण एकत्र करा. यानंतर त्यात सुंठ घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि यासोबत बदाम काजूची पावडरदेखील मिसळा. आता हाताला तूप लावून लाडू वळून घ्या. आता तयार लाडू हवाबंद डब्ब्यात बंद करून ठेवा. मेथीचे लाडू चार ते पाच आठवड्यांपर्यंत चांगले राहतात.

फायदे :-

१) मेथी खाणे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहाय्यक आहे.

२) हृदयाशी निगडीत आजारांसोबत मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेथी मदत करते.

३) मेथीत असणारे फायबर, अॅन्टी ऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.

४) पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी औषधीसारखे काम करते.

५) मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण तयार करा. या चूर्णामध्ये गुळ टाका आणि खा. यामुळे संधिवाताची समस्या दूर होईल.

६) अपचन, बद्धकोष्ठता यावर १/२ चमचा मेथीदाणे पाण्यासोबत खाणे फायदेशीर आहे.

७) मेथीचे नियमित सेवन केल्यास हार्मोन संतुलित राहतात. शिवाय दररोज ३ ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.