| |

मासे खा आणि स्वस्थ आयुष्य जगा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुखी जीवनासाठी निरोगी आरोग्य अत्यंत महत्वाचे असते आणि निरोगी आरोग्यासाठी पोषक असा आहार गरजेचा असतो. आता यात कुणी शाकाहारी असत तर कुणी मांसाहारी. अर्थात ज्याची त्याची आवड आणि निवड वेगवेगळी असते. पण, मांसाहार करणाऱ्या लोकांकडे जरा जास्त पर्याय असतात. या पर्यायांमधील सगळ्यात सोप्पं, चविष्ट आणि पोषक पर्याय म्हणजे मासे. मनावरचा ताण वाढला किंवा तणावाची लक्षणे जाणवली तर तो कमी करण्यासाठी आहारात मासे खाणे अत्यंत लाभदायी आहे.

यामुळे जर का तुम्ही मांसाहारी असाल तर आपल्या आहारात माशांचा समावेश जरूर करा. कारण मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे मासे शिजायला झटपट, बनवायला सोपे आणि खायला अत्यंत चविष्ट असतात. शिवाय आरोग्यासाठीही लाभदायक असतात. माश्यांच्या सेवनामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रोल कमी होऊन हृदय निरोगी राहते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन डी असते आणि त्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात. तर जाणून घेऊयात मासे खाण्याचे शरीरासाठीचे फायदे:-

१) व्हिटॅमिन डी – मुख्यत्वे मासे व्हिटॅमिन डी’चा प्रमुख व प्राकृतिक स्त्रोत आहे. व्हिटॅमिन डी शरीरामध्ये पोषक घटक शोषण करण्यासाठी आणि आपले हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. यामुळे माश्यांचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीचे संतुलन राहते.

२) निरोगी हृदय – माशामध्ये सॅच्युरेटेड फॅट नसते. चिकन किंवा मटण हे प्रोटीनचा मोठा स्त्रोत असले तरीही त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढते. जे हृदयास हानिकारक ठरू शकते. यांच्या तुलनेत माशांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असते, म्हणूनच हृदयाचे आरोग्य लक्षात घेता मासे खाणे लाभदायक ठरते.

३) ताण तणाव नियंत्रण – माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, DHA आणि व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. यामुळे मासे खाल्ल्याने शरीराला योग्य तितके पोषक घटक मिळतात. परिणामी ताण तणाव कमी होते व नियंत्रणात येते.

४) चांगले फॅट्स – माशांमध्ये चांगले फॅट्स असतात. त्यामुळे मासे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. माशांमधील ओमेगा-3 फॅटी ऍसिड डोळे आणि मेंदूसाठी लाभदायक असतात.

५) मधुमेहावर नियंत्रण – नियमीत मासे खाल्ल्याने मधुमेहाचा आजार होण्याचा धोका कमी होतो. कारण माशांमधील पोषक घटक शरीरातील रक्तात असणारी साखर नियंत्रित करतात.