| |

नाश्त्यात हिरव्या मुगाचा चीला खा आणि दिवसभर उत्साही रहा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आहारात डाळींचा समावेश असेल तर शरीराला आवश्यक असणारे बरेच घटक सहज मिळवता येतात. कारण डाळींमध्ये उच्च प्रतीचे फायबर आढळते. जे पचनसंस्थेची काळजी घेण्यास सक्षम असते. पण सकाळी नाश्त्यादरम्यान डाळीचा एखादा पदार्थ खाल्ला तर संपूर्ण दिवस अगदी उत्साही आणि ऊर्जात्मक जातो. यासाठी प्रामुख्याने हिरव्या मूगाचा चिला खाणे फायद्याचे आहे. कारण नाश्त्यामध्ये काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक असेल तर तो खायलाही मजा येते आणि आरोग्यालाही फायदाच होतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि कर्बोदक आढळतात. यामुळे ती नाश्तास्वरूप किंवा जेवणाच्या डब्ब्यात खाणे फायदेशीर आहे. मुळात मूगाचा चिला बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हा पदार्थ तयार करण्यासाठी अगदी १० मिनिट लागतात. शिवाय हा पदार्थ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सारेच आवडीने खातात. फक्त मूग डाळ चिला करायचा असेल तर यासाठी मूग डाळ रात्रभर वा काही तास आधी पाण्यात भिजत ठेवा. चला तर जाणून घेऊयात साहित्य, कृती आणि फायदे :-

साहित्य

– भिजवलेले हिरवे मूग – १/२ कप

– हिरव्या मिरचीची पेस्ट – १/२ टीस्पून

– मीठ – चिमूटभर

– जिरे पावडर – ३/४ चमचे

– आले पेस्ट – १/२ टीस्पून

– ऑलिव्ह तेल – २ टीस्पून

कृती – यासाठी हिरवे मूग रात्रभर किंवा बनविण्याआधी साधारण ५ तास भिजत ठेवा. मूग चांगले भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाका आणि जाड पेस्ट तयार करा. आता डाळीच्या मिश्रणात वर नमूद केलेले सर्व मसाले आणि मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. आता नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा आणि सर्व्हिंग स्पूनच्या मागील बाजूने मिश्रण समान रीतीने पसरवा. दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी रंग येईपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्या. त्यानंतर हिरवी चटणी वा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

फायदे

१) सकाळी नाश्त्यामध्ये हिरव्या मुगाचा चीला खाल्ल्यास दिवसभर शरीरात उत्साह राहतो. यामुळे कोणतेही काम करताना कंटाळा जाणवत नाही. इतकेच नव्हे तर शरीरात ऊर्जा टिकून राहते. यामुळे मरगळ आणि मायग्रेनचा त्रास होत नाही.

२) रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हिरवा मूग लाभदायी ठरतो. यामुळे हिरव्या मुगाचा आहारात समावेश करून तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी मार्ग मोकळा करता येईल.

३) रोजच्या पौष्टिक गरजांची पूर्तता करण्यासाठी हिरवे मूग कोणत्याही प्रकारे खाणे फायदेशीर आहे. कारण मुगात प्रथिने समाविष्ट असतात. यामुळे हिरवा मूग खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

४) हिरव्या मुगामध्ये फायबर असल्यामुळे त्याचे कोणतेही पदार्थ खाल्ल्यास पोटाला त्रास होत नाही.